उदात्त प्रेम

“अरे तू काय साथ देशील मला…मी अडचणीत असतांना हात वर केलेस..कसा विश्वास ठेऊ तुझ्यावर?”
प्रणाली सुमित चा हात झटकत त्याला म्हणाली..
“तू समजतेय तसं काही नाहीये…हे बघ, मला एक संधी दे…”
नाही, आता आपल्या वाटा वेगळ्या…
प्रणाली निघून जाते आणि सुमित तिथेच थांबतो, त्याचं मन सरसर भूतकाळात जातं…
2 वर्षांपूर्वी सुमित च्या वडिलांचे मित्र त्यांचा मुलीला, प्रणालीला घेऊन घरी आले. खूप दिवसांनी मित्र भेटल्याने दोघांच्या आनंदाला अगदी ऊत आलेला…प्रणाली आणि मी एकाच वयाचे असल्याने आम्हाला ते म्हणाले,
“तुम्हाला कंटाळा येईल आमच्या गप्पांनी..प्रणू बाळ, जा सुमित ला आपली बाग दाखव…मैत्री करून घे सुमितशी…”
प्रणाली नाक मुरडतच त्याला नेते…बागेत दोघेही जातात, प्रणाली काहीही बोलत नाही…सुमित ला प्रणाली पाहताक्षणीच आवडते..
“नाव काय तुझं?”
“प्रणाली…”
“छान आहे..”
“काय? नाव?”
“छे… तुमची बाग..”
प्रणाली ला नकळत हसू फुलतं..
हळूहळू दोघेही गप्पात रमतात..त्यांच्या या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात होतं… सुमित चं घरी कायम येणं जाणं चालू असायचं…दोघांच्या वडिलांची ईच्छा होती की या दोघांनी एकत्र यावं.. यांचं लग्न लावून द्यावं…कसला अडसर नव्हताच मुळी…
सुमित च्या प्रेमाबद्दल व्याख्या जरा वेगळ्या होत्या…प्रणाली सुमित ला तिच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी करत असे..त्याने प्रत्येक वळणावर सोबत असावं असं तिला वाटायचं…
दोघांच्याही घरात लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या, प्रणाली आणि सुमित, दोघेही खुश होते..कारण कसलाही विरोध न पत्करता दोघेही नव्या आयुष्याला सुरवात करणार होते..
एक दिवस प्रणाली गाडीवरून घरी येत असताना अचानक तिची गाडी बंद पडली…तिने लागलीच सुमित ला फोन केला…
“सुमित, गाडी बंद पडलीये… तू ये लगेच…”
“तू कुठे आहेस? आणि आजूबाजूला कोण आहे?”
“बरीच गर्दी आहे रे इथे…ऊन लागतंय खूप…तू ये आधी..”
सुमित जरा वेळ विचार करतो…
“मी जरा कामात आहे..मला यायला जमणार नाही..”
“काय? कसलं काम? अरे इथे मी संकटात आहे..”
“हे काही मोठं संकट नाही…तू जवळच्या गॅरेज ला गाडी ने, दुरुस्त कर आणि ये..” असं म्हणत सुमित ने फोन ठेवला…
प्रणाली चिडली… तावातावात गाडी लोटत गॅरेजमध्ये नेली, दुरुस्त करून ती गाडी चालवत घरी आली…
सुमित चा तिला रागच आलेला…तिने त्याच्याशी बोलणं बंद केलं…
नंतर एकदा प्रणाली चं काहीतरी सरकारी काम होतं, तिथलं ऑफिस आणि सरकारी प्रक्रिया तिला माहीत नव्हती…मग नाईलाजाने तिने सुमित ला सोबत यायला सांगितलं…त्याने पुन्हा तिला टाळलं…
प्रणाली ची सहनशक्ती सम्पली,
“आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत हा मला साथ देत नाहीये, आयुष्यभर काय साथ देईल…नाही, माझा आयुष्याचा प्रश्न आहे…या मुलासोबत मी खुश नाही राहू शकत…”
तिने आपला निर्णय घरी सांगितला, घरच्यांना धक्काच बसला…त्यांनी तिला खूप समजावलं पण सगळं व्यर्थ…
सुमित ला जेव्हा हे समजलं तेव्हा तो पुरता कोसळला…त्याचं जीवापाड प्रेम होतं…प्रणाली कडे तो गेला..
