अशिक्षित सून हवी (भाग 5)

शिखाला पत्रकारिता सोडणं अवघड होतं, काही महिन्यांचाच प्रश्न होता पण तिच्यातील पत्रकार तिला काही स्वस्थ बसू देईना…साहिलकडून तिने लॅपटॉप मागितला…तिच्या चॅनेल ची झालेली अवस्था तिने पहिली…अतिशय बकवास बातम्या आणि वाईट अग्रलेख…समाजात घडत असलेल्या गोष्टी अतिशय नकारात्मक पद्धतीने दाखवण्यात आलेल्या…लोकही आता मीडियाला नावं ठेऊ लागलेली… सगळीकडे फक्त आणि फक्त नकारात्मकता पसरत होती…

शिखाला बातमी लिहायला बाहेर पडणं आवश्यक होतं, पण तिथे तर ते काही शक्य नव्हतं. शिखाची सवय होती, एखादी बातमी ती पूर्ण शहानिशा केल्याशिवाय आणि स्वतः त्या ठिकाणी हजर असल्याशिवाय लिहीत नसे.

शिखाच्या सासऱ्यांना एकदा त्यांचे मित्र भेटायला आले..

“काय रावसाहेब… कसं चाललंय..”

“चाललंय देवाच्या कृपेने सगळं नीट..”

“आता शेती मार्गाला लागली, मुलंही संसाराला लागली…आता निवृत्ती घेणार का..”

“शेतकऱ्याला कसली आलीये निवृत्ती..”

“अहो श्रीमंत शेतकरी तुम्ही, तुम्हाला कसली कमी आहे..”

“बरोबर आहे म्हणा, उगाच खोटं रडगाणं कशाला गावं? आहे खरंच माझ्याकडे सगळं, पैसा आहे, कुटुंब आहे…”

“पण एक गोष्ट तुमच्याकडे नाही रावसाहेब..”

“कुठली??”

“सत्ता..”

“सत्ता??”

“होय…तुमच्याकडे आज पैसा आहे, जमीन आहे…तुम्हाला राजकारणात उतरायला काय हरकत आहे? पूर्ण गाव तुम्हाला ओळखतो..”

“नाही नाही…राजकारण म्हणजे..भ्रष्टाचार.. आरोप..प्रत्यारोप.. एक साधं जीवन जगत असलेला माणूस आहे मी…मला नाही सहन होणार हे सगळं..”

“हेच तर चुकतं रावसाहेब… राजकारण म्हणजे वाईटच… असं का वाटतं सर्वांना? उलट राजकारण म्हणजे समाजसेवेचं एक माध्यम.. तुम्ही असही गावातल्या लोकांना भेटतात, त्यांना आवश्यक वस्तू दान करता, अडीअडचणीला पैसेही पुरवता… राजकारणात गेला तर तुमच्याकडे लोकांना मदत करायला अजून संधी मिळतील..”

रावसाहेब विचारात पडतात, मित्र खरं बोलत होता..रावसाहेबांना समाजसेवेची आवड होती, पण कायद्याने त्यांना काही बंधनं येत होती..राजकारणात जाऊन ही बंधनं झुगारून देता येतील आणि उरलेलं आयुष्य समाजासाठी वाहून देता येईल असं त्यांना वाटू लागलं..

रावसाहेब जुन्या विचारांचे होते, घरात शिस्त रुजवली होती..पण मनात मात्र अपार माया, माणुसकी आणि दानशूरपणा होता..आपल्या सुनांना मुलांपेक्षाही जास्त जीव ते लावत. गावातल्या गावात जाताना सुनांना ऊन लागू नये म्हणून चारचाकी ची व्यवस्था करत..दरमहा सुनांच्या हातात भरघोस रक्कम त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी ठेवत..दिवाळीत सर्व सुनांना शहरातल्या मोठ्या साडीच्या दुकानात नेऊन हवी तेवढी खरेदी करण्यास सांगत आणि बिल स्वतः भरत.. अर्थात घरात स्त्रियांना बंधनं असली तरी हौसमौज मात्र खूप होती..त्यामुळे घरातल्या इतर सुना खुश असायच्या…पण शिखासाठी ही हौसमौज काहीही उपयोगाची नव्हती.. तिच्यासाठी स्वातंत्र्य हाच तिला मिळणारा खूप मोठा दागिना होता…

रावसाहेबांनी घरात सर्वांना राजकारणात प्रवेश करण्याबाबत विचारलं. काहींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली तर काहींना ते मान्य नव्हतं..
रावसाहेबांनी अचानक शिखाला विचारलं…

“शिखा बेटा, तुला काय वाटतं?”

