विरजण


“मिठाचा डबा बदलून टाकूया आपण, आणि हे तांदूळ या डब्यात का आहेत? मी पिशवीत भरून ठेवते”

हे ऐकताच तिच्या सासूबाई आणि जाउबाईंचे लक्ष विचलित झाले. त्यांना हा बदल पटत नव्हता पण दुसरीकडे तिला का दुखवायचं म्हणून त्या मौन होत्या. गेले कित्येक वर्षे सासूबाई आणि जाउबाईंनी घर सांभाळलं होतं.

केतकीला लग्न होऊन जेमतेम 2 महिने झाले होते. एकत्र कुटुंब होतं. घरात मोठ्या जाउबाई, जेठ, सासू सासरे आणि कुवारी नणंद. घर सांभाळायची तिला भारी आवड. किचन आपल्या पद्धतीने मांडायची तिला हौस. त्यामुळे घरातल्या एकेक गोष्टी ती बदलू लागली.

केतकी नोकरी करत होती. त्यामुळे घरातलं सगळं आवरून जायला तिला उशीर होई. तेव्हा सासूबाई आणि जाउबाईंच्या हे लक्षात येताच त्यांनी सांगितलं की सकाळचं आम्ही बघत जाऊ तू संध्याकाळी किचन सांभाळत जा.ठरल्याप्रमाणे रुटीन सुरू झालं.

संध्याकाळी केतकी आली की किचनमध्ये बराच वेळ असायची. सर्व वस्तूंच्या जागा तिने बदलून टाकल्या. तिला हवी तशी मांडणी केली. तिला स्वयंपाकाचा फार अनुभव नव्हता पण अति आत्मविश्वास होता. Youtube वर बघून आपल्यालाही तसंच जमेल या विचारात ती कुणाचीही मदत घेईना. “मी एकटी करेन” असं म्हणत ती काहीतरी बनवायची, कधी जमायचं तर कधी फसायचं. घरातली सर्व मंडळी मात्र तिचं मन राखण्यासाठी आनंदाने खाऊन घेत.

सकाळी जेव्हा जाऊबाई आणि सासूबाई किचनमध्ये येत तेव्हा त्यांचा प्रचंड गोंधळ उडायचा. कुठलीही वस्तू जागेवर नसायची. केतकीने तिच्या सोयीप्रमाणे किचनची रचना केली होती पण दुसऱ्याचा विचार केला नाही. सासू आणि जाऊला ते खटकू लागलेलं.
*****

सगळं माझ्या मनाप्रमाणेच व्हायला हवं, मी म्हणेल ती पूर्व दिशा असा तिचा दृष्टिकोन असायचा, पण एकत्र कुटुंबात या गोष्टींना बाजूला ठेवावं लागतं याची तिला जाणीव नव्हती.

एकदा घरात सत्यनारायण पूजा होती. जाऊ बाईंनी पुजेचं सगळं सामान एका मोठया बॉक्स मध्ये भरून ठेवलं होतं जेणेकरून वेळेवर धावपळ नको. रविवारचा दिवस होता, केतकीला सुट्टी होती. सासूबाई आणि जाऊबाई दोघीजणी खरेदीसाठी बाहेर गेल्या आणि केतकीला घराकडे लक्ष ठेवायला सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजेसाठी गुरुजी आले, जाऊ बाईंनी धावत जाऊन पुजेचं बॉक्स आणलं आणि बघतो तर काय..त्यातलं अर्धं सामान गायब होतं. त्यांनी लागलीच केतकीला आवाज दिला..

“केतकी…यातलं सामान कुठे गेलं??”

“अहो त्यात किती वस्तू वेड्यासारख्या कोंबून ठेवल्या होत्या..मी काढलं सगळं आणि जागच्या जागी ठेवलं..”

जाऊबाईंनी डोक्यावर हात मारून घेतला. तिकडे गुरुजी एकेक साहित्य आणायला वेळ जातोय म्हणून चिडचिड करू लागले.पूजेला बराच उशीर झाला.

पूजा झाल्यानंतर सासूबाईंनी केतकीला सुनावलं..

