मंगेश अडकित्त्यावर कैऱ्या फोडत होता,
पावसाळ्याची चाहूल लागलेली तसं आईने फर्मान सोडलं होतं,
दरवर्षी ती 2 मोठया बरण्या भरतील एवढं लोणचं बनवत असायची,
मग कैऱ्या घेऊन त्या फोडून देण्याचं काम मंगेशचं असायचं,
कैऱ्या फोडतांना त्याच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते,
त्याने वडिलांचा विरोध पत्करून नुकताच एक व्यवसाय सुरू केला होता,
त्यात हवा तसा जम बसत नव्हता,
काही माणसांना सोबत घेऊन त्याने फेब्रिकेशनचे काम सुरू केले होते,
सोशल मीडियावर मार्केटिंग केली होती, जवळच्या लोकांना सांगितलं होतं, बिझनेस कार्ड्स छापले होते, हाताखाली काही माणसं होती, एक छोटंसं शॉप घेतलं होतं,
सुरवातीला 5-6 ऑर्डर त्याने पूर्ण केल्या होत्या,
अगदी मनापासून,
खुश होता तो, पण या ऑर्डर संपल्या तश्या नवीन ऑर्डर येणं कमी झालेलं,
पण त्याने आपलं काम सुरूच ठेवलं,
उरलेल्या स्टीलचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण फ्रेम तो बनवू लागलेला,
किचनमध्ये, हॉल मध्ये वस्तू ठेवण्यासाठी कामात येतील अश्या,
सजावटीसाठी कामात येतील अश्या,
सर्व गोष्टींचे फोटो तो सोशल मीडियावर टाकत असे,
महिना उलटला,
एकही ऑर्डर नव्हती,
तो निराश होत होता,
अजून एक महिना सरला,
त्यात एकच छोटीशी ऑर्डर आलेली, त्यातून आलेले पैसे सगळे माणसांच्या पगारातच गेले,
एक तर व्यवसायात नफा होत नव्हता, दुसरीकडे सामाजिक दबाव वाढत होता,
लोकं विचारायची, किती कमावतोस?
चुलत मावस भावंडं नोकरी करून सेटल होत होती,
कुणी परदेशी जात होतं,
त्यात वडिलांचा आधीच विरोध असल्याने तेही राहून राहून त्याला टोमणे मारायचे,
सहनशक्ती सम्पली आणि त्याने आईला सांगितलं,
“आई मी हे काम बंद करू का?”
आईने त्याच्याकडे पाहिलं,
“6 महिने थांब”
आई एवढंच बोलली आणि त्याला जेवायला वाढलं,
ताटात लोणचं नाही बघून त्याने आईकडे लोणचं मागितलं,
“आज खाऊन घे, यानंतर तुला लवकर लोणचं मिळणार नाही”
आई असं आणि त्याला हसू आलं,
“काय विनोद करतेस गं..”
“विनोद नाही, खरं तेच सांगतेय..”
आईच्या या वागण्याचा अर्थ त्याला कळला नाही,
त्याने जेवण केलं आणि तो झोपला..
आईने 6 महिने थांबायला लावलं होतं, त्यामुळे आईचं ऐकायचं असं त्याने ठरवलं..
पण रोज जेवतांना तो लोणचं मागायचा तर आई त्याला मुद्दाम देत नसायची,
सहा महिने झाली,
“आई अजून किती दिवस मला लोणचं देणार नाहीयेस?”
“आज वाढणार तुला, बस जेवायला..”
तो खुश झाला,मनापासून लोणचं खाल्लं..
“आई, पहिल्यांदा लोणचं खाल्लं आणि आत्ता खाल्लेलं, यात खूप फरक वाटतोय, आत्ताचं लोणचं खूपच छान लागतंय, नवीन नवीन टाकलेलं तेव्हा काहीच चव लागत नव्हती..”
“हो ना? मग हे कळत कसं नाही तुला??”
“म्हणजे?”
“व्यवसाय असो की लोणचं, जेवढं मुरलं तेवढी त्याची किंमत वाढते….व्यवसाय ही अशी गोष्ट आहे जिथे खूप संयम, चिकाटी बाळगावी लागते..लोणचं टाकताना कष्ट पडले, त्याची चव सुरवातीला लागत नव्हती म्हणून आपण टाकून दिलं का? नाही, वेळोवेळी त्याला चाळलं, त्याची काळजी घेतली..म्हणून आज त्याची चव लागतेय..व्यवसायात हा असाच दृष्टीकोन हवा..”
मंगेशला मोठी शिकवण मिळाली,
थोड्याच दिवसात एका मोठ्या कंपनीच्या मालकाचा फोन आला, त्याच्याकडे 200 कामगार कामाला होते, तो म्हणाला.
