अरे संस्कार संस्कार..

 “अरे संसार संसार…”

गाणं गुणगुणत शैला स्वयंपाकघरात कामं करीत होती. काम करता करता भाजीपाला किती संपला, किराणा काय आणावा लागेल, मुलांना सुट्टीच्या दिवशी कुठे न्यायचं, डब्याला काय द्यावं, नाश्त्याला काय करावं असे एक ना अनेक विचार मनात घोळत होते, तेवढं करून तिला संध्याकाळी पुन्हा सोसायटीतल्या बायकांसोबत गणपती उपक्रमांबद्दल चर्चा करायला मिटिंग साठी जायचं होतं, त्यामुळे ती हात भराभर चालवत होती. जायच्या आधी टोपलंभर भांडी लावायची होती आणि स्वयंपाकही करून जायचा होता. सोबतच गाणं सुरूच होतं..

“अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर..
आधी हाताला चटके..तवा मिळे भाकर..”

भांडे लावताना एक भांडं काढलं की दुसरं खाली पडायचं, काय करणार, भांडीच इतकी निघायची..भांडी जागेवर लावताना आवाज होई, एक भांडं काढलं की दुसरं निसटून जाई..

दुसऱ्या खोलीत सासूबाई tv बघत बसलेल्या, त्यांना हा आवाज काही सहन होईना, त्या म्हणाल्या..

“शैला आवाज काय करतेय इतका…जरा हळू ना..”

शैलाच्या कुठल्याही कामाचं त्यांना जीवावरच येई, मुळात त्यांच्या घरात त्यांची मुलं सोडून तिसरी व्यक्ती आलेली त्यांना सहनच होईना..त्यामुळे शैलाला बोलायची एकही संधी त्या सोडत नसत. शैलाही आजवर कटकट नको म्हणून ऐकून घेई, पण आपण बाहेर जायच्या आधी घाईने काम उरकून घेतोय त्यात मदत तर नाहीच, वर कुरबुर सुरू केल्याने शैलाचीही सहनशक्ती सम्पली.. तीही म्हणाली,

“एवढी सगळी भांडी लावताना आवाज तर होईलच ना..बिना आवाजाचे भांडी लावता तरी येतील का??”

तिच्या या उत्तराने सासूबाई अजून चिडल्या..

“मला माहितीये, तू मुद्दाम आदळआपट करते..तुझ्या जीवावर येतं कामं करायला..एक काम धड करत नाहीस..”

“मुद्दाम आणि आदळआपट?? मुळात माझी अशी वृत्ती नाही, आदळआपट करून मला काय मिळणार?”

शब्दाला शब्द लागत गेला..आणि शेवटी सासूबाईंनी शैलाचे संस्कारच काढले..

“दिसले हो तुझे संस्कार, असं बोलायला शिकवलं ना तुझ्या आई वडिलांनी??”

सगळ्या गोष्टी फिरून फारुन संस्कारांवर का येतात हे शैलाला समजेना..

हे सुरु असतानाच तिचे मोठे जेठ घरी आले, अन आल्या आल्या चिडचिड सुरू केली..

“आई मला अंघोळ करायची आहे, माझा टॉवेल अन कपडे कुठेय??”

“बघ तिथेच.”

“काय तिथेच, तुला समजत नाही का?रोजचं आहे तुझं…कधीच वस्तू जागेवर नसतात.. डोकंच नाही काही…बडबड करता येते फक्त…”

त्याचं हे बोलणं ऐकून सासूबाई गांगरून गेल्या..शैला पुन्हा गुणगुणायला लागली, त्याच चालीत, फक्त शब्द वेगळे..

“अरे संस्कार संस्कार, आई वडिलांचे सार..
आधी द्यावे लेकरांना, मग सांगावे जनाला..”

Leave a Comment