पण यावेळी त्याला जास्तच त्रास होऊ लागलेला,
कशीबशी त्याने गाडी सुरू केली,
तिच्या नवऱ्याने त्याला थांबवलं,
“भाऊ तुम्हाला त्रास होतोय का काही? ठीक आहात ना?”
हो सर, बोलता बोलता त्याच्या डोळ्याची झापड अर्धवट होत होती..
तिच्या नवऱ्याला गांभीर्य लक्षात आलं, त्याने पटकन त्याला खाली उतरायला सांगितलं..
“आधी खाली उतरा…या आत खुर्चीवर बसा..”
“नको साहेब, माझ्या ऑर्डर पूर्ण झाल्या नाहीत तर लोकं उपाशी राहतील..”
“कुणी उपाशी राहत नाही, उतर..”
तो ऐकतच नव्हता,
“बरं किती ऑर्डर आहेत ?”
“इथल्या चार ऑर्डर आहेत..”
त्याने मोबाईल वर दाखवलं,
त्याला ते पत्ते आणि नावं ओळखीची होती,
तो म्हणाला, उतर खाली, हे जवळच राहतात , मी देऊन येतो..
“पण सर..”
नवऱ्याने ऐकलं नाही, जिथे जिथे गेला तिथे ऑर्डर डिलिव्हर करून त्यानं सत्य परिस्थिती कळवली, ग्राहकांनीही समजून घेतलं आणि चांगलं काम केलंत म्हणून अनेक आशीर्वाद दिले..
त्याला आत बसवलं, एव्हाना बायको आणि मुलगाही सगळं बघत होते,
त्यांनी त्या डिलिव्हरी बॉय ला आत नेलं,
बॉय कसला, पन्नाशीतला माणूस होता तो..
पोटासाठी जास्तीची कामं म्हणून डिलिव्हरी ची कामं त्याने घेतली होती..
बायकोने पटकन शेजाऱ्यांना बोलवून दवाखान्यात भरती केलं आणि नवऱ्याला तिकडे बोलावून घेतलं..
त्याचा BP खूप वाढला होता,
डॉकटर म्हणाले वेळेत आणलं..
त्याच्या भावाचा नंबर घेऊन त्याला हॉस्पिटलमध्ये बोलावलं आणि त्याच्या हाती सोपवून हे तिघे घरी जायला निघाले,
डिलिव्हरी बॉय च्या भावाने हात जोडले,
तुम्ही होतात म्हणून..नाहीतर माझा भाऊ इतक्या घरी फिरला, पण कुणाच्याही लक्षात आली नाही त्याची परिस्थिती..तुम्ही देवासारखे धावून आलात..
जातांना निशाच्या नवऱ्याचा नंबरही त्यांनी घेतला..
दोन दिवसांनी तो माणूस बरा होऊन घरी आला,
निशा आणि त्याच्या कुटुंबीयांना फोन करून अनेक धन्यवाद दिले..
भाग 3