“प्रणू…विसरलीस आपलं प्रेम?”
“प्रेम आणि लग्न, निभावणं वेगळ्या गोष्टी आहे… नुसत्या प्रेमाच्या आणाभाका देऊन संसार करता येत नाही…तू साध्या सध्या गोष्टीत मला साथ देत नाहीस…कसं आयुष्य काढू मी तुझ्यासोबत?”
“प्रणाली..अगं मी ते मुद्दाम नाही केलं…तुला मला एक परिपूर्ण…”
“बस्स…काहीएक बोलू नकोस..यापुढे आपल्या वाटा वेगळ्या..”
“ठीक आहे…पण एक लक्षात ठेव..तुझ्या आयुष्यात सर्वात कठीण काळ जेव्हा येईल तेव्हा फक्त मीच तुझ्यासोबत असेन…तुझ्यासोबत पूर्ण जगाशी मी लढून जाईन..”
“कोण बोलतंय बघा…साधं गाडी बंद पडली तरी…आणि म्हणे कठीण काळात सोबत असेन….”
प्रणाली तिथून निघून गेली..दोघांच्याही घरचे तणावात होते..पण परिस्थिती पुढे त्यांनी हात टेकले..
नंतर प्रणाली च्या आयुष्यात सागर चं आगमन झालं. ती जिथे नोकरी करायची तिथेच तो नवीन जॉईन झाला होता…प्रणाली त्याला आवडायला लागली, एका महिन्याची ओळख…लागलीच त्याने तिला प्रपोज केलं…तिनेही घाईत त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण तिच्या मते तिला जो मुलगा अपेक्षित होता तो सागरच होता…ऑफिस मध्ये कधी कधी तिच्या वाटेची कामंही तो करायचा, तिने मदत मागितल्यावर एका हाकेशी तो हजर असायचा…अगदी रस्त्याने जाताना तिला दुकानातून काही हवं असेल तरी त्यानेच सगळं करायचं…सगळं त्याच्या हातात देऊन ती खरं तर पांगळी बनलेली.
घरी सागर बद्दल सांगितलं..प्रणाली चं लग्नाचं वय असंही झालंच होतं…घरच्यांनी लग्नाची तयारी करायला सुरुवात केली…अचानक सुमित आणि त्याचे आई वडील प्रणाली च्या घरी आले..प्रणाली च्या आई बाबांना जरा अवघडल्यासारखे झाले..पण ते म्हणाले..
“आपले संबंध जुळले नाही म्हणून काय झालं..प्रणाली माझ्या मित्राची मुलगी म्हणजेच माझी मुलगी आहे…आम्हालाही सहभागी होऊ दे तुझ्या कार्यात…”
प्रणाली च्या आई वडिलांचं मनातलं ओझं हलकं झालं…प्रणाली ने सुमित ला पाहिलं आणि तिला त्याच्या डोळ्यातील भाव पाहून गलबलून आलं..पण निर्णय पक्का होता…सागर सोबत लग्न करण्याचा…
अखेर लग्नाचा दिवस उजाडला…सुमित सकाळपासून धावपळ करत होता..समान आणण्यापासून ते पंगतीत वाढण्यापर्यंत…प्रणाली ते बघून जर ओशाळली, आपण इतका अपमान करूनही हा आपल्या भल्याचा विचार करतोय…प्रणाली त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली पण त्याने तिला प्रत्येक वेळी टाळलं…
लग्नाचा दिवस..प्रणाली लाल लेहेंग्यात तयार झाली, चेहऱ्यावर उठेल असा मेकअप…केसांचा छान अंबाडा.. फार सुंदर दिसत होती ती..आरशात स्वतःकडेच पाहत होती..पण मनात प्रचंड घालमेल…सागर सोबत लग्न करण्याचा निर्णय आततायी तर नाही ना? केवळ सुमित सोबत असलेल्या द्वेषाने मी हा निर्णय तर घेतला नाही ना?