“बऱ्याच महिन्यांपासून सोशल मीडियावर तुम्ही बनवलेल्या फ्रेम्स मी बघतोय, तेव्हाच ठरवलं की काम तुम्हाला द्यायचं…आम्हाला कंपनीचे रेनोवेशन करायचे आहे तर तुम्ही पोस्ट केलेले तसे आणि आकर्षक दिसतील असे फाईल ऑर्गनाईझर डेस्क आणि बाकी सगळी कामं तुमच्याकडून करून हवी आहेत, जवळपास 50 केबिन्स आहेत आपले”
मंगेश एकदम सुन्न झाला, इतकी मोठी ऑर्डर मिळेल असं त्याला स्वप्नातही वाटत नव्हतं, अजून एक म्हणजे ज्या कंपनीचा फोन होता तिथेच बाबा नोकरीला होते…
मंगेशमध्ये प्रचंड उत्साह संचारला,
मालकाला कोटेशन देण्यासाठी तो कंपनीत चालला असता वडीलही सोबत यायचं म्हणत होते, शेवटी त्यांचीच कंपनी ती, कंपनीसोबत एक जिव्हाळा निर्माण झालेला..
दोघेही बाप लेक कंपनीत जायला निघाले,
मालकाच्या केबिनबाहेर ते उभे होते, मालक बाहेर गेले होते..या दोघांना बाहेर थोडावेळ बसून वाट बघा असं सांगितलं..
तेवढ्यात मालक आले,
त्याचे वडील उभे राहिले,
कंपनीत असतांना मालक दिसले की ते असेच उभे राहायचे, आणि मालक कामाच्या गडबडीत लक्षही न देता वेगाने केबिनकडे निघून जायचे,
मंगेशला हात लावत त्यांनी पटकन उभं राहायची खुण केली,
“आता मालक केबिनकडे जातील, आत गेले की मग जाऊ आपण..” – वडील म्हणाले,
मालक वेगाने केबिनकडे निघाले, पण मंगेशला बघताच त्यांचे पाय थबकले,
“अरे मंगेश…”
मोठ्या आनंदाने ते मंगेशजवळ गेले,
त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले,
“खूप क्रिएटिव्ह काम करतोस तू, तेही इतक्या लहान वयात, प्राउड ऑफ यु..”
वडील बघतच राहिले,
“व्यवसायात गोंधळ घालून माझं नाक कापू नकोस” असं वडील त्याला कायम म्हणायचे…
आणि आज मालक खुद्द….
दोघेही केबिनमध्ये गेले,
केबिनमध्ये दोन खुर्च्या आणि बाजूला सोफा होता,
वडिलांनी त्याला खुर्चीवर बसायची खूण केली,
कारण वडिलांना माहीत होतं, की मॅनेजर आणि वर्कर लोकांना त्या खुर्चीवरच बसावं लागे, मालकाच्या बरोबरीची मोठमोठी लोकंच फक्त सोफ्यावर बसून चर्चा करू शकत होते..
तो खुर्चीवर बसायला निघाला तेव्हा मालक म्हणाले,
“अरे इकडे कुठे, सोफ्यावर बस…”
त्या क्षणी वडिलांना समजलं,
आपला मुलगा व्यवसाय करायचं का म्हणत होता ते…
त्यांना भरून आलं…
जुजबी बोलणं झाल्यावर मंगेशने वडिलांची ओळख करून दिली,
“हे माझे वडील”
“नमस्कार, काय करतात आपण?” मालकाने विचारलं..
मंगेश आणि त्याचे वडील एकमेकांकडे बघू लागले,
वडील दचकतच म्हणाले- “इथेच होतो कामाला 55 वर्षे”
मालक वरमला, त्याला वाईट वाटलं,
“माफ करा, खरंच… मला खरंच ओळखता आलं नाही..”
“हरकत नाही साहेब, इतक्या सर्व लोकांमध्ये कोण कोण लक्षात राहणार..”
बाप लेक घरी परतले,
वडिलांच्या डोक्यात सतत विचार फिरत होता,
“जिथे 55 वर्षे काम केलं तिथे अजूनही मला ओळखलं नाही, आणि माझ्या मुलाला एका भेटीतच इतका मान मिळाला”
त्यांना भरून आलं, खोलीत जाऊन त्यांनी दार लावून घेतलं आणि आरशासमोर उभं राहून स्वतःला कोसू लागले,
“याच मुलाला टोमणे मारायचो का मी??”
तिकडे मंगेशने आईला सगळं सांगितलं.. आईला आनंद झाला..
“आत्ता कळलं? मी अजून सहा महिने थांब असं का म्हणाले ते?”
मंगेशला त्याच्या अशिक्षित आईनेच मार्ग दाखवला होता,
कारण सहा मुरायला वेळ लागतो हे तिला माहीत होतं, मग तो व्यवसाय असो वा लोणचं !!!