प्लॅन 3 अंतिम

” आता काहीही झालं तरी ही नोकरी मिळवायचीच..”

देवासमोर त्याने हात जोडले आणि प्रार्थना केली,

“देवा, काहीही कर पण मला नोकरी मिळू दे..”

त्याने मुलाखत दिली, चांगली गेली..

तो त्यांच्या प्रतिसादाची वाट बघू लागला,

एक आठवडा झाला, दोन आठवडे झाले, महिना झाला..

No response…

घरातले गहू परत संपत आलेले,

आता त्याने देवाला धारेवर धरलं,

“आता जर तू मला नोकरी मिळवून दिली नाहीस तर तुझ्यासमोर प्राण सोडेल..”

दुसऱ्याच दिवशी त्याला कंपनीकडून ऑफर लेटर आलं,

घरात आनंदी आनंद झाला,

पगार फार नव्हता पण किमान खाण्यापिण्याची सोय भागली,

एके दिवशी नोकरीवरून तो थकून घरी आला,

जेवला आणि लगेच त्याचे डोळे लागले,

त्याला स्वप्न पडलं,

साक्षात गणपती बाप्पा त्याच्या स्वप्नात,

व्यंकट स्वप्नातच देवासमोर हात जोडू लागला,

“बाप्पा..तुझ्यामुळे मी नोकरीला लागलो, तुझे खूप खूप आभार..”

गणपती बाप्पा त्याच्या शेजारी उदास मनाने येऊन बसला,

“काय झालं बाप्पा?”

“तुझ्या मनासारखं केल्यामुळे मला माझं मन मरावं लागलं..तुझ्या हट्टापुढे माझं काहीही चाललं नाही..”

“म्हणजे? मला नोकरी मिळू नये असं वाटत होतं का तुला?”

“होय..”

“का पण? माझ्याकडून काही चूक झालीये का?”

“बाळा, आपल्या लेकरांचं वाईट व्हावं असं कोणत्याच बापाला वाटत नाही, पण माझा प्लॅन वेगळा होता, तू तो यशस्वी होऊ दिला नाही..”

“कोणता प्लॅन?”

“तू हुशार आहेस, प्रामाणिक आहेस..नोकरीतून तुटपुंज्या पगारात तू काम करावं असं मला अजिबात पटत नव्हतं..”

“मग पैसा कुठून कमावला असता मी? काय प्लॅन होता तुझ्या डोक्यात?”

“तुला यशस्वी व्यावसायिक झालेलं बघायचं होतं मला…तुझ्या नावावर या गावात एक कुरियर कंपनी आणि त्याच्या अनेक शाखा आजूबाजूच्या गावात चालू करून द्यायच्या होत्या, तुझं उत्पन्न लाखोंच्या घरात न्यायचं होतं… तुला खूप मोठं झालेलं पाहायचं होतं… पण तू हट्ट केलास आणि माझा नाईलाज झाला…”

व्यंकट खाडकन जागा झाला,

त्याच्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं..

गोणी घेऊन आलेला गणेश,

कुरियरचा संकेत,

मोदक,

नेवैद्य…

व्यंकटच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं,

त्याने तसेच हात जोडले,

आणि देवाची एकदा माफी मागितली…

समाप्त

तात्पर्य

एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नसेल तर देवाच्या मनाप्रमाणे होऊ द्यावी, कारण तेव्हा ते आपल्याला क्षणिक दुःखं वाटत असलं तरी देवाच्या प्लॅनमध्ये पुढे खूप काही सुखं वाढून ठेवलेली असतात…

आयुष्यात जे काही घडत असतं त्याच्यामागे देवाचा मोठा काहीतरी विचार असतो, ज्यात आपलं सुख असतं..

त्या विचाराला नमन करायचं आणि समोर येईल ते प्रसाद म्हणून स्वीकारायचं…

354 thoughts on “प्लॅन 3 अंतिम”

Leave a Comment