स्त्री-2 अंतिम

“पॅकिंगला मदत करू का?”

“म्हणजे, तुम्हाला चालेल मी गेलेलं?”

“तुझ्या जागी मी असतो तर ? मला चालण्याचा प्रश्नच नाही, तुला संधी आलीये तुला जायलाच हवं..”

तिला आनंदाने भरून आलं, शेवटी निवड चुकली नव्हती…

अचानक काळाने घाला घातला आणि त्याच्या वडिलांना ऍटॅक आला,

सर्वांचं म्हणणं होतं की तिने जाण्याचा निर्णय सोडावा, सासू सासऱ्यांची सेवा करावी,

ती दुविधेत सापडली, पण तिच्या नवऱ्याने स्पष्टपणे सांगितलं,

माझे वडील आहेत, मी काळजी घ्यायला समर्थ आहे, त्यासाठी काल आलेल्या मुलीला तिच्या स्वप्नांवर पाणी सोडायला मला आवडणार नाही,

त्याच्या आईला हे आवडलं नाही, आपल्या बायकोला त्याने घरीच रहायला सांगावं असं त्याला वाटायचं, पण त्याने कुणाचंही ऐकलं नाही..

ती अमेरिकेला गेली, तिथेही तिने आपल्या हुशारीचा ठसा उमटवला..

इकडे वडिलांची तब्येत खालावत चालली होती, त्यांना उठायला बसायलाही त्रास होई, त्याच्या आईची चिडचिड व्हायची,

“सून असून काय उपयोग? सगळं माझ्यावरच आलं शेवटी..”

पण तो या कुरबुरीकडे दुर्लक्ष करत राहिला..

एके दिवशी तिचा फोन आला,

“सर्वांची तिकिटं तयार आहेत, पुढच्या महिन्यात सर्वांनी इकडे या..बाबांच्या उपचारासाठी..”

तिने अमेरिकेत एका मोठ्या दवाखान्यात सासऱ्यांचं नाव नोंदवलं, त्या हॉस्पिटलमध्ये सर्व मोठी लोकं, सेलिब्रिटी जात असत…सर्वात महागडं पण निष्णात डॉक्टर तिथे असायचे..

वडिलांना तिथे नेण्यात आलं, काही महिन्यांच्या ट्रीटमेंटनंतर सासरे इतके बरे झाले की स्वतःचं सगळं स्वतः करू लागले, इतकंच नाही तर गाडी चालवणं, फिरणं अगदी आधीसारखं करू लागले, सासूबाईंना ते बघून खुप आनंद झाला, कारण पुढचं सगळं आयुष्य आता यांचं आजारपण काढण्यात जाईल असं त्यांना वाटत होतं. त्यांचं बाहेर जाणं बंद झालेलं, बाहेरून काही आणायचं म्हटलं की स्वतः करावं लागायचं…

पण आता सगळं बदललं,

सगळं आधीसारखं झालं,

काय झालं असतं जर आपल्या हट्टापायी सुनेला घरीच बसवलं असतं तर? रोज उठणं घरातलं करणं, स्वयंपाक करणं, खाऊ घालणं आणि उष्टी काढणं..यातच दिवस निघून गेले असते, आणि यात सासऱ्यांचं आजारपण काढतच एकेक दिवस गेला असता..

केतकी अमेरिकेला गेली तेव्हापासूनच तिने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते,

आज तिच्यामुळे सर्वांच्या जीवनात पुन्हा एकदा बहार आली..

तात्पर्य:

स्त्री कितीही हुशार असली, कितीही कर्तृत्ववान असली तरी आपल्या कुटुंबाचा विचार ती आधी करते आणि आपल्या कुवतीनुसार कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करते.

1 thought on “स्त्री-2 अंतिम”

Leave a Comment