लोका सांगे ब्रह्मज्ञान

भाग एककाय बाई यावर्षी या संक्रांतीच्या हळदी कुंकवामुळे नुसता वीट आलाय हो! रोज एकीकडे हळदीकुंकू आणि नाश्ता त्याकरता साडी घाला असा कंटाळा आलाय ना!मागच्या वर्षी बरं होतं बाई संक्रांतीनंतर आठ दिवसातच अमावस्या होती ना, म्हणून सगळ्यांनी पटपट हळदी कुंकू करून घेतले. म्हणजे कसं एका दिवशी तीन-चार जणींकडे हळदी कुंकू असायचं. बर त्याबरोबर नाश्ता असतोच म्हणजे घरी स्वयंपाक करायचं कामच नाही!
आपण मस्त तयार व्हायचं, भारीतल्या जरीकाठाच्या साड्या घालायच्या, आपल्या सोबत मुलांनाही न्यायचं हळदीकुंकवासाठी तिकडेच दोन-चार घरी नाश्तापाणी केलं, की घरी येऊन नवऱ्यासाठी खिचडी, नाहीतर वरण भाताचा कुकर लावला की झालं बाई! तेवढाच दोन-चार दिवस जीवाला स्वयंपाकापासून विसावा!आणखी एक महत्त्वाची गोष्ट, असं कमी दिवसाचा हळदीकुंकू असलं ना की बाया पटापट हळदी कुंकू करतात. मग कोणी काय वाटलं, त्या हिशोबाने आपल्याला हळदीकुंकवासाठी काय वाण वाटायचं ते ठरवता येतं.
मागच्याच्या मागच्या वर्षी मी स्टीलच्या वाट्या वाटल्या होत्या, आणि त्यानंतर ज्यांच्या कोणाच्या घरी गेली ना, तिथे निव्वळ प्लास्टिकच्या डब्या, कंगवे, टिकल्यांचे पाकीटं,चमचे हे असं मला मिळालं!
लोकं दोन दोन तीन घर घेतात. अंगभर सोन्याचे दागिने घालून मिरवतात आणि वाण काय वाटतात तर प्लास्टिकच्या वस्तू!बरं वाणाचं तर सोडाच नाश्त्याला काय देतात माहिती आहे का? मटकीची उसळ आणि चिवडा. कधी कधी तर मटकीला मोड सुध्दा आलेले नसतात. कोणी कोणी तर उपमा, पोहे असे पदार्थ देतात बाई! जाऊद्या आपल्याला काय करायचं? ज्याचं त्याच्याजवळ.आता परवाचीच गोष्ट सांगते, त्या आमच्या बाजूच्या शिंदे बाई आहेत ना, त्यांच्या मुलाची लूट होती. शिंदे बाई म्हणजे बडं प्रस्थ. लग्नानंतर दहा वर्षांनी मूल झालं त्यांना. त्यातल्या त्यात वंशाचा दिवा-मुलगा झाला म्हणून त्यांनी दणक्यात हळदीकुंकू आणि लूट केली.कॉलनीतल्या सगळ्या बायकांना आणि लहान मुलांना त्यांनी आवर्जून बोलावलं होतं. लुटीसाठी चौकात हात गाडीवर विकायला असतात ना पाच-दहा रुपयांच्या गोळ्या, बिस्कीट, चॉकलेटच्या पुड्या त्यानेच लूट केली.
लुटीच्या वेळी बिचारे लहान मुलं राहिले बाजूला आणि वाणासाठी बोलावलेल्या बायकाच लुटीवर तुटून पडल्या. मुठ-मुभर चॉकलेट घेतले त्या बायांनी. बिचारी लहान मुलं! त्यांना काहीच नाही मिळालं! सांगा बरं हे असं वागणं बरोबर आहे का? आजूबाजूच्या बायकांनी मूठ मूठभर चॉकलेट लुटले म्हणून मग मी पण दोन चार चॉकलेट घेऊनच घेतले बाई.लहान लहान मुलं चॉकलेट मिळालं नाही म्हणून रडायला लागले तर शिंदे बाईंनी त्यांना पार्लेचे 50 पैसेवाले चॉकलेट दिले. बाकीच्या बायका लेकराची लूट करतात ना तर त्यात ते 50-50 पैसेवाले बिस्कीटं आणि गोळ्या लुटतात.जाऊद्या आपल्याला काय करायचं. पण मी ठरवलं माझ्या मुलाच्या लुटीच्या वेळेस मी तर बाई डेअरी मिल्क, किटकॅट, पोलो, अमुलंचं मिल्की बार अशी महागाचीच चॉकलेट आणणार .वर्षातून एकदा तर करायचं असतं ते हळदीकुंकू. चांगलं महागाचं वाण दिलं तर बायका पण हौसेने येतात. मागच्या वर्षीचा अनुभव आहे माझा.बरं एखादीला जरी वाणासाठी बोलावलं नाही, तर ती वर्षभर बोलत नाही. अबोला धरते, म्हणून इच्छा असो अगर नसो, त्यांनी कसेही वाण दिले तरी सगळ्या बायकांना बोलवावंच लागतं.