अश्या अचानक प्रश्नाने शिखा दचकली, पहिल्यांदा या घरात कुणीतरी तिचं मत विचारलं होतं… कारण “चौथी नापास” का असेना..पण संसारात ती “हुशार” होती..

“बाबा..राजकारणात जायचा तुमचा हेतू शुद्ध आहे…तुम्हाला त्यातून समाजसेवा करता येईल..तुम्ही नक्कीच राजकारणात उतरा..”

सासरे हे उत्तर ऐकून खुश झाले..सासूबाई बघतच राहिल्या, आजवर त्यांना कधी मत विचारलं नाही पण सुनेला मात्र पटकन विचारलं…

रावसाहेब तयार होतात..

“पण बाबा एक मिनिट.”

“काय?”

“राजकारणात जायचं म्हणजे लोकांशी संपर्क हवा..प्रत्येक घराशी जवळीक हवी..तुमची हरकत नसेल तर मी..”

“बोल..बोल..”

“मी गावातल्या लोकांशी सम्पर्क करून त्यांच्याशी ओळख करून घेतली तर चालेल??”

“अगं काय बोलयतेस, आपल्या घरात स्त्रियांनी बाहेर पडायचे नाही असा नियम आहे..” सासूबाई म्हणाल्या..

“सुनबाई बरोबर बोलतेय..अहो उलट कौतुक वाटून घ्या तिचं… सासऱ्यांच्या कामात तिचा वाटा उचलतेय ती…सून म्हणून तिची जबाबदारी ओळखून आहे ती..”

सगळे अवाक होतात..शिखाने तर सर्वांचं मन जिंकलं होतं.. आणि आता तर तिला बाहेर पडायची परवानगीही मिळाली होती…

दुसऱ्या दिवशी ती सकाळची कामं आटोपत होती..सासूबाई जवळ आल्या..

“पोरी..इतकी वर्षे तुझ्या सासऱ्यांना ओळखू शकले नाही मी, पण तू मात्र त्यांच्या मनातलं ओळखून खूप समाधान दिलंस त्यांना…आता घरातली कामं आम्ही बघून घेत जाऊ, तू जा गावात तुझ्या कामाला..”

शिखाला हायसं वाटलं..ती तयार होऊन बाहेर पडते..

“अहो सुनबाई, पायी कुठे निघाल्या?? बाप्या… आपली स्कार्पिओ काढ.. सूनबाईला गावात ने..”

“नाही बाबा…आपल्याला साध्या माणसांमध्ये साधं बनुनच जावं लागेल..उगाच आपल्या श्रीमंतीचा दिखावा नको दिसायला..”

“वा सुनबाई..राजकारण अचूक ओळखता तुम्ही, पण सांभाळून जा हो..”

शिखा गावात प्रवेश करते…अनेक लहान मोठ्या झोपड्या असतात..लहान मुलं बाहेर खेळत असतात..बायका शेतात कामं करत असतात..त्यातल्याच एकीने शिखाला बघितलं..

“तू रावसाहेबांनी सून ना??”

“हो..”

“इकडे कुठे??”

“तुम्हालाच भेटायला आलीये..”

इतकी मोठी व्यक्ती आपल्याला भेटायला आली पाहून गावातली लोकं खुश होतात..शिखा एका घरात जाते, सर्वांची विचारपूस करते. तिच्या गोड बोलण्याने ती सर्वांचं मन जिंकते..त्या घरात एक म्हाताऱ्या आजीबाई कोपऱ्यात बसून असतात, कपाळावर कुंकू नसतं.. शांतपणे त्या सर्व बघत असतात..

