एक दिवसासाठी तो आई बनला आणि…

“ही काय रद्दी ठेवलीय समोर…उचला ती…मला प्रॉपर रिपोर्ट बनवून हवाय…”

“सर तुम्ही सांगितलं ते सगळं आहे यात…आणि..”

“हा फॉन्ट…22 हवा, तुम्ही 24 चा घेतलाय…ही लाईन, बोल्ड नको…त्या दोन लाईन्स मध्ये अंतर आहे…जा..नवीन आना..”

आकाश फाईल उचलून आपल्या टेबल जवळ जातो आणि हात आपटत आपला संताप बाहेर काढतो…

“किती फालतू गोष्टी साठी रिपोर्ट रिजेक्ट केलाय…काय तर म्हणे लाईन्स मध्ये अंतर आहे..वैताग आणलाय गडे या बॉस ने…”


जवळपास आठवडाभर मेहनत घेऊन आकाश ने हा प्रोजेक्ट बनवला होता…त्याचकडून पूर्ण 100 टक्के त्याने दिले, बॉस खुश होईल याच आशेने..पण सगळं व्यर्थ…

आकाश घरी गेला..बायको ने दार उघडलं…पाणी दिलं…चहा दिला..आणि आकाश शेजारी बसून बोलू लागली…

“झोपला बाबा एकदाचा…वैताग आलाय राव … 11 महिन्याचं पिटुकलं पण जीव नको नको करून टाकतो बघा…आज तर माहितीये फक्त अर्धा मिनिटं त्याला सोडून कपडे काढायला गेले तर भाऊने पिठाचा अख्खा डबा उलटा केला… सगळ्या घरात पीठ पीठ…आणि दुपारी तर…”

“असं सांगतेय जसं फार मोठं झालंय काहितरी… अगं वैताग काय असतो मला विचार…”

“अहो असेल तुम्हालाही टेन्शन..मला म्हणायचंय की माझ्याही मागे जाम टेन्शन असतं..”

“माझ्याहून जास्त नाही…”

“इतका आत्मविश्वास??”

“हो..”

“आईपणाचं चॅलेंज अवघड असतं…तुम्हाला नाही समजणार ते..”

“काय इतका मोठा बाऊ करतेयस एवढ्याश्या गोष्टीचा….”

संपदा विचार करते…

“तुम्हाला टेन्शन आहे ना? आठवडाभर सुट्टी टाका…माझी मैत्रीण डॉकटर आहे, मेडिकल सर्टिफिकेट देईल ती…आणि अर्धा पगार आला या महिन्यात तरी चालेल…काही अडून राहणार नाही..”

“खरंच??”

“हो पण एका अटीवर..”

“कोणती?”

“या सात दिवसात तुम्ही आई ..”


“हा हा हा..”

“हसायला काय झालं..”

“मला आता साडी नेसवते काय…”

“विनोद नकोत…गांभीर्याने घ्या…बघूया, कोणाचं काम सर्वात चॅलेंजिंग आहे ते..”

“एवढंच ना..”

“हो..बस एवढंच..”

संपदा हसून त्याला म्हणते…

आकाश खुश…बॉस ला मेल करून देतो…संध्याकाळी बाळाला छानपैकी खेळवतो…

“किती गोंडस बाळ माझं..किती शहाणं बाळ आहे…मम्मा उगाच कटकट करते…”

“आता उद्यापासून सांभाळा तुमच्या ‘गोंडस’ बाळाला…”

सकाळी आकाश उठतो…उठल्या उठल्या संपदा त्याला सांगते…

“आजपासून तुम्ही बाळाची आई…त्याचं सगळं तुम्हीच करायचं…तो केव्हाही उठेल….”

“Yes मॅम..आलोच बाथरूम ला जाऊन..”

आकाश बेडवरून उठतो तोच बाळ उठतं…

“त्याला पाजून दे मी आलोच..आई आई…फार प्रेशर आलंय..”


“थांबा…नाही जाऊ शकत तुम्ही…”

“का??”

“का म्हणजे? मी कितीदा यातून गेलेय…तुम्हाला आईपण अनुभवायचय ना? मी ही ते सुरवात आहे..”

“ही अशी? अन काय करू मी आता??”

“ही घ्या दुधाची बाटली…पाजा त्याला..”

“घे रे माझ्या राजा…पी…”

बराच वेळ होतो, बाळ पिणं सोडत नाही..

“आवर रे राजा..मला कंट्रोल होत नाहीये…आआ…”

आकाश ओरडला तसं बाळ घाबरलं, आता अजून रडायला लागलं…

“आता त्याला घ्या आणि शांत करा..”

“अगं प्लिज ना…जाऊदे ना मला..”

“अजिबात नाही..काल म्हणत होते ना की ऑफिस मध्ये फार प्रेशर असतं म्हणून? आता हे प्रेशर करा की सहन काही वेळ..”

“आता बाथरूम ला पण जायचं नाही का? तू आहेस ना इथे? मग 2 मिनिट घे की त्याला..”

“रोज मी एकटी असते तेव्हा कोण थांबतं बाळा जवळ? जरा नजरेआड केलं की एक तर पडतो नाहीतर काहीतरी वाढवा करतो…आणि मी अदृश्य आहे असं समजा…सारखी सारखी हाक देऊ नका…”

कसाबसा तो वेळ निघून जातो…

आकाश मोकळा होऊन परत बाळा जवळ येतो…

“आले माझ्या छकुल्या, आले माझ्या गोंदुल्या…”

बाळ आता उठून घरभर रांगायला लागतं… उभं राहण्याचा प्रयत्न करू पाहतं….त्याचा मागे मागे फिरून आकाश दमतो…

“मी अंघोळ करतो गं…”

पळवाट म्हणून आकाश म्हणतो..

