पाहुणा-3 अंतिम

सासूबाई आणि कावेरीबाई गप्पा मारत असतांना साधना सासूबाईंना सांगायला गेली की इस्त्रीचे टाकलेले कपडे मी आणायला जातेय..सासूबाईंनी मान डोलावली, पण कावेरीबाई त्याच्यावरही काहीतरी बोलणार हे तिला माहीत होतं..

“7 वाजले, आता कुठे बाहेर जातेय? आमच्याकडे सातच्या आत बायका घरात असतात…हे शोभत नाही हं माई तुझ्या सुनेला..”

साधनाने हातातली पर्स खाली ठेवली. इतक्यात मोठ्या जाउबाई सुद्धा तिथे आल्या. जाउबाईंना धाक होताच की साधना काहीतरी बोलून बसेल म्हणून…त्या तिला तिथून न्यायचा प्रयत्न करत होत्या,

“साधना इकडे ये गं जरा काम आहे..”

“ताई, तुम्ही थांबा जरा. हा मावशी काय म्हणत होतात तुम्ही? गावाकडे सातच्या आत सगळे असतात…पण मावशी हे शहर आहे, इथे रात्री 12 पर्यंत बायका माणसं रस्त्यावर फिरतात..”

कावेरीबाईंचे डोळे विस्फारले गेले, त्याही उलट म्हणाल्या,

“नका तुमच्या शहराचं कौतुक सांगू… हे काही चांगलं नाही रात्री 12 पर्यंत फिरायचं..”

“हो पण आता इथे पुढारलेली लोकं आहेत म्हंटल्यावर काय करणार ना… “

कावेरीबाईंना चांगलाच राग आला. दुसऱ्या दिवशी कावेरीबाईंनी घरी परतण्याची वेळ झाली. सासूबाई त्यांना साडी आणण्यासाठी बाहेर गेलेल्या. मोठी जाऊ घरातच होती. हीच संधी शोधून तिने कावेरी बाईंना फैलावर घेतलं…

“मावशी? थांबा की अजून चार दिवस..”

“नको बाई, मला सवय नाही अश्या वातावरणाची..”

“तुमचं लग्न ना शहरात व्हायला हवं होतं, किती छान दिसता तुम्ही, छानपैकी ड्रेस घालून मिरवलं असतं आमच्या सासूबाईंसाखं, ditto मधुबाला सारख्या दिसल्या असत्या..”

कावेरीबाईंच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं गेलं आणि कावेरीबाईंना अगदी गलबलून आलं…त्या पुटपुटत होत्या,

“काय माझ्या आई बापाला सुचलं आणि त्या गावात दिलं मला..”

“हेