Lockdown झालं आणि गंगारामच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. मार्केट मध्ये मध्यवर्ती भागात त्याचं खेळणीचं दुकान, भरपूर चालत असे. दिवसाला हजार एक चा गल्ला जमे. संपूर्ण घर त्यावरच सुरू. मुलांचं शिक्षण, सणवार सगळं या दुकानावरच.एकवेळ मंदी येऊ शकते, ग्राहक कमी होऊ शकतात याची जाणीव असते पण हा आजार येईल अन दुकानं बंद करावी लागतील हे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हतं. अत्यावश्यक सेवा असणारी दुकानं दिमाखात सकाळी लवकर दुकानं उघडून बसत होती, पण गंगाराम मात्र हातावर हात ठेवून फक्त बघत बसला.
त्याच्या बायकोला वर्षाला त्याची घालमेल समजत होती, दुकान जेव्हा चालू होईल तेव्हा होईल, पण तोवर आपण काहीतरी व्यवसाय करून हातभार लावूया असं तिच्या मनात आलं.
“अहो, मी काय म्हणते..उन्हाळा लागलाय. पापड, कुरडया मी बनवतेच तर यावेळी जास्त बनवून ठेवते..”
“कशाला? इथे आधीच पैशाची मारामार..” गंगाराम आता कायम चिडक्या सुरात बोलत असायचा, काय करणार, परिस्थितीने भोळवट गंगारामला तसं बनायला भाग पाडलेलं.
“अहो आपल्यासाठी नाही, आपण ते दुसऱ्याला विकू, चार पैसे येतील त्यातून..”
“असले फालतू उद्योग कसेकाय डोक्यात येतात? खर्च किती, नफा किती..चाराण्याची कोंबडी अन बाराण्याचा मसाला..”
“अहो बाबा प्रयत्न करायला काय हरकत आहे?”
“करा तुम्हाला काय करायचं ते. “
एवढं सांगून गंगाराम अंगणात फेऱ्या मारू लागला. घरात मायलेकींना बरं वाटलं, रागात का होईना, परवानगी दिलीय..दोघींजणी कामाला लागल्या. 10 किलोचे जास्तीचे वाळवण तयार ठेवले.
कॉलनीत बऱ्याच घरी positive होते, घरात वाळवण बनलं नाही. लेक सुकन्याने तिच्या ग्रुप मध्ये जाहिरात दिली आणि 4-5 ऑर्डर त्यांना मिळाल्या. फार नाही पण शंभर रुपयाचा नफा त्यांना मिळाला.
गंगाराम त्यांना हसू लागला..
“कसले पोरखेळ चालवलेत.. दुकानात एका खेळणी मागे मी 150 रुपये नफा काढतो..आणि तुम्ही एवढी मेहनत करून काय केलं?”
दोघींना वाईट वाटलं पण हार मानून चालणार नव्हतं. सुकन्याने एक शक्कल लढवली, सोशल मीडिया पासून वर वेगवेगळे ग्रुप जॉईन करून जाहिरात दिली. पापड किती हायजनिक पद्धतीने तयार केले जातात याचा विडिओ काढला, कुरियर सर्व्हिस ची माहिती काढली आणि संपूर्ण राज्यात घरपोच देता येईल अशी जाहिरात केली. व्हिडीओ बघून लोकांना विश्वास वाटू लागला, सुरक्षित वाटू लागलं. संपूर्ण राज्यातून ऑर्डर सुरू झाल्या, हळूहळू रोज 10-20-30 ऑर्डर येऊ लागल्या. गंगाराम ते सगळं बघत होता पण यावेळी काही बोलायला कारण नव्हतं.
सुकन्याला एका distributor चा फोन आला, त्याने मोठ्या प्रमाणात पापड आणि कुरडया यांची ऑर्डर दिली, सोबतच ऍडव्हान्स म्हणून 10 हजाराचा चेकही दिला. ते पाहून मायलेकींना आकाश ठेंगणे झालं.
असंच एकदा घरी शेजारचे बाविस्कर कुटुंब घरी आले आणि त्यांनी सांगितलं..
“तुमचे प्रोडक्ट देशाबाहेर सुद्धा जाताय हो, माझा मुलगा अमेरिकेत आहे..त्याने प्रोडक्ट वरचं तुमचं नाव बघून चौकशी केली..खरंच फार कमी वेळात मोठा पल्ला गाठला तुम्ही..”
मायलेकींना आनंद झाला..गंगाराम पुढे आला आणि म्हणाला..
“बघा की..मी आधीच सांगत होतो यांना..की काहीतरी सुरू करा म्हणून…ऐकत नव्हत्या, मोठ्या मुश्किलीने तयार केलं त्यांना..”
मायलेकी हसू दाबत बाबांकडे चोरट्या नजरेने बघत होत्या.. आणि गंगाराम बाहेरून फुशारकी मारत असला तरी आतून ओशाळला होता..
कित्येक घरात स्त्रीला काहीतरी नवीन सुरू करावं असं वाटतं, काहीतरी नाविन्यपूर्ण करून त्याला व्यावसायिक रूप द्यावं असं वाटतं. पण तुला काय जमणार? कुणी विकत घेणार नाही..फालतू आयडिया आहे असं म्हणून तिला demotivate केलं जातं…अश्यांना एकच सांगणं आहे..
“एकदा विश्वास ठेऊन बघ, ती दुनिया हलवू शकते..”
खूपच छान
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://www.binance.com/ka-GE/join?ref=B4EPR6J0