वरात आली आणि तिच्या सर्व मैत्रिणी आणि बहिणी बाहेर गेल्या…खोलीत ती एकटीच होती…अचानक मागून सुमित आला..डोळे रडून लाल झालेले…दिवसभर काम करून थकलेला सुमित… प्रणाली ला त्याला मिठी मरावीशी वाटली, पण … वेळ निघून गेलेली…
सुमित म्हणाला…
“प्रेम…काय व्याख्या केलेली तू प्रेमाची? अगं वेडे माझं प्रेम कसं समजू शकली नाहीस? त्या दिवशी तुझी गाडी बंद पडली..मला येऊन मदत करायला काहीही अडचण नव्हती…पण आयुष्यातील लहानसहान संकटांना तू अश्याच दुसऱ्याच्या कुबड्या वापरल्या असत्यास? तुला सक्षम करावं, तुझ्यात धैर्य यावं…म्हणून मी तुला नाही म्हणालो..पण मी आलो होतो..तुझ्या मागे होतो, लपून सगळं बघत होतो..तू गाडी गॅरेज ला नेईपर्यंत बघत होतो लपून…तू अश्या अडचणींना सामोरं जायचं शिकलीस…मला हेच हवं होतं… नंतर त्या सरकारी कार्यालयात जाण्यास सुद्धा मी नाही म्हणालो..कारण तेच..तू स्वतः सगळं करावं..माझ्यातकच तूही कणखर बनावं… मला काय गं… तुझ्या कुबड्या बनून तुला पांगळं बनवता आलं असतं…पण जे आपल्याला पांगळं बनवतं ते कसलं प्रेम? प्रेम ते असतं जे एकमेकाला सक्षम बनवतं… स्वावलंबी बनवतं… पण आता…जाऊदे…सुखी रहा…”
सुमित निघून गेला…इकडे प्रणालीच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते…
“किती उदात्त प्रेम होतं सुमित चं… मी मात्र सागर च्या कुबड्या घेऊन पांगळी बनलेली…आणि त्यालाच प्रेम समजून बसली…”
मुलींचा आवाज आला तसे तिने डोळे पुसले, बहिणी तिला मंडपात घेऊन गेल्या.. पण मंडपात कुजबुज चालू होती…
“तुम्ही फसवलं आम्हाला…मुलीला मंगळ आहे, सांगितलं नाही…”
“अहो आमचा पत्रिकेवर विश्वास नाही आणि तुम्हीही कधी विचारलं नाही..”
“हो म्हणजे तुम्हाला बरंच झालं…मुलगी आमच्या माथी मारायला…उद्या आमच्या मुलाला काही झालं म्हणजे? ते काही नाही..हे लग्न मोडलं…चल सागर इथून..”
तो प्रसंग पाहून सर्वजण घाबरले, प्रणाली ला चक्कर यायचीच बाकी होती…तिने सागर कडे पाहिलं..तो आपल्या वाडीलांमागे उभा…त्याने प्रणाली कडे एक कटाक्ष पाहिलंही नाही…आणि गपगुमान बापमागे लहान मुलासारखा निघून गेला..
प्रणालीच्या वडिलांना भर मंडपात आपला असा अपमान सहन होत नव्हता…ते हात जोडत सागर च्या वाडीलांमागे धावायला लागले…इतक्यात सुमित मध्ये आडवा आला…त्याने वडिलांचे डोळे पुसले…त्यांना हात धरून मंडपात नेलं…
“प्रणाली…मी म्हटलं होतं ना..तुझ्या कठीण काळात मी कायम तुझ्या सोबत असेन…करशील माझ्याशी लग्न?”
मंडपात टाळ्यांचा एकच गजर झाला..प्रणाली ला आपलं प्रेम पुन्हा मिळालं… सुमित च्या आई वडिलांनी पुढे येऊन सुमित ला मिठी मारली…आणि ते ओरडले..
“वाजीव रे….वाजीव…आज होऊन जाऊ दे…”

समाप्त

Leave a Comment