“बाळाला घेऊन बसा..”

“अंघोळीला तर सोड एकटं..”

“मी अंघोळीला एकटी बसायची का? सकाळी तुम्ही लवकर जायचे…मग मला त्याला सोबत घेऊन अंघोळ करावी लागायची…”

आकाश ला एकेक गोष्टी आता कळू लागल्या…

बाळाला घेऊन तो बसतो खरं…. पण बाळ शांत बसेल तर खरं… मधेच नळ चालू करी, मधेच साबण उचलून फेकी..आकाश ला कळेना, त्याला अंघोळ घालावी, स्वतः करावी, सोबत करावी की त्याला आवरावं….

कसेबसे 2 मग पाणी स्वतःवर आणि 2 मग बाळावर ओतून साबण न लावताच दोघे बाहेर आले…

आकाश बायकोला सांगणार तोच त्याला समजलं..काहीही उपयोग नाही…

त्याने स्वतःच बाळाचे कपडे घातले..स्वतःही घातले…बाळाचे छान केस विंचरले…पावडर लावली…

“किती छान छान तयार झाला माझा सोनूला…मम्मी बघ गं…. पप्पानी किती छान तयारी केली…”

बाळाला आकाश लाडाने कडेवर घेतो तोच बाळ खालून पिवळी पिचकारी सोडतो…आकाश स्थब्ध होतो..आलेल्या वासाने त्याला संकटाची चाहूल लागते…तो बायकोकडे बघतो…

“जा..धुवा….”

परत अंघोळ… परत नवीन कपडे…

आकाश दमतो..

“जरा वेळ पडतो गं…”

“आणि बाळाला कोण सांभाळणार?”

“सांभाळलं ना इतका वेळ..”

“त्याला खाऊ घाला…पेज तयार केलीये त्याला…नशीब ते तरी नाही सांगितली मी तुम्हाला…आणि घरातली कामं? नशीब समजा की फक्त बाळ सांभाळायला दिलंय… घरकाम तर आणखी वेगळं असतं मला..”

“ही काही ड्युटी आहे का? अमुक एक तास काम केलं आणि सुटलो??? घ्या त्याला…”

आकाश ने चॅलेंज दिलं होतं…त्याला संपदा चा मुद्दा खोडायचा होता…म्हणून तो हार मानायला अजून तयार नव्हता…

बाळ घरभर रांगु लागलं…दिसेल ती वस्तू उचल, तिकडे फेक..पाणी सांड…पेज तोंडातून थुक.. घर अगदी 5 मिनिटात अस्ताव्यस्त…

मग आकाश जेवायला बसतो…

“बाळाला घेऊन बसा…”

असं म्हणत संपदा हसत बेड मध्ये निघून जाते..

आकाश एक घास घेतो..

“ए ए ए ती फुलदाणी पाडशील…”

तसाच उठत बाळाकडे पळतो..फुलदाणी लपवतो..बाळाला बाजूला नेऊन बसवतो आणि स्वतः जेवायला बसतो..

बाळ आकाश च्या खांद्यावर चढतं…. त्याला ओढतं… मधेच रडतं…आकाश ला काही केल्या जेवू देईना…
कसंतरी त्याला नादी लावून आकाश जेवला..

“आता खेळवा त्याला…अजून 2 तासांनी झोपेल तो..त्याचा वेळेनुसार..”

“अजून 2 तास???”

बायको तिथून जाते.आकाश बाळाला बेडवर ठेवतो आणि स्वतः त्याचा मोबाईल काढून बघायला लागतो..आज सकाळपासून त्याने मोबाईल चेक केला नव्हता..

त्याने मोबाईल हातात घेतला आणि बाळाने पटकन हिसकावून घेतला..स्क्रीन ला हात लावून गम्मत पाहू लागला…

आकाश च्या डोक्यात आयडिया आली..त्याला कार्टून चा व्हिडीओ त्याने लावून दिला…बाळ एकदम शांतच झालं…एका ठिकाणी बसून राहिलं…

आकाश ने सुस्कारा टाकला…

“हे आधी का नाही लक्षात आलं??”

संपदा ला आवाज आला आणि ती पळत खोलीत आली… बाळा कडून मोबाईल हिसकवला आणि आकाश वर चिडली..

“डोळे खराब करायचे आहेत का त्याचे?? मोबाईल चे दुष्परिणाम माहीत नाही का??”

संपदा फोन जप्त करून घेते..

बाळ रडायला लागतं… खाऊन पिऊन झालं, खेळून झालं..आता काय हवं??

आकाश ने त्याला फिरवलं… त्याला शांत करण्यासाठी 2 तास दमला…अखेर बाळ कसातरी झोपी गेला..

हुश्श….


आकाश ने स्वतःकडे आरशात पाहिलं….

तडक आपला लॅपटॉप उघडला…

बॉस ला मेल केला..

“सर…मी पूर्ण बरा झालोय…उद्यापासून ऑफिस ला येईल…तुम्हाला नवीन रिपोर्ट बनवून देईल…हव्या तेवढ्या दुरुस्त्या सांगा…करून देईन…अजून काही काम असेल तेही सांगा…पण मला ऑफिस ला येऊ द्या 😣😣😣”

वळून पाहिलं तर बायको मागे उभी राहून मेल वाचत होती आणि “आता कळलं ना??” चे प्रहार नजरेतूनच करत होती…


Leave a Comment