मला तर बाई आजकाल हळदी कुंकवाचा फारच कंटाळा आलाय. पण नाही म्हणून चालत नाही ना इच्छा असो अगर नसो, कॉलनीत राहायचं तर सगळ्यांशी संबंध ठेवावे लागतात ना. हळदी कुंकाला ज्यांनी बोलावलं त्यांच्याकडे जावंच लागतं. नाही गेलं तर राग येतो बाई आज कालच्या बायकांना. वर्ष वर्षभर बोलत नाही. आणि मला सांगा एखाद्याच्या घरी जाऊन नाश्तापाणी करून, हळदीकुंकू आणि वाण घेतल्यानंतर, आपण त्यांना बोलावलं नाही तर बरं दिसतं का? म्हणून दरवर्षी एक सोपस्कार म्हणून मी हे हळदीकुंकू करत असते.शनिवार रविवारची सुट्टी आहे तर हळदी कुंकू करण्याचा माझा विचार आहे. पण वाणासाठी काय आणायचं हाच प्रश्न पडलाय?तुम्ही सांगा बरं काय वाटू मी वाणात?©® राखी भावसार भांडेकरसदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशी कसलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अंतिम भाग
संक्रांतीच्या मागेपुढेच माझ्या मुलांची परीक्षा असते, त्यामुळे त्या आठवड्यात मी हळदीकुंकू करण्याचा विचारच करू शकत नाही. त्यानंतर शाळेची प्रजासत्ताक दिनाची तयारी म्हणजे आणखीन आठ दिवस हळदी कुंकाला विश्रांती. हळदी कुंकवाचा दिवस ठरवणं म्हणजे अगदी जीकरीचं काम, हळदीकुंकवासाठी येणाऱ्या बायकांचा उपवास असला म्हणजे केलेला नाश्ता तसाच पडून राहतो, तो उरलेला नास्ता दुसऱ्या दिवशी कोण खाणार? हा एक मोठाच प्रश्न असतो माझ्या पुढे, म्हणून मग सोमवार, गुरुवार, एकादशी, चतुर्थी, झालंच तर प्रदोष असे सगळे उपवास वगळून हळदी कुंकाचा दिवस ठरवावा लागतो.साधं हळदी कुंकू करायचं म्हणजे केवढी तयारी करावी लागते हो! घरातला पसरलेला पसारा आवरा. शोभेच्या घरात असल्या नसलेल्या वस्तू हॉलमध्ये आणून ठेवा, हॉल झाडा, तीन-तीन वेळा तो पुसून काढा, तरीही आवरल्यासारखा आणि स्वच्छ काही तो वाटत नाही. इतर वेळी अभ्यासासाठी आणि जेवणासाठी दहा वेळा बोलावूनही न येणारी मुलं तर अशा कामाच्या घाईत ठार बहिरी होतात आणि आणखीनच पसारा करून ठेवतात, म्हणून त्यांना शंभर वेळा आवाज देऊन त्यांच्याकडून घर आवरून घेणं म्हणजे साधं काम नाही.
दोन-तीन दिवस सतत नवरा आणि मुलांच्या मागे लागून मी घर आवरून घेतलं, पण त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न होता की आता नाश्त्या साठी कुठला पदार्थ बनवायचा?
