शापित अप्सरा भाग 38 ©प्रशांत कुंजीर

शापित अप्सरा भाग 38मागील भागात आपण पाहिले की सुगंधाचे अपहरण करण्याचा प्रयत्न अपयशी झाला. त्यानंतर गुणवंताबाईंनी सुगंधा योगिनी असल्याचे शोधून काढले आणि काहीही झाले तरी सुगंधाला धडा शिकवायचा त्यांनी निश्चय केला आता पाहूया पुढे.सुगंधा निघून गेली आणि सुभानराव तसेच उभे होते. आजवर कोणतीही स्त्री अशी त्यांना अव्हेरून गेली नव्हती. खरतर पूर्वीचे सुभानराव असते तर त्यांनी सुगंधाला बळजबरी मिळवायचा प्रयत्न केला असता.सुगंधा देवीचे दर्शन घेऊन आली. तिला अजूनही सुभानराव समोर दिसत होते. इकडे सुभानराव वाड्यावर आले आणि त्यांनी शिकारीला जायची तयारी करायचा हुकूम सोडला. उत्सव चालू असताना असे बाहेर जाणे कशाला? सगुणाबाई हा विचार करून अस्वस्थ होत्या. त्यांनी त्यांची माणसे लावून सुगंधा आणि सुभानराव याबद्दल सगळी माहिती मिळवली होती. सुगंधा आणि तिचे अप्रतिम लावण्य पाहून सगुणाबाई अस्वस्थ झाल्या होत्या. आजवर कितीतरी स्त्रिया आल्या अन गेल्या पण सगुणाबाई कधी एवढ्या अस्वस्थ झाल्या नव्हत्या. त्यांनी तडक दालन गाठले.
“आजच शिकारीला जायचे अचानक कशासाठी ठरले?” सगुणाबाई पानाचा विडा देताना हळूच म्हणाल्या.”सगुणाबाई,आता शिकारी तुम्हाला विचारून ठरवायच्या का?” सुभानराव चिडले. सगुणाबाई रागाने बाहेर पडल्या.”सुगंधा,रियाजाची वेळ झाली.” केशरने आवाज दिला.सुगंधा तयार होऊन बाहेर आली. कमरेवर मोकळे सोडलेले केस,कपाळावर चंद्रकोर,टपोऱ्या पाणीदार डोळ्यास विलसत असलेले हसू आणि कमालीचा आत्मविश्वास घेऊन सुगंधा गायला बसली.तिने तंबोरा हातात घेतला आणि स्वर्गीय सुर बरसू लागले.आम की बगियन मे खडी सावरे, मैं तेरी राह देखू |प्यार में तेरी मे दिवानी, जोगन बनके जग घुमू |आजा सावरे घर मोरे तू बिरहा की आग बुझा दे |रंग मे तेरे मोहे रंग दे,प्यार की बारिश कर दे|तल्लीन होऊन सुगंधा गात होती. तिचे गायन थांबले आणि केशर तिच्याजवळ आली.”सुगंधा,तू फक्त शास्त्रीय संगीत गात असतीस तर आज तुझे नाव आदराने घेतले असते.”
“केशर,कला फक्त कला आहे. लावणीच्या घुंगराने मला माझ्यातली मुक्त सुगंधा शोधून दिली. मला त्यांचा कधीच तिटकारा नाही वाटत.” सुगंधाने सहज उत्तर दिले.सुगंधाने गायलेले स्वर्गीय सुर रात्रीच्या निरव शांततेत दूरवर ऐकू जात होते. सुभानराव आपल्या दालनात तो स्वर्गीय आवाज तल्लीन होऊन ऐकत होते. मागे येऊन उभ्या राहिलेल्या सगुणाबाई आपल्या नवऱ्याचे हे रूप प्रथमच पहात होत्या. त्या शांतपणे पलंगावर झोपायला गेल्या.डोळे मिटूनही त्यांच्या मनातील कोलाहल थांबत नव्हता. सुगंधा त्यांच्या आयुष्यात येणार ह्याची त्यांना खात्री होती. फक्त तिला त्यांचे स्थान मिळू नये एवढीच धास्ती त्यांचे मन अस्वस्थ व्हायला पुरेसे होते.
