मानपान-3

 

 ती गोंधळली,

 

सासूबाई आत आल्या,

 

दार लावून घेतलं,

 

तिला कळेना काय सुरू आहे ते..

 

सासूबाईं हळूच म्हणाल्या,

 

“पोरी तुझा राग कळतोय मला..तुझ्या सारख्या शिकल्या सवरल्या मुलीला या पद्धती पटणार नाहीत.. खरं आहे, मलाही नाही पटायच्या… तुझी गोष्ट झाली..आता माझी ऐक..”

 

शुभदा कान देऊन ऐकू लागली,

 

“आमचं लग्न ठरलं..मुलाकडच्यांनी खूप काही मागितलं, माझ्या वडिलांची परिस्थिती नसताना त्यांनी सगळं दिलं.. पण एवढं करूनही सासरी मला जाच होताच…कायम डोक्यावर पदर, नणंद, जावा यांचं घरात येणं जाणं असायचं…मी कायम डोक्यावर पदर घेऊन प्रत्येकाच्या पाया पडायला वाकलेली असायचे…

 

मोलकरीण सारखी दिवसभर राबायचे, कुणाचं लग्न असलं की आचारी, सफाई कामगार आणि वाढपी म्हणून मला त्या घरात आठ दिवस आधी पाठवण्यात येई..मान नावाचा प्रकार माझ्या नशिबी नव्हता..

 

माझ्या जावा, सासवा जेव्हा मानपान घ्यायच्या तेव्हा हेवा वाटायचा.. आपल्याला कधी मिळणार हे सुख? वाट्याला कायम टोमणे, शिव्या आणि तिरस्कार यायचा…मला भाऊ नव्हता,म्हणून मी कुणाची नणंद नव्हते…पण आज इतक्या वर्षांनी का असेना माझ्या वाट्याला हे सुख आलं…त्याला ईच्छा असून नाही म्हणता आलं नाही बाळा मला..”

 

 

डोळे पुसत सासूबाई उठल्या आणि निघाल्या…

 

शुभदाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला..

 

इतक्या वर्षांचे कष्ट…इतक्या वर्षांचं राबत राहणं.. दुसऱ्याची मनं सांभाळणं या सगळ्यात आपल्याला कधी मान मिळेल यासाठी सासूबाई आसुसलेल्या होत्या…

 

जुन्या काळच्या स्त्रियांना आयुष्याचं ध्येय तरी काय असेल? शेवटपर्यंत आपल्याला मान मिळावा एवढंच..

 

माझ्यासारख्या मुलीला शिकून सवरून चार ठिकाणी मान मिळतो,

 

पण यांचं काय? 

 

सन्मान ही गोष्ट खूप मोलाची असते,

 

ज्याला मिळत नाही त्याला त्याची किंमत असते,

 

सासूबाईंच्या वाट्याला याच मानाचं भुकेलेपण होतं..

 

आज त्यांची भूक शमली होती,

 

पण मी हे बोलून त्यांच्या मनावर किती आघात केले? 

 

तिलाच वाईट वाटलं..

 

कार्यक्रमाचे व्हिडीओ ती पाहू लागली,

 

एका ठिकाणी तिने pause केलं,

 

ती पुन्हा पुन्हा पाहू लागली,

 

 

पाहून तिचे अश्रू थांबेना..

 

आईने सासूबाईंच्या पाया पडल्या,

 

मग सासूबाईनी खाली पर्स मुद्दाम पाडली आणि तिच्याही आईच्या पायांना स्पर्श केला..इतक्या नकळत की आईलाही समजलं नाही..

 

काही वेळात तिची आई खोलीत धावत आली,

 

“शुभदा अगं तुझ्या सासूबाई आपण दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांची आणि साडीची पिशवी इथेच विसरून गेल्या…त्यांना फोन कर पटकन..”

 

शुभदा ने पटकन फोन लावला..

 

“हॅलो आई, तुमची पिशवी इथेच विसरल्या तुम्ही..”

 

“विसरले नाही.. मुद्दाम ठेवली आहे. मला जरी मानपान हवा असला तरी मानपान देण्याऱ्याची व्यथा विसरले नाही मी..आई बाबांना सांग मला जे हवं ते मिळालं आहे, या दागिन्यांच्या पैश्यांनी लग्नखर्च करा..नातेवाईकांना सांगेन फोटो दाखवून की त्यांनी इतकं दिलंय… ते थोडीच सोनं दाखवायला लावतील? 

 

 

शुभदा भरून पावली,

 

सगळा राग शांत झाला..

 

तिला समजलं,

 

तिची एक कहाणी,

 

तशी त्यांचीही एक कहाणी असते..

 

कसलीतरी दीर्घकाळची प्रतीक्षा असते..

 

एक तहान असते,

 

तिला समानतेची होती,

 

तर त्यांना सन्मानाची होती..

 

दोघांचीही तहान आज भागली होती…

 

समाप्त

(छोटीशी गंमत: तुमचे जनरल नॉलेज तपासा)👇👇👇

 

3 thoughts on “मानपान-3”

  1. खुप छान
    आपली संस्कृति आहे ति जपलीच पाहिजे,
    जुन्या प्रथा खुप विचार करुन केल्या गेलेल्या आहेत हेच बरोबर आहे.

    Reply
  2. खुपच सुंदर व सत्य कथा खूप ठिकाणी असं घडत राहीलेल्या पर्स मुळे गैरसमज दूर झाला हे छान झाल

    Reply

Leave a Comment