“आजी…कश्या आहात..”

“बरी आहे बाई..म्हातारपण म्हटलं की दुखणं येणारच..”

“या आमच्या आई, आमच्या लहानपणीच आमचे वडील वारले.. आईनेच आमचा सांभाळ केला…”

एकट्या स्त्री ने नवरा नसताना इतकं मोठं कुटुंब सावरलं, मुलांना मोठं केलं, मार्गाला लावलं…अश्या खेड्यात आणि स्त्रियांना असलेल्या बंधनातही या स्त्रीने कसा संघर्ष केला असेल? कसं आपलं आणि आपल्या मुलांचं पोट भरलं असेल? याचं शिखाला कौतुक वाटलं..आजीने तिला आपला सगळा वृत्तांत कथन केला. लोकांची कामं करून रोज दीड रुपया मिळत असे, त्यात पीठ आणून मुलांना खाऊ घालत… सणावाराला जास्तीची कामं करून मुलांना गूळ आणून त्याचा शिरा करून घ्यायचा आणि स्वतः पिठात पाणी कालवून घाटा प्यायचा असं जीवन आजी जगलेल्या असतात…

ते सगळं ऐकून शिखाच्या अंगावर काटाच उभा राहिला…

घरी आल्यावर शिखाने विचार केला.. की मोठमोठ्या माणसांच्या संघर्षाच्या कहाण्या सगळेच ऐकतात…पण अश्या तळागाळातल्या माणसांचा संघर्ष लोकांसमोर आणला तर??

शिखा रात्रीतून तिचा लेख लिहिते…”संघर्ष” नावाचा…आणि तिच्या मीडिया कंपनीला ती देते..तो लेख निनावी वृत्तपत्रात आणि वेबसाईटवर प्रकाशित होतो…

दुसऱ्या दिवशी साहिल घरी येतो, कुणाशीही न बोलता खोलीत जातो…काहीतरी बिनसलेलं असतं त्याचं…

“साहिल काय झालं??”

साहिल काहीही बोलत नाही..

“साहिल..”

“शिखा…माझी नोकरी गेली..”

“ठीक आहे ना, दुसरी मिळेल.”

“तुला कळत नाहीये…आपल्याला आता इथेच राहावं लागणार…मुंबईत जाण्याचा मार्ग बंद झालाय…lockdown सुरू आहे…आता नवी नोकरी मिळणं शक्य नाही..”

शिखाला धस्स झालं…इतके दिवस फक्त “काही दिवसांचा प्रश्न आहे” या गोष्टीवरून शिखा स्वतःचं समाधान करून घेत होती… पण आता? सगळे मार्ग बंद झाले…

इतक्यात शिखाला फोन येतो..

“शिखा..तुझा संघर्ष नावाचा लेख व्हायरल झालाय…वृत्तपत्राचा खप अचानक वाढलाय…लोकांनी या लेखाला डोक्यावर घेतलं आहे…आपल्याला अजून अश्या कथा लिहाव्या लागतील…”

क्रमशः

7 thoughts on “अशिक्षित सून हवी (भाग 5)”

  1. pudache bhag prakashit karayla khup vel lavata…tyamule kathechi link tutate va kathetil interest nighun jato….mag ti kathe peksha apurna laghukathach batate….kitithi interesting story asaali tari…

    Reply
  2. pudache bhag prakashit karayla khup vel lavata…tyamule kathechi link tutate va kathetil interest nighun jato….mag ti kathe peksha apurna laghukathach batate….kitithi interesting story asaali tari…

    Reply
  3. pudache bhag prakashit karayla khup vel lavata…tyamule kathechi link tutate va kathetil interest nighun jato….mag ti kathe peksha apurna laghukathach batate….kitithi interesting story asaali tari…

    Reply
  4. पुढील भाग प्रकाशित केला आहे, मी प्रयत्न करेल लवकरात लवकर पुढचे भाग पोस्ट करण्याची

    Reply

Leave a Comment