मुलाला आवडतं म्हणून त्याने मला मिसळ-पावचा पर्याय सुचवला. पण मटकीला मोड आलेच नाही, पण मटकीला मोड न आल्याने मी स्वतःचा हिरमोड करून घेतला नाही. परत मुलांना विचारलं पटकन दुसरा पदार्थ सुचवा तर लेक म्हणाली, “मम्मा तू इडली का नाही करत? भलेही तुझ्या हातची इडली खाऊन आम्ही विटलो आहोत पण हळदीकुंकवासाठी इडली हा उत्तम पर्याय असू शकतो.”तिने सुचवलेल्या पर्यायाच्या मागून जो टोमणा मारला, तो मला समजला, पण मी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि इडली साठी डाळ, तांदूळ भिजवले पण मेलं तिथेही मांजर आडवं गेलं. दुसऱ्या दिवशी इडलीचे पीठ बघितलं तर ते आमलेलंच नव्हतं, आणि आदल्या दिवशी मी सगळ्या बायकांना हळदीकुंकवाचे फोन करून चुकले होते. आता जर हळदी कुंकू रद्द केले तर ‘हात दाखवून अवलक्षण’ केल्यासारखं झालं असतं. मी मनात विचार करत होते ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ तेवढ्यात नवऱ्याने एक झक्कास पर्याय सुचवला. तो म्हणाला, “मी एक काम करतो भडंग मुरमुऱ्याचा चिवडा घेऊन येतो, तू घरी कांदा, टमाटा, कोथिंबीर चिरून ठेव. चिंचेची चटणी तर तुझ्या फ्रीजमध्ये बाराही महिने पडलेलीच असते. मस्त भेळ करून दे सगळ्यांना.” आता मनात नसूनही मी नवऱ्याच्या पर्यायावर मान झुकवली.
दारासमोर रांगोळी काढण्यासाठी लेकीला आग्रह केला तर ती म्हणाली,”ती 14 पिस वाली कुंदनची रांगोळी ठेव दरवाजा बाहेर, आज-काल कुणालाच वेळ नाही रांगोळी काढायला आणि कोणी बघतही नाही.”कॉलनीतल्या सगळ्या बायकांना न बोलावता, ज्यांनी मला बोलावलं फक्त त्यांनाच मी हळदीकुंकवाचं बोलावणं केलं, मुलाच्या लुटीचही आमंत्रण दिल, पण आजकालच्या शिष्ट बायका चार-पाच जणींच्या वर कोणीही आलं नाही.मी म्हटलं जाऊ द्या, तेवढाच माझा वेळ आणि परिश्रम वाचले. नाही तर प्रत्येकीला हळदी कुंकू द्या, तिळगुळ द्या, वाण द्या, नाश्ता द्या आणि हे सगळं झाल्यानंतर त्या नाष्ट्याच्या प्लेटा घासा. ‘पडत्या फळाची आज्ञा मानून’ मी आलेल्या बायकांमधेच हळदीकुंकू उरकून घेतलं.अरे हो तुम्हाला सांगायचं विसरलीच, मी ना मुलासाठी ते चौकात मिळतात ना ती गोळ्या, बिस्कीट नाही आणली हो, आणि भारीची अमुल मिल्की बार, डेरी मिल्क, किटकॅट, पर्क, मंच, ही चॉकलेटं पण नाही आणली.
संत्रा गोळी, दो रुपये के दो लड्डू, लंडन डेरी, आणि काजूची बिस्किट यांनीच त्याची लूट केली. बजेट नको का बघायला? तिकडे ती आपली अर्थमंत्री, भारताची अर्थव्यवस्था महिलांच्याच खांद्यावर आहे असं म्हणाली, त्या गोष्टीचा विचार नको का करायला आपण?नाही नाही म्हणता म्हणता हळदी कुंकू करताना किती बजेट वाढते? तिळाचा भाव किती? त्यात बायकांना नाश्ता द्यावा लागतो. शिवाय वाणाचं सामान वेगळं! हे हळदी कुंकू आजकाल खूपच भारी पडते बाई खिशाला.सगळा विचार करून मी मला आत्तापर्यंत जितकी वाणं मिळाली ना, ती मी टेबलावर छान मांडुन ठेवली आणि चिठ्ठ्या लिहिल्या आणि लकी ड्रॉ करून प्रत्येकीला वाण वाटलं. आहे की नाही मी हुशार?©® राखी भावसार भांडेकर नागपूर.सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशी कसलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment