सदाशिव पेठेत एका मुलीवर मंगळवारी सकाळी झालेल्या हल्ल्याने पूर्ण महाराष्ट्रच हादरला होता. भर रस्त्यात एक मुलगा एका मुलीच्या मागे कोयता घेऊन जातो काय आणि ती मुलगी जिवाच्या आकांताने वाचवा म्हणून ओरडते काय. सगळं एकंदरीतच भयंकर चित्र ! नशिबाने दोन मुलं देवदूतप्रमाणे धावून आले आणि तिचा जीव वाचला.
पण हे का झालं? कसं झालं? याबाबत कुणी विचार केलाय का?
खरं तर घटनेची पूर्ण बाजू माहीत नसतांना त्यावर भाष्य केलेलं योग्य ठरणार नाही, पण तरीही ज्या गोष्टी दिसतात त्यावर बोलायला हरकत नाही. आजकाल मुलं मुली शिक्षणासाठी बाहेर पडतात, बाहेरच्या जगात अनेक लोकांशी संपर्क येतो. मुळातच संघर्षमय जीवन जगत असतांना आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली वावरत असतांना एखादा प्रेमाचा हात पुढे आला तर मुला मुलींना तो हवाहवासा वाटतो. नकळतपणे त्या नात्यात ती गुंतत जातात. त्यांच्या नात्याचं भविष्य काय असेल कुणालाही ठाऊक नाही, तरीही हा गुलाबी ऋतू तरुणाईला हवाहवासा वाटतो.
आपण ज्या दृष्टीकोनातून पाहू त्या दृष्टीकोनाने हे एकवेळ योग्य आणि एकवेळ अयोग्यही. योग्य तेव्हा, जेव्हा मुलं मुली आपल्या प्रेमाला एक बंधन घालतील, सामाजिक भान ठेवून वागतील आणि प्रेम असलं तरी ते दुसऱ्या क्रमांकावर ठेऊन प्राधान्य आपल्या शिक्षणाला देतील. अशी कितीतरी जोडपी प्रेम आणि करियर दोन्ही टप्प्यात यशस्वी झाली आणि आनंदाने जगत आहेत. पण हेच प्रेम जर विकृतीच्या आहारी जात असेल, प्रेमपुढे जग क्षुल्लक वाटायला लागत असेल आणि “तू मेरी नही हुई तो किसीं की नही होने दुंगा” ही भावना निष्पन्न होत असेल तर ते अत्यंत भयंकर.
खास करून मुलींनी खालील गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे.
- तरुणाईत प्रेमाची भावना निर्माण होणे नैसर्गिक असले तरी आपल्या अभ्यासाला, जबाबदारीला आणि कुटुंबाला प्राधान्य दयावे.
- आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नये.
- स्व संरक्षणाचे धडे जरूर घ्यावे.
- कुठल्याही अनोळखी मुलाच्या गोड बोलण्याला बळी पडू नये.
- आजूबाजूला कसही वातावरण असलं तरी आपली मर्यादा सोडू नये.
- आपल्या संघर्षात कुणी मदतीचा हात पुढे केला तरीही आपला संघर्ष आपणच लढायचा हे मनात पक्के करावे.
आपल्या मित्र मैत्रिणी आणि भगिनींना हा लेख जरूर पाठवा.