“अनोळखी लोकांमध्ये जाऊन काम करायचं? छे, मला शक्यच होणार नाही, कंपनीने जरा तरी विचार करायचा..नोकरीला फक्त सहा वर्षे बाकी असताना अशी बदली करावी?”
मंगेशराव आज निराश मनस्थितीत घरी परतत होते. कंपनीत जवळजवळ 35 वर्षे काम केलं, प्रामाणिकपणे काम करून सर्वांच्या मनात आदर निर्माण केला. प्रतिष्ठा मिळवली, मुलाबाळांचे शिक्षणं केली, लग्न केले. या कंपनीसोबत एक भावनिक बंध जुळले गेले होते. मित्रपरिवार, सहकारी, मॅनेजर साहेब..या सर्वांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आधार दिला होता. आणि आज मॅनेजर साहेबांनी अचानक सांगितलं..
“मिस्टर मंगेश, पुढील वर्षे तुम्हाला औरंगाबाद च्या प्लांट मध्ये काम करायचं आहे, तुमच्या अनुभवाचा फायदा तिथे होईल..”
हा निर्णय घेणं मंगेशरावांना अवघड होतं. आपली लोकं, आपली माणसं, आपलं कार्यस्थळ, आपलं केबिन सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचं? तिथली माणसं कशी असतील? आपल्याला सांभाळून घेतील का? आपल्याला तिथे अनुकूल वातावरण असेल का? या विचारांनी मंगेशराव चिंताक्रांत होते.
घरी आल्या आल्या बायकोने गरम गरम चहा पुढ्यात आणला. तिथे गेल्यावर कोण देणार? मुलगा, सून, मुलगी, बायको यांना तिथे नेणं शक्य नाही, खाण्याची सोय आपल्यालाच करावी लागेल..चिंता पुन्हा वाढली. बायकोला मात्र त्यांना काही न सांगणं उचित वाटलं. घरखर्चासाठी आता नोकरी करणं तर भाग होतं, एकदा ते आपल्या घराकडे, घरातल्या माणसांकडे नजर टाकतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. पुढील काही वर्षे यांच्यापासून आपण दूर जाणार, आपली माणसं सोडून जाणार..या विचाराने त्यांच्या मनात खळबळ माजली..
त्यांच्या लाडक्या लेकीकडे ते बघू लागले, सुनेकडे अन बायकोकडे बघू लागले. मुलगी फोनवर बोलत होती,
“अजून लग्नाचं नाही ठरवलं गं, बघू पुढचं पुढे..कशी लोकं मिळतात हे आपल्या हातात थोडी आहे, जे नशिबात असेल त्याला स्वीकारायचं..”
सुनबाई बायकोशी बोलत होती,
“आई, पुढच्या आठवड्यात माझ्या भावाचा वाढदिवस आहे, पण मी सरळ नाही सांगितलं, आपल्याही घरात त्यादिवशी पूजा आहे ना, ती सोडून नाही जाऊ शकत मी..”
“अगं वेडे जाऊन ये की, सख्खा भाऊ आहे तुझा..वाढदिवस परत होईल, पण सासरी होणारी ही पूजा परत परत नाही होणार, शेवटी हेच माझं घर आता..”
बायकोच्या डोळ्यातलं समाधान मंगेशरावांना दिसलं, संसाराचे सुरवातीचे दिवस आठवले, आपली आई मालतीला किती सासुरवास करत होती, काहीबाही बोलून तिला नको नको करायची, दिवसभर कामाला जुंपायची अन टोमणे सतत सुरू. मालती कायम मौन बाळगून असायची, कधीही उलट बोलली नव्हती, वाट्याला आलेली दुःख प्राक्तन म्हणून स्वीकारत गेली..संसार सांभाळणं हेच तिचं एकमेव उद्धिष्ट होतं..
या सर्वांना बघून मंगेशरावांना शिकवण मिळाली, ते विचार करू लागले..
“या सर्व बायका..आपलं घरदार, आई वडील सोडून परक्याच्या घरी आल्या, नवीन माणसं, नवीन जागा हसत हसत स्वीकारली, समोर जे आलं त्याला सामोऱ्या गेल्या, संसाराच्या वाटेत काटे होते तरीही त्यावर चालण्याची जिद्द सोडली नाही, माझं कसं होईल? नवीन माणसात माझा निभाव कसा लागेल? आई वडिलांशिवाय मला राहवेल का? कामाची सवय नसताना मला सर्व पेलवेल का? असला विचार या बायकांच्या मनात कधीच येत नाही. आपल्याला दुसऱ्याच्या कुटुंबात जाऊन तिथे प्रकाश पेरायचा आहे, त्यासाठी स्वतःला जाळून घेण्याचे संस्कार यांना उपजतच असतात. मग मी केवळ 6 वर्षासाठी दुसरीकडे जायचं म्हणून रडतोय? काय वाटत असेल या बायकांना, जेव्हा आयुष्यभर आता आपण दुसऱ्या जागेत, दुसऱ्या माणसात जाणार म्हटल्यावर?”
मंगेशरावांनी निर्णय घेतला,
“निदान सहा वर्षे तरी मी यांचं आयुष्य जगून बघणार, माझ्या लेकीच्या वाटेला येणारं, बायकोच्या आणि सुनेच्या वाटेला आलेलं तप मीही करून बघणार..बघूया निभाव लागतो का ते..”
घरातल्या स्त्रियांकडे बघून मंगेशरावांना या प्रश्नावर मात करायचं उत्तर मिळालं..आणि ते सज्ज झाले, “त्यांचं आयुष्य जगून पाहायला..”