प्रक्रिया-2

या वाक्याने तिला काहीसा धीर आला,

मनातली चलबिचल थांबली..

ती लग्नाला तयार झाली,

तिच्या आवडत्या मुलासोबत,

ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलेलं..

आपण प्रेम केलेल्या मुलाशी आपलं लग्न होतंय याहून मोठा आनंद एखाद्या स्त्रीला काय असू शकतो?

लग्न झालं,

ती नवीन घरी आली..

आपण कल्पना केलेली त्यापेक्षा वेगळं चित्र असावं असं तिला वाटत होतं,

पण तिने जसा विचार केलेला तसंच झालं..

घरच्यांना तिचं नोकरी करणं, आधुनिक राहणं खटकत होतं..

आणि तिला अपेक्षा होती की घरच्यांनी आपल्याला आपण आहोत तसं स्वीकारायला हवं..

त्याच्या घरचे सुशिक्षित नसले तरी मनाने चांगले होते,

एका शब्दाने तिला काही बोलत नसत,

पण त्यांच्या नजरेतून तिला सगळं कळत होतं,

नजरेतूनच सगळी नाराजी दिसत असायची,

ती अस्वस्थ होत होती,

एकवेळ यांनी तोंडावर बोलून दाखवलं असतं तर ऐकायला काही वाटलं नसतं,पण या नाराज नजरा तिला खुपत होत्या..

या सगळ्यात त्याची भूमिका तटस्थ होती,

त्याला त्याचं प्रेम मिळालं होतं, तो फक्त प्रेमाच्या गोष्टी करे,

बाकी मुलांसाठी तर या बाकी गोष्टी जुजबी असतात,

त्यांना याचं महत्व वाटत नाही,

काही महिने सरली,

ती मैत्रीण पुन्हा एकदा भेटली,

“काय गं? कशी आहेस?”

“तुला जे म्हटलं होतं तेच झालं..”

“म्हणजे?”

“ते मला आणि मी त्यांना नाही स्वीकारू शकत आहे..”

“ते काही बोलताय का तुला? छळ करताय का तुझा?”

तिने डोक्यावर हात मारून घेतला आणि ती हसली..

तिच्या हसण्यातून मैत्रिणीला जे समजायचं ते समजलं..

“बाकीचं माहीत नाही, पण तुला तुझं प्रेम मिळालं याचं एक विलक्षण समाधान तुझ्या चेहऱ्यावर आज मला दिसतंय..”

“आयुष्यात एक गोष्ट मिळते तर दुसरी गमवावी लागते हेच खरं..”
*****

1 thought on “प्रक्रिया-2”

Leave a Comment