राहुल कुमारच्या वागण्याने वडिलांना दुखापत झाली, अपमानास्पद वागणुक मिळाली…
पोलीस हसायला लागले,
“कुणाविरुद्ध बोलताय? पुरावा आहे का?”
“हॉस्पिटलचा सगळा स्टाफ साक्ष देईल..”
“ठीक आहे, मग त्यांना घेऊन या..”
तिने स्टाफला कळवलं,
सर्वजण साक्ष द्यायला तयार झाले,
पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सर्वांना घेऊन यायला सांगितलं,
ही कुणकुण राहुल कुमारला लागली, आणि त्याने त्याची पॉवर वापरून प्रकरण दाबण्याचे तंत्र वापरले, हे काही नवीन नव्हतं त्याच्यासाठी,
एका रात्रीत काय झालं कुणास ठाऊक,
स्टाफमधून एकही जण यायला तयार झाला नाही,
तिने संताप व्यक्त केला,
“ज्या माणसाने इतकी वर्षे या हॉस्पिटलसाठी दिली त्याच्यासाठी तुम्ही पुढे येऊ शकत नाही??”
तिथल्याच एका वडिलांच्या मित्राने तिला बाजूला बोलावलं,
डोळ्यात पाणी आणून सांगितलं,
“बाळा, आम्ही तुझ्या वडिलांच्या सोबत आहोत, पण जेव्हा आपलं स्वतःचं कुटुंब पणाला लागतं तेव्हा दुसरी कुठलीच गोष्ट दिसत नाही..”
तिला अर्थ समजला,
स्टाफच्या कुटुंबियांना धोका पोहोचवण्याची धमकी दिली गेली असावी, स्टाफला हतबल करण्यात आलेलं,
माणसाच्या पॉवर पुढे कधी कधी तत्व माघारी घ्यावी लागतात,
तिच्या घरच्यांनीही तिला समजावलं,
नको नाद करुस,
तिने ऐकलं नाही,
कोर्टात गेली,
वकिलांना भेटली,
वकिलांनी तिला दिलासा दिला,
तुला न्याय मिळवून देईल अशी हमी दिली,
केस पुढे सरकलीच नाही,
महिने सरत गेले,
मग एके दिवशी सुनावणीची तारीख आली,
तिला काही समजायच्या आत राहुलला निर्दोष ठरवून तिच्यावरच मानहानीचा गुन्हा दाखल झाला,
पण दयेपोटी तो मागे घेतल्याचा आवही त्याने आणला,
कोर्टातून सगळे बाहेर पडत होते,
त्याच्याभोवती गर्दी जमलेली,
त्याच्यासोबत फोटो घेण्यासाठी, त्याची मुलाखत घेण्यासाठी…
त्याने नेहमीप्रमाणे सर्वांना झिडकारले,
गाडीत बसता बसता एक नजर हिच्याकडे पाहिले,
आणि छद्मी हसला,
तिच्या डोळ्यात पराभवाचे आणि संतापाचे, असे दोन्ही अश्रू होते,
ती पूर्णपणे एकटी होती,
वडिलांच्या सन्मानासाठी लढली होती,
तिच्याबरोबर कुणीही नव्हतं,
त्या एका क्षणी तिचा देवावर, न्यायव्यवस्थेवर आणि सत्यावरचा विश्वास उडाला,
माणसाच्या जगात असत्य जिंकलं,
पण नियतीच्या जगात सत्याचंच पारडं जड असतं,
जशी त्याची गाडी रोडवर निघाली तसं समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांची गाडी उडवली,
नियतीला इतका सोपी शिक्षा करायची नव्हती,
तो जगला, पण दोन्ही पाय गमावून बसला,
त्याच्या घमंडी स्वभावामुळे त्याचं कुटुंबही त्याच्या सोबत नव्हतं,
दोन बायका करून त्याही सोडलेल्या त्याने,
याक्षणी तो एकटा पडला,
सिनेमे, येणारं काम बंद झालं,
तो खंगत गेला,
त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल झाला,
ज्या नजरा आजवर त्याच्याकडे डोळे विस्फारून बघत होत्या त्याच डोळ्यात त्याला आज दया दिसत होती,
जी लोकं त्याच्याजवळ जाण्यासाठी आतुर असायची,
आज त्याच लोकांना त्याला मदतीसाठी विनवण्या कराव्या लागायच्या,
व्हीलचेयर वर तो बसून असायचा,
स्टाफ सुरवातीला विशेष काळजी घेई,
पण नव्याचे नऊ दिवस,
त्याचं आकर्षण कमी झालं,
त्याच्याकडे लोकं तूसडया नजरेने बघायला लागले,
कारण तो हतबल असला तरी घमंड अजून गेला नव्हता,
लोकं आपल्यासाठी बैचेन होतात याची त्याला सवय,
आजही तो हाच गैरसमज करून बसलेला,
पण जेव्हा हा गैरसमज दूर होऊ लागला तेव्हा तो अजूनच खंगत गेला,
पैसे संपत चालले होते,
त्याची टीम कधीच त्याला सोडून गेलेली,
कुणीही उरलं नव्हतं,
व्हाईलचेयर वर बसून आजूबाजूला बघत राहायचं, एवढंच काम त्याला उरलेलं,
तिचे वडील त्याच्या नजरेला पडायचे,
आजूबाजूच्या लोकांशी असलेलं त्यांचं प्रेमळ वागणं,
सर्वांना त्यांच्याबद्दल असलेला आदर,
आणि घरून प्रेमाने बायको आणि मुलगी डबा आणून देताना त्याला दिसायचे,
त्याक्षणी त्याला जाणीव झाली,
त्याने काय गमावलं…
तात्पर्य:
माणसाच्या जगात असत्य घोंगावत असलं तरी नियतीच्या जगात सत्यालाच न्याय मिळतो,
आणि वडिलांसारख्या देवस्थानी असलेल्या माणसाच्या अपमानाची हाय जिवंतपणी मरण्याच्या यातना देते…
1 thought on “मरणयातना-3 अंतिम”