ऊब

 “इतका महागडा कलम आणला, काही उपयोग झाला नाही..बघ कसं सुकलंय आंब्याचं रोप..”

सुनीता काकू नेहमीप्रमाणे आपल्या किरकीऱ्या स्वभावानुसार कटकट घालत होत्या. एक तर आधीच असा स्वभाव आणि त्यात चिडचिड होईल अशा गोष्टी नेमक्या त्यांच्याच बाबतीत घडायच्या.   

“अगं सुलभा…भाजी करपल्याचा वास येतोय..लक्ष कुठे आहे??”

“दिनेश, ऑफीसला जातांना देवाच्या पाया पडून जा, एवढही समजत नाही का..”

“अहो चहाचं प्रमाण कमी करा जरा, सुलभालाही समजत नाही, मागितलं की दे..मागितलं की दे..काही पथ्यपाणी पळायला नको..”

सकाळी सकाळी सुनीता काकुंचं सुनेला, मुलाला आणि नवऱ्याला बोलणं सुरू व्हायचं. दररोज एकाचा तरी अपमान केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. त्यात सुलभा, त्यांची सून..तिची कामाची गती हळूहळू मंदावत चालली होती. नवीन नवीन कामाला तिला जो हुरुप आणि जी गती होती ती आता उरलीच नव्हती. 

तेवढ्यात शेजारच्या साखरआजी एक डबा घेऊन आल्या, नावाप्रमाणेच मधाळ स्वभाव. शत्रुलाही आपल्या गोड बोलण्याने नामोहरम करणाऱ्या या बाई. 

“सुनीता..अगं तुला वड्याची भाजी आवडते ना..घे बाई..जास्तीची करायला सांगितलेली मेघनाला..”

“कशाला सुनेला त्रास दिलास..तुझ्या सुनेकडून बरी इतकी कामं होतात..आमच्या इथे कामाच्या नावाने नुसती बोंब..”

सुलभाने ते ऐकून हातातलं कामही सोडून दिलं आणि चरफडत ती तिच्या खोलीत गेली.

“हे काय, आंब्याचं रोप कसं सुकलं तुझं?”

“बघ ना…इतकं महागडं आणलं मी, पण सुकून गेलं..तुही आणलेलं ना? बघू बरं..”

“चल माझ्यासोबत..”

दोघीही साखर आजीच्या घरी जातात..त्यांच्या घरात हिरवंगार आणि बहरून आलेलं रोपटं बघून सुनीताला नवल वाटलं..

“तुझं रोपटं इतकं छान कसं फुललं? बरंच महागडं आणलं असेल म्हणून..”

“नाही गं.. साधी आंब्याची कोय रुजवली मी, त्याचंच झालंय रोप..मोठं झालं की खाली पार्किंग च्या बाजूला लावून देईन..”

सुनीता त्या रोपट्याकडे बघतच राहिली. साखर आजीने तिचे हावभाव पाहिले आणि प्रेमाने समजावलं..

“कितीही महागडं रोप आण.. पण त्याला जर मायेचा ओलावा आणि प्रेमाची ऊब नसेल ना तर ते तग धरत नाही..याउलट नाजूकश्या रोपट्याला थोडा जरी उबारा दिला तरी ते आनंदाने फुलायला लागतं..एखाद्या गोष्टीला फुलायला त्याच्या अंगभूत गुणांपेक्षा आपण त्याला कसं वातावरण देतोय हे महत्त्वाचं..”

सुनीताला त्यातला अर्थ आता समजू लागलेला..

“मेघना..सुनीता काकूंसाठी चहा ठेव बरं बाळा..आणि हो, जरा पडून घे..सकाळपासून दमतेय नुसती…बाकीचं मी आवरून घेईन..”

सुनीताला त्या फुललेल्या रोपट्यात साखर बाईची बारकी सून आणि आपल्या सुकलेल्या रोपट्यात स्वतःची धडधाकट सून सुलभा दिसत होती.

Leave a Comment