“असं न विचारता काहीही उद्योग करत जाऊ नकोस..तुझ्या जावेने पूजेसाठी लागणारं सामान एकत्र आणून ठेवलेलं जेणेकरून एकाच ठिकाणी सर्व वस्तू सापडतील..पण तू असला आगाऊपणा केला आणि सगळं गणित बिघडलं..हे बघ, तू नवीन आहेस..आधी घरातलं समजून घे, इथल्या गोष्टी समजून घे आणि मग तुला निर्णयस्वातंत्र्य मिळेल…”

केतकीला या बोलण्याचा प्रचंड राग आला…तिची धुसफूस सुरूच असायची. जाऊ बाई नेहमीच्या ठिकाणी सवयीने वस्तू ठेवत, मात्र केतकीला ते सहन न झाल्याने ती परत सर्व वस्तूंच्या जागा बदले. कुणालाही न विचारता घरातल्या वस्तूंची जागा बदल, इकडंच तिकडे कर हे प्रकार ती करत असे. तिचा अति आत्मविश्वास तिला नडत असे. एखादा पदार्थ चुकला तर त्यातुन शिकून, मोठ्यांना विचारून पुढच्या वेळी करण्याऐवजी ती पहिले पाढे पंचावन्न गिरवत असे. तिच्या या वागण्याचा सर्वांनाच त्रास होऊ लागलेला.

तिच्या या स्वभावामुळे तिचा नवराही कंटाळून जाई. आपल्या नवऱ्याने आपण संगीतलेलं रुटीन फॉलो करावं, आपण सांगू तसंच करावं या हट्टापायी त्यांच्यातही वाद होऊ लागलेले. काहीही झालं तरी केतकी बदलायला तयार नव्हती.
****

एके दिवशी मोठ्या दिरांनी फर्मान सोडलं, उद्या पहाटे 7 वाजता मंदिरात जाऊन नैवेद्य द्यायचा आहे. तेव्हा मेथीची भाजी, भरीत, भाकर, भात हे सगळं तयार असुद्या 7 च्या आत. सासूबाई आणि जाउबाईनी ठरवलं की उद्या लवकर उठायचं आणि नेवैद्य बनवायचा. केतकीला मात्र हे जबाबदारी स्वतःवर हवी होती.

“दादा हा नैवेद्य मी बनवला तर चालेल का??”

“कुणीही बनवा पण वेळेत बनवा..”

जाउबाईनी समजावलं, की तू धावपळ करू नकोस मी करून घेईन पवन केतकी ऐकेना. अखेर केतकी सकाळी लवकर उठून सगळं बनवणार यावर शिक्कामोर्तब झालं. तिने रात्रीच तयारी करून ठेवली, लसूण सोलला..मेथी धुवून ठेवली.

केतकीने साडेपाच चा अलार्म लावला होता. अलार्म वाजला तसं snooze करत करत उठायला 6 वाजले. ती घाईघाईने किचनमध्ये गेली. मोठे दिर तिला विचारत होते, “अंघोळ झाली असेल तरच बनव”.

ती अंघोळ न करताच घाईघाईने किचनमध्ये आलेली. ती पटकन अंघोळीला पळाली. बाहेर येत तिला 6:20 झाले. किचनमध्ये येताच तिच्या लक्षात आलं की रात्रीचा लसूण आणि मेथी तशीच उघडी पडली होती. झाकायचं विसरली होती. त्यामुळे मुंग्या, झुरळं त्याच्या आजूबाजूला फिरायला लागलेले. तिने ते तसंच टाकून दिलं आणि दुसरं करायला घेतलं.

नवीन मेथीची जुडी घेतली, ती तर अजून निवडलेली नव्हती. तिने निवडायला घेतली आणि दुसरीकडे वांगी भाजायची म्हणून तेल लावून गॅसवर ठेवली. मेथी निवडतच 6:45 झाले. घाईघाईने कढईत तेल टाकलं आणि फुल गॅस केला. तिच्या लक्षात आलं की भाजायला वांगी गॅसवर ठेवली पण गॅस सुरू केलाच नव्हता. मग गॅस सुरू केला आणि दुसरीकडे मेथी शिजत टाकली. मग लक्षात आलं की लसूण टाकायचा राहिला..पटकन निवडून दोन पाकळ्या टाकल्या आणि भरीत करायला घेतलं. भरीत करत असतानाच मेथीचा गॅस फुल असल्याने मेथी करपली..भरीत साठी लसूण वेगळा…भात शिजत टाकायला गॅस रिकामा नव्हता..भाकर साठी पीठ परातीत काढलं नव्हतं.. तिचं लक्ष बाहेर गेलं तेव्हा मोठे दिर गाडी काढत होते… ते निघून गेले…

केतकीची प्रचंड चिडचिड झाली. सगळं अर्धवट, करपलेलं…सासूबाई किचनमध्ये आल्या

“काय गं सुधीर गेला आत्ताच…नैवेद्याची पिशवी नाही दिसली मला..”

त्यांचं लक्ष करपलेल्या भाजीकडे आणि अर्धवट भरताकडे गेलं…

त्यांचा संयम सुटला आणि त्या तिला खूप बोलल्या..

“आम्हाला माहीत होतं तुला जमणार नाही म्हणून सांगत होतो की आम्ही करतो..फाजील आत्मविश्वास का दाखवतेस तू दरवेळी? प्रत्येकवेळी असा फाजील आत्मविश्वास दाखवून फसतेस तरी तुला अक्कल येत नाही का?”

