“आई स्वयंपाक काय करू?”
सासूबाईंनी मेनू सांगितला तशी ती तयारीला लागली. एकेक गोष्ट सासूबाईंना आणि घरातील मोठ्या स्त्रियांना ती विचारत असे तेव्हा आईला ते खटकायचं. जेवण वगैरे करून सर्वजण आपापल्या खोलीत गेले. संगीताच्या नवऱ्याने सांगितलं की आपल्या खोलीत तू आणि तुझी आई थांब, बाबा आणि मी टेरेसवर खाट टाकून घेतो.
खोलीत आई आणि संगीता असतांना आईला राहवलं नाही, आईने दार लावलं आणि संगीताला हळूच विचारलं,
“अगं तुला सगळ्याच गोष्टी विचाराव्या का लागतात? तुझ्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट केली तर काय बिघडलं? हे बघ, मी तुला म्हणत नाहीये की तू याबाबत घरच्यांशी वाद घाल पण जी गोष्ट खटकते ती तुला बोलले..”
“आई, अगं तुझी काळजी रास्त आहे पण लक्षात घे..मी इथे नवीन आहे, या मोठ्या लोकांनी वर्षानुवर्षे ऊन पाऊस झेलत हे घर उभं केलं, कितीही अडचणी आल्या तरी ते सर्व या घरात तग धरून उभे आहेत..त्यांचा मान मोठा आहे, आणि काल आलेल्या मला सगळं आयतं मिळालं आणि मीच माझं म्हणणं कसं रेटू? थोडे दिवस जाऊदे, मलाही घरासाठी योगदान करू दे, घरासाठी थोडं झिजूदे..मग मला महत्व मिळेल..”
आईचे डोळे भरून आले, इतकी समजूतदार मुलगी आपल्या पोटी जन्माला आली म्हणून आईचा ऊर अभिमानाने भरून आला..
“खरंय मुली, पण या गोष्टी मी तुला कधी शिकवल्या हेच कळत नाही”
“आई तुला आठवतं? आपली आजी मला बागेत न्यायची आणि एकेक गोष्ट सांगायची..आजीकडूनच हे शिकले मी..”
“बागेतल्या गोष्टीतून? कसं?”
(फ्लॅशबॅक)
आई आणि वडील संगीताला खिडकीतून बघताय, ती आजीसोबत बागेत होती आणि त्यांच्यात संवाद सुरू होता..
“आजी ही रोपं का काढतेय?”
“ही वाढत नाहीये म्हणून..”
“म्हणजे जी झाडं वाढत नाहीत ती काढून टाकतात का?”
“ती काढली नाही तरी काही दिवसांनी स्वतःहून जळून जातात..”
“सगळीच झाडं का?”
“नाही, काही काही वृक्ष शेवटपर्यंत तग धरतात…म्हणूनच बघ..हा डेरेदार वृक्ष. वर्षानुवर्षे ऊन पाऊस झेलून कसा बहरलाय, सर्व वृक्षांच्या तुलनेत सर्वात जुना आणि डेरेदार वृक्ष म्हणून याची महत्ता. ऊन पाऊस झेलून सुद्धा जो तग धरतो, असंख्य वादळं नेटाने पेलतो आणि तक्रार न करता आपल्यासोबत इतर वेलींनाही आधार देतो त्याला अढळपद प्राप्त होतं..काल याचं एक छोटंसं रोपटं होतं, तेव्हा कुणी याकडे पाहत नव्हतं, याला काहिही महत्व नव्हतं, पण आज बघ….”
समाप्त
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.