हस्तक्षेप-2

ओमला बहीण नव्हती आणि सियाला भाऊ. ओम आपली बहीण म्हणून सियाला कायम मदत करायचा, सियाच्या आई वडिलांनाही ओम असल्याने काळजी नव्हती. कॉलेजला जाताना, येतांना ओमच्या मागोमाग तिची गाडी असे. तिला कॉलेजमध्ये उशीर होणार असेल तर ओमवर तिची जबाबदारी असे. अगदी सख्ख्या भाऊ बहिणीसारखं त्यांचं नातं होतं.

श्रेयस आणि सियाचं बॉंडिंग बघून ओमला खात्री पटली की आपल्या बहिणीसाठी श्रेयस उत्तम आहे. ओमने सियाला श्रेयस बद्दल विचारलं,

“सिया, तुझं श्रेयसवर प्रेम आहे का?”

“ओम, काहीही काय..”

“लाजू नकोस, खरं खरं सांग..”

सिया घाबरली, तिचं प्रेम होतं पण ओम समोर कसं सांगायचं? लहानाचे मोठे सोबतच झालेले, आपोआप मोठ्या भावासारखा धाक तिच्या मनात होताच…

“हे बघ घाबरू नकोस, मी काही रागावणार नाही तुला..”

सियाने बिचकतच हो म्हणून सांगितलं…

आता मात्र ओमची जबाबदारी वाढली.

ओमने आधी श्रेयसची पूर्ण पारख केली. त्याच्या घरचे, त्याचा पुढचा प्लॅन, त्याच्या सवयी या सर्वांची आधी माहिती घेतली. म्हणता म्हणता श्रेयस आणि ओम सुद्धा चांगले मित्र बनले.

सियाच्या घरी जेव्हा सांगायची वेळ आली तेव्हा आई वडिलांनी सुरवातीला नकार दिला, तेव्हा ओम पुढे झाला आणि त्याने आई वडिलांना समजवल,

ओमने हिरवा कंदील दाखवला मग आई वडिलांना नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. कारण मोठा भाऊ म्हणून त्याने सियाची घेतलेली काळजी त्यांनी पाहिलेली होती. सिया साठी श्रेयस चांगला आहे हे म्हटल्यावर आई वडिलांनी क्षणात आपलं मत बदललं आणि दोघांना संमती दिली.

सिया आणि श्रेयसचं लग्न झालं. ओम त्यांचा संपर्कात असायचा, दोघांचं नीट चाललंय ना याकडे पुरेपूर लक्ष द्यायचा.

दोघेजण सुखाने संसार करत होते. सिया आणि श्रेयस दोघेही नोकरी करायचे. घरकाम दोघे मिळून करायचे, सिया भाजी टाकायची तोवर श्रेयस कणिक मळायचा, ती पोळ्या करायची तोवर श्रेयस झाडू मारून घ्यायचा. दोघेही एकत्रच बाहेर पडत आणि एकत्रच घरी येत.

386 thoughts on “हस्तक्षेप-2”

Leave a Comment