सासूबाईंचा आवाज ऐकून जाऊबाई पटकन किचनमध्ये येतात आणि त्यांना सगळं समजतं. त्या सासूबाईंना शांत करतात.

केतकी मात्र स्वतःची चूक मान्य करतच नव्हती.

“आता अलार्मनंतर मला झोप लागली त्याला मी काय करू..अंघोळीत वेळ गेला माझा…तुम्ही मला सांगायचं ना आधी..”
****

उलट ती दुसऱ्यांवर खापर फोडत होती.

बराच वेळ वाद झाला. केतकीला राग आला..माहेरी जाण्याचं निमित्त करून ती माहेरी पळाली.

तिने आईला सगळं सत्यकथन केलं. आईला समजलं की चूक केतकीची आहे आणि ती मान्य ही करत नाहीये. तिला समजवायला गेलं तर ती ऐकणार नाही. आईने दिन दिवस तिला शांत केलं, काहीही समजावण्याचा मागे लागली नाही.

तिसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती, साधारण दुपारचे 2 वाजले होते. आईने केतकीला सांगितलं..

“जा बाळा ओट्यावर मी विरजण ठेवलं आहे आणि पातेल्यात थोडंस दूध आहे, दही लावून दे..”

केतकीने आईने सांगितल्याप्रमाणे केलं आणि ती जागेवर येऊन बसली. 15 मिनिटं झाले आणि आई म्हणाली दही बनली असेल जा बघून ये..

“इतक्या लवकर कशी बनेल आई??”

“मी सांगते ना झाली असेल…जा तू..”

केतकी उठली पाहिलं..दही तयार नव्हती..

“सांगितलं होतं ना नसेल तयार म्हणून..”

“असं कसं होईल? तयार व्हायलाच हवी होती…तूच काहीतरी चुकीचं केलं असणार..”

“असं कसं चुकीचं करेन मी?? दही बनायला ते मुरू तर दे..इतक्या आत्मविश्वासाने सांगतेस झाली असेल म्हणून…असं कधी होतं का?”

“समजतंय ना तुला?”

“म्हणजे??”

“तू विरजण आहेस..दुधात म्हणजेच कुटुंबात गेल्यावर त्याचं लगेच दही बनणार नाही..तुला मुरावं लागेल, वेळ जाऊ द्यावा लागेल… मग तू चमचाभर विरजण पासून पूर्ण दुधावर आपला हक्क सांगू शकशील…हे बघ बाळा, नवीन घरात तुझ्या जाऊ बाई आणि सासूबाई वर्षानुवर्ष राबल्या आहेत, घराला उभं केलं आहे…वर्षानुवर्षे त्यांनी केलेलं सगळं एका क्षणात कुणी बदललं तर त्यांना कसं आवडेल?? काल आलेली मुलगी सर्व गोष्टींवर आपला ताबा घेतेय हे कुणालाही सहन होणार नाही..तुला वेळ द्यावा लागेल, मोठ्यांच्या आज्ञेत राहावं लागेल..एकदा त्यांचं मन जिंकलं की तुझा शब्द खाली पडू देणार नाही हे लक्षात असुदे..”

आईने सांगितल्यावर केतकीला आपली चूक समजली.

“आई मग मी काय करायला हवं??”

“तू नवीन आहेस घरात, एकत्र कुटुंबात आहेस, तेव्हा सुरवातीला अनुभवी सासू आणि जावेच्या सांगण्यानुसार काम करत जा..त्यांचा सल्ला घेत जा, त्यांचं मत विचारत जा…तुला कदाचित हे अवघड जाईल पण कालांतराने त्याच तुझा सल्ला घेतील हे मी लिहून देऊ शकते..”

आईने सांगितल्याप्रमाणे केतकीने आपल्यात बदल केला…

(5 वर्षानंतर)

“मोठया सुनबाई, उद्या घरी सत्यनारायण आहे…केतकीला विचार तिला काय काय सामान लागेल…”

“हो सासूबाई, पण ती आहे कुठे? मला ढोकळे बनवायचे आहेत तर त्याचं प्रमाण तिला विचारायचं आहे, उद्याचा प्रसाद तिलाच सांगूया बनवायला…तिच्या हाताला चव आहे..”

“हो पण गेली कुठे ही मुलगी? तासभर घरात नसली तर काही सुचत नाही बघ..”

समाप्त

1 thought on “विरजण”

  1. Wow, marvelous blog format! How lengthy have you ever been running a blog for?
    you make running a blog look easy. The overall glance of your website is excellent, as
    smartly as the content! You can see similar here e-commerce

    Reply

Leave a Comment