शापित अप्सरा भाग 41 ©प्रशांत कुंजीर

मागील भागात आपण पाहिले की सुगंधा आणि केशर त्या स्त्री शिल्पाबद्दल अधिक जाणून घ्यायचे ठरवतात. तर दुसरीकडे त्यांच्यावर हल्ला होतो. तेव्हा सुभानराव त्यांना वाचवतात. महादेवाच्या दर्शनाला बरोबर जायला सुगंधा होकार देते. आता पाहूया पुढे.सुगंधा आत आली.”रखमा,आंघोळीची तयारी कर.” तिने रखमाला आत बोलावून सांगितले.”सुगंधा,तू बरोबर जायला हो का म्हणालीस?” केशर चिडली.
“केशर, काल रात्री त्यांनी आपल्याला वाचवले आहे. फक्त देवदर्शन करायला काय हरकत आहे.”सुगंधा हसून म्हणाली.”सुगंधा,त्यांनी एका चेटकीण स्त्रीला पकडले आहे. त्यांच्यावर आणि आपल्यावर हल्ला करण्यात तिचा हात असेल का?” केशरने विषय बदलला.”केशर,सगळे पुरुष सारखेच असतील असे नाही ना?” सुगंधाने शांतपणे समजावले.”नसतील सुद्धा,फक्त तुझी फसगत व्हायला नको.” केशर अजूनही साशंक होती.तेवढ्यात रखमाने आंघोळीची तयारी झाल्याचा निरोप दिला. एका घंगाळात चंदन,दुसऱ्यात गुलाबजल, तिसऱ्यात आणखी काही दिव्य औषधी अशी पाच घंगाळे होती. सुगंधाने आपले रेशमी केस सोडले.
“सुगंधा थांब,केसांना छान औषधी द्रव्य लावून देते.” केशर तिचे केस हातात घेऊन औषधी द्रव्य लावत होती.”चेटकीण बाईची जादू तिच्या येणीत असती अस माझी आजी सांगायची.” रखमा पटकन म्हणाली.”रखमा,तू साड्या आणि दागिने काढून ठेव जा.” केशरने विषय बदलला.”केशर,माझ्या रक्तात काळ्या जादूचा अंश आहे. हे सत्य कधीही बदलणार नाही.” सुगंधाच्या डोळ्यात एक अश्रू नकळत आला.
” सुगंधा,देवाच्या दर्शनाला जाताना प्रसन्न मनाने जावे.”कोमट पाणी अंगावर घालत केशर म्हणाली. दोघी स्नान उरकून तयार व्हायला गेल्या.मोतिया रंग आणि लाल काठ असलेली अस्सल सोन्याची जर वापरलेली कांजीवरम,त्यावर साजेशी कंचुकी,पाठीवर घनदाट केसांची सैलसर वेणी आणि त्यात खोवलेले सोन्याचे फुल,गळ्यात तन्मनी, चिंचपेटी,हातात मोत्याच्या बांगड्या,कपाळावर कोरलेली चंद्रकोर आणि टपोऱ्या डोळ्यात घातलेले काजळ. केशर आणि सुगंधा जणू इंद्र दरबारातील अप्सरा भासत होत्या.”सुगंधा, तिट लावते. कोणाची नजर नको लागायला.” केशरने एक काजळाचे बोट तिच्या कानामागे लावले.”केशर,आजही तितकीच रसरशीत आणि सुंदर दिसतेस तू.” कानावरून बोटे मोडत सुगंधा म्हणाली.
“मी सहस्त्र बेलांच्या पानाचा हार बनवते आहे. सोबत पांढरी फुले घेऊ.”सुगंधा हार ओवायला बसत म्हणाली.इकडे सुभानराव अंघोळ करून बाहेर आले. रुंद भरदार खांदे,दंड आणि हाताचे पिळदार स्नायू, पौरूष दाखवणाऱ्या पुष्ट मांड्या, बाकदार नाक,पाणीदार डोळे आणि पिळदार मिशा. कोणतीही स्त्री त्यांना किमान एकदा पाहिल्याशिवाय पुढे जात नसे.त्यांनी मोतिया रंगाचे रेशमी धोतर नेसले. ज्यात त्यांचा पुरुषी मजबूत बांधा अजून आकर्षक दिसत होता. कपाळावर चंद्रकोर कोरली,हातात आणि पायात सोन्याचे कडे घातले आणि पूजेचे साहित्य घेऊन यायचा हुकूम दिला.सुगंधा आणि केशर त्यांच्या साथीदारांना घेऊन बाहेर पडल्या. इकडे इनामदार देखील बाहेर पडले. सुगंधा हातात पूजेचे ताट घेऊन चालत येताना आपले हृदय तिथेच थांबले आहे असे सुभानरावांना वाटले.
चंचले तू चालत येता मस्तीने,कैक हृदये तव चरणावर वाहिली.मनातून काव्य स्फुरत होते परंतु तितका निवांतपणा नव्हता. सुभानराव भान हरपून सुगंधाकडे बघत होते.”नाची हाय ती माझ्यासारखीच.” मागून कमळाचा नखरेल आवाज येताच इनामदार गरकन मागे वळले.कमळा देखील हट्टाने सोबत आली होती. तिने सुगंधाला बघितले.”बया, सुगंधा हाय ही. तमाशा सोडून आशी भटकत आसती बया.”ती स्वतः च्या मनात म्हणाली आणि तिने सुगंधाला मोठ्याने हाक मारली.”सुगंधा हिकड कुठं? सुपारी हाय व्हय?” तिने मुद्दाम विचारले.”कमळा फक्त सुपाऱ्या घेऊन जगायची आम्हाला गरज नाही.”केशर धारदार आवाजात म्हणाली.”बया,आता तमाशात नाचणारी आणि कशाला फिरल? उगा ताकाला जाऊन भांड लपवायच.”असे म्हणून कमळा पुढे निघाली.”तू इथे कशी? कोणाचा हात धरून आलीस?” केशरने तिला डिवचले.पण उत्तर द्यायच्या आधीच प्रवास सुरू करायचा आदेश आला. सगळेजण दर्शनाला निघाले.सुगंधा आणि केशरला बघून कमळा अस्वस्थ झाली. सुगंधा इनामदारांच्या आयुष्यात येणे म्हणजे त्यांना उद्वस्त करणे आणखी कठीण जाणार होते. सुगंधा आणि केशर यांना आजवर कोणताही जमीनदार,वतनदार हातही लावू शकला नव्हता.कोणती शक्ती त्यांचे रक्षण करायची कोणालाच ठाऊक नव्हते.कमळा विचारांच्या तंद्रीत चालत असताना ठेच लागून तिचा तोल गेला. पुढे नेमके सुभानराव होते. त्यांनी तिला सावरले.”तुमच्या मिठीत लई ग्वाड वाटतंय.” कमळा हळूच म्हणाली.सुभानराव आता काहीच बोलू शकले नाहीत. त्यांनी तिला बाजूला केले.”तोल सुटेल इतके नको तिथे गुंतू नये.” केशर हसून म्हणाली.”कवातरी जातोय तोल. माणूस म्हणल की तोल जायचाच.” कमळा उसने हसू आणून बोलली.लांबूनच सुंदर असे शिवालय दिसू लागले. हजारो वर्षे पुरातन असलेले,सह्याद्रीच्या कातळात कोरलेल्या अप्रतिम कामाचा मापदंड असलेले मंदिर पाहूनच मनातील सगळी नकारात्मकता पळून गेली.तिथे पूजा करायला बाजूच्या गावातून ब्राम्हण सकाळ संध्याकाळ येत असत. आज इनामदार अभिषेक करणार असल्याने ते खास उपस्थित होते. सुगंधा आणि सुभानराव एकत्रित आत आले. गाभाऱ्यात त्यांनी पिंडीला हात लावला आणि उजव्या बाजूचे फुल सुगंधाच्या हातावर पडले.”तुमची जोडी केवळ मृत्यूच फोडू शकेल. अखंड सौभाग्यवती भव.” त्यांनी आशीर्वाद दिला.”महाराज,आम्ही पती पत्नी नाही आहोत. आपली काहीतरी गफलत झाली असेल.” सुगंधा अदबीने म्हणाली.” ह्या शिवालयात बोलला गेलेला कोणताही शब्द कधीच खोटा होत नाही. आपण पूजेला सुरुवात करू.”पुजारी मंद स्मित करून पूजेला बसले.पवित्र मंत्रांच्या जपाने वातावरण व्यापून टाकले. अखंड अभिषेक सुरू झाला. रुद्राभिषेक संपला आणि अचानक घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ लागला. खंडोजी धावत मंदिरात शिरला.”मालक घात झाला. समद्या देवळाला घेरल हाय.””कुणाची हिंमत झाली आमच्यावर हल्ला करायची?” सुभानराव पिसाळले.”इंग्रज सैनिक हायेत. सोबत बजाजी हाय त्यांच्या.”खंडोजी अधिक माहिती पुरवत होता तोपर्यंत एक शत्रू सैनिक निरोप घेऊन आला देखील.” सुभानराव तुम्ही बरोबर असलेली संपत्ती आणि स्त्रिया ताब्यात देऊन शरण यावे तुम्हाला जिवंत सोडले जाईल.”सैनिकाने निरोप सांगितला.” प्राण गेले तरी हा सुभानराव असे करणार नाही. जाऊन सांग तुमच्या सेनापतीला.”सुभानराव गरजले.”सुगंधा,आपण आपल्या शक्ती वापरून यांना सहज हरवू शकतो.” केशरने तिला कानात सांगितले.”केशर,त्यासाठी आपल्याला संमोहन टाकावे लागेल आणि इतक्या मोठ्या जमावाला संमोहित करणे शक्य नाही.”सुगंधा म्हणाली.तेवढ्यात बाहेरून गोळीबार सुरू झाला आणि नाईलाजाने सुभानराव आणि बरोबर असलेले लोक गाभाऱ्यात लपले. इतर सगळे लोक छावणीवर पकडले गेले होते.”असे लपून बसणे काय कामाचे? सरळ हल्ला करून वेढा फोडू.” अंतोजी म्हणाला.”तसे करणे धोक्याचे आहे. आपल्याला ह्या जंगलाची माहिती नाही. वेढा फोडून जाणार कोणत्या दिशेला?”केशरने विचार मांडला.तेवढ्यात पुजारी हळूच म्हणाला,”इथे कुठेतरी गुप्त कळ आहे. खाली तळघर असल्याचे मी ऐकले आहे. पण पाहिले मात्र नाहीय.””सर्वांनी गाभारा नीट शोधा.” सुभानराव म्हणाले.तोपर्यंत ब्रिटिश सैन्य आत शिरले होते. गाभाऱ्याच्या दरवाजावर गोळ्या बरसू लागल्या. त्यातील एका गोळीने सुभानरावांच्या खांद्याचा वेध घेतला. सुभानराव कोसळले. आता कोणत्याही क्षणी कैद होणार. तेवढ्यात केशरने ती कळ ध्यान लावून शोधली आणि क्षणात सगळे तळघरात कोसळले.खाली कोसळताच सगळेजण बेशुद्ध झाले. बऱ्याच वेळाने सुगंधा आणि केशर शुद्धीवर आल्या.”केशर,हे गुप्त दालन आहे. आधी उजेड शोधला पाहिजे.”केशरने अग्नी मंत्र जपला आणि तिच्या अंगातून प्रकाश दिसू लागला.त्याबरोबर तिथे लावलेल्या मशाली दिसल्या आणि मग आपल्या शक्तींनी त्यांनी त्या प्रज्वलित केल्या. समोरचे दृश्य पाहून ह्या दोघी अचंबित झाल्या. सगळ्या भिंतीवर मंत्र कोरलेले होते.”केशर बघ. ह्या मंत्रांच्या मदतीने तो अमर होण्याचा ग्रंथ मिळेल.” सुगंधा मजकूर वाचून म्हणाली.”सुगंधा,असे अमर आयुष्य तुला हवे आहे?” केशरने विचारले.”अर्थातच नाही. पण हा ग्रंथ सुरक्षित ठेवायला हवा.”केशर आणि सुगंधाने भिंतीवर लिहिलेले मंत्र वाचायला सुरुवात केली संपूर्ण मंत्र वाचताच ते मंत्र लिहिलेल्या लेपाने पेट घेतला आणि एक दिव्य ग्रंथ प्रकट झाला. त्याच्या पहिल्या पृष्ठावर तेच शिल्प होते जे त्यांना सापडले. फक्त त्याखाली असलेला मजकूर इथे नव्हता.तेवढ्यात सुभानराव असह्य वेदना सहन न होऊन ओरडले. केशरने ग्रंथ लपवला आणि त्यांनी सुभानराव आणि त्यांच्या सोबत असलेल्यांना शुध्दीवर आणले. रखमादेखील शुद्धीवर आली. आता ह्या तळघरातून बाहेर पडणे आवश्यक होते.”ह्या मशाली सर्वांनी हातात घ्या. आपल्याला भुयारातून पुढे जावे लागेल.”केशर सगळ्यांना एकत्र करत म्हणाली.”साजगाव पर्यंत पोहोचायला हवे.”सुभानराव पुटपुटले.केशर आणि सुगंधा निर्धास्त होत्या. त्यांच्या सोबती योगिनी नक्कीच बाहेर वाट पाहत असणार होत्या. सगळेजण भुयार जिकडे दिसते तिकडे चालू लागले.थोडा वेळ गेल्यावर पायाखाली पाणी जाणवू लागले. बर्फसारखे गार असलेल्या पाण्यातून सारेजण चालू लागले.थोड्याच वेळात बाहेर प्रकाश दिसू लागला जिथे सुगंधाच्या साथीदार तिची वाट बघत होत्या.योग शक्तीमुळे सुगंधा आणि केशर दोघी सुखरूप होत्या. बाकी सगळ्यांवर तातडीचे उपचार करायला सुगंधा आणि केशरने सुरुवात केली.सुभानराव जवळजवळ बेशुद्ध होते. त्यांच्या शरीरातून गोळी बाहेर काढली तरी त्यांचे शरीर थंड पडत चालले होते.सुगंधा इनामदारांना वाचवू शकेल का?अमर होण्याचा ग्रंथ काही संकटे घेऊन येईल का?सुभानराव आणि सुगंधा जवळ येतील का?वाचत रहा.शापित अप्सरा.©®प्रशांत कुंजीर.

Leave a Comment