“सुगंधा, सुभानरावबद्दल काय विचार केला आहेस तू?” केशरने तंबोरा जागेवर ठेवत विचारले.”केशर,माझे उत्तर ते स्वीकारतील का?” सुगंधा हसत केसांचा अंबाडा वळू लागली.”समज त्यांनी तुझी अट मान्य केली तर?” केशरने परत विचारले.”तर… मी त्यांचा स्वीकार करेल. तसा शब्द दिला आहे मी.” सुगंधा म्हणाली.”पण ते सगळे खूप अवघड असेल. योगिनी आहोत आपण. आपल्याकडे असलेल्या शक्ती सांभाळून संसार करणे कठीण.”केशरने दुधाचा प्याला देताना शंका व्यक्त केली.”केशर,ह्या शक्ती माझी ताकद आहेत. त्या मला कायम सुरक्षित ठेवतील.” सुगंधा हसली.”सुगंधा इथून पंचवीस मैलांवर एक प्राचीन शिवालय आहे. उद्या तिथे जायचे माझ्या मनात होते.”केशरने परवानगी विचारली.”छानच की,नक्की जाऊ आपण. आपल्या माणसांना तयारी करायला सांग आणि आता समईतली वात मालव.”दोघींनी उद्याचा मनसुबा ठरवला आणि झोपेच्या स्वाधीन झाल्या.
“आमची न्याहारी तयार आहे ना? आम्हाला निघायचे आहे.” सुभानरावांनी आवाज दिला.”सगळी तयारी झाली आहे. पण मी काय म्हणते उत्सव संपला की गेले तर नाही चालणार का?” सगुणाबाई शेवटचा प्रयत्न करत होत्या.”सगुणाबाई,आता तीन दिवस गावकरी कार्यक्रम करणार. त्यानंतर इनामदार घराण्याचा मान असेल. तेव्हा आम्ही वेळेत परत येऊ.”तलवार कंबरेला लावत त्यांनी कठोर आवाजात उत्तर दिले.खंडोजी दालनाबाहेर तयारीत उभा होता.”खंडोजी,सगळी तयारी झाली का?” आतून आवाज आला.”व्हय मालक. समदी तयारी झाली हाय.” खंडोजीने उत्तर दिले.”ठीक आहे. आम्ही न्याहारी करून आलोच.” सुभानराव दालनातून बाहेर आले.
“म्या फूड जाऊन थांबतो मालक.” खंडोजी तिथून बाहेर पडला.”सुभानराव,आता मध्येच शिकारीचा बेत?” खाली आल्यावर गुणवंताबाई म्हणाल्याच.”आईसाहेब,बरेच दिवस झाले शिकार झाली नाही. जरा गंज चढलेले भाले आणि तलवारी त्यानिमित्त बाहेर काढू.” त्यांनी हसून उत्तर दिले.”बर,पण जरा जपून.” गुणवंताबाई उत्तरल्या.”आबासाहेब कसे आहेत?” सुभानराव हळू आवाजात म्हणाले.”पक्षाघात आहे,आमचं कुंकू बळकट म्हणून ते आहेत इतकेच.” निराश होऊन गुणवंताबाई उत्तरल्या.” बरय,येतो आम्ही.” सुभानराव उठले.” सुभानराव तिकडे एक प्रसिद्ध शिवालय आहे. अभिषेक करायला विसरू नका.”होकारार्थी मान डोलवत इनामदार बाहेर पडले.समोर अंतोजी आणि सोबत कमळा होती.”अंतोजी, जनाना कशाला सोबत?” आवाजाला नकळत धार आली.”दादा, आमच्या पत्नी आहेत त्या. त्यांना शिकार बघायची आहे.”वाद वाढवण्यात अर्थ नव्हता. सुभानरावांनी निघायचा इशारा केला.”दादासाहेबासनी आमी आलो ते आवडल नाय का?” कमळा मधाळ,लाडिक आवाजात म्हणाली.”नको आवडू दे. त्यांनी केलेले शौक चालतात. आम्ही तर लग्न केले आहे.”अंतोजी बेफिकीर होता.”म्या फक्त त्याला धडा शिकवायला आले हाय.” मनात निर्धार कमळाने पुन्हा उच्चारला.घोडेस्वार,हत्ती,हत्यारे,स्वयंपाकी आणि शामियाने असा सगळा बंदोबस्त होता. घुंगरू मेण्यात बसून होता. रात्रीच्या रानटी जखमा त्याच्या अंगावर होत्या. कोणाला विसरायला सुभानराव असे वागले त्याला समजत नव्हते. घुंगरूला असा त्रास ते अनेकदा काही विसरायचे असेल तर देत.त्यांचे शरीर थकवणारा प्रणय करत. सुभानरावांना समजून घेणारी आणि त्यांच्या बौद्धिक भुकेला भागवणारी सखी, सहचरी त्यांना मिळावी असे घुंगरू मनातून नेहमी म्हणत असे.”रखमा,झाली का तयारी. आपल्याला निघावे लागेल.” केशरने तिला आवाज दिला.”समदी तयारी केली हाय.” रखमाने उत्तर दिले.”सुगंधा,झाली का तयारी?” केशरने आवाज दिला.”हो,माझी सगळी तयारी झाली आहे.” सुगंधा तयार होऊन बाहेर आली.सोबत संपूर्ण लवाजमा घेऊन केशर बाहेर पडली. तसे त्या स्वतः चे संरक्षण करायला समर्थ होत्या. तरीही हत्यारबंद शिपाई त्यांच्या बरोबर होते. पंचवीस मैलाचा प्रवास होता. वाटेत सगळीकडे जंगल होते त्यामुळे केशर आणि सुगंधा अधिक सावध होत्या.अघोरी शक्ती अनेकदा योगिनींचे सामर्थ्य आणि रहस्य हिसकावून घ्यायचा प्रयत्न करत असत. त्यामुळे अधिक सावध असणे गरजेचे होते.अचानक समोरची घोडी थांबली.”खंडोजी,का थांबली घोडी?” सुभानराव खाली उतरले.”मालक,ही वाट वंगाळ हाय. दुसऱ्या वाटन जाऊ.”खंडोजी अदबीने म्हणाला.”खंडोजी,तू कधीपासून घाबरायला लागला.”सुभानराव मोठ्याने हसले.”मालक,ह्या रस्त्यान लई इपरित गोष्टी आदी झाल्या हाईत.” खंडोजी समजावत होता.”खंडोजी मर्दाने असे घाबरायचे नसते. इथूनच जायचे आपण.” सुभानरावांनी हट्ट धरला.सगळा लवाजमा पुढे निघाला. साजगाव सोडून चार पाच मैल झाले होते. अजून बराच पल्ला गाठायचा होता. उशीर झालाच तर एखादा मुक्काम करावा लागणार होता. जंगलात आदिवासी पाडे होते. खंडोजी आधी जागा हेरून ठेवत असे.त्याप्रमाणे दुपारी न्याहारी करायला एका ठिकाणी थांबायचा त्यांनी निर्णय घेतला. दाट करवंदाची जाळी आणि बाजूला असलेला ओढा पाहून सुभानराव खुश झाले.कमळा ओढ्यात हातपाय धुवायला गेली. तमासगीर असल्याने तिला ह्या सगळ्याची सवय होती. ती खाली वाकली आणि पाण्यात तिला काहीतरी तिच्यामागे उभे असल्याचे दिसले. तिने पटकन मान फिरवली तर मागे कोणीच नव्हते. आपल्याला भास झाला असे समजून ती तोंडावर पाणी घ्यायला खाली वाकली आणि अचानक तिला आत पाण्यात ओढले एका वेगळ्या शक्तीने.कमळा जोरात ओरडली आणि सगळेजण ओढ्याकडे धावले. पाणी संपूर्ण गोल फिरत होते आणि कमळा मध्ये अडकली होती. तिच्या अवतीभवती दाट काळे केस असलेल्या अनेक आकृत्या दिसत होत्या.तेवढ्यात खंडोजीने आपला बटवा उघडला आणि येळकोट येळकोट जयमल्हार असा गजर करत भंडारा उधळला. त्याबरोबर उधाण आलेले पाणी शांत होऊ लागले आणि कमळा वेगाने बाहेर फेकली गेली.”मालक,हितून चला. ही जागा धोक्याची हाय.”कसेबसे खंडोजी बोलला आणि सगळेजण तसेच पुढे निघाले.घडलेला प्रकार पाहून अंतोजी आणि सुभानराव दोघेही जरा चरकले. कमळा मेण्यात शांत पडून होती. तिला आपल्यासोबत काय झाले तेच आठवत नव्हते. त्या जागेपासून पुरेसे दूर गेल्यावर खंडोजीने थांबायचा इशारा दिला. त्यानंतर सर्वांनी न्याहारी केली. तोवर दिवस मावळला होता.”मालक,ह्या जंगलात राती परवास नग. ते बघा तिथं शिरकाईच ठाण हाय. तिथ आजची रात थांबू.” खंडोजी म्हणाला.मघाशी घडलेला प्रकार पाहून सुभानरावांनी त्याचे म्हणणे विनातक्रार मान्य केले.सुगंधा आणि केशर दोघींनी दिवस मावळताच सगळ्यांना थांबायचा इशारा दिला. राहुट्या लावताच केशरने सभोवती संरक्षक रिंगण आखले. सूर्य मावळला आणि जंगलाचे रूप पालटले. आतापर्यंत हिरवेगार दिसणारे जंगल काळे आणि गूढ भासू लागले.इथे काही नवीन संकट येईल का?कमळा ठीक असेल का?सुगंधा आणि केशरने संरक्षक रिंगण का आखले असेल?वाचत रहा.शापित अप्सरा.©®प्रशांत कुंजीर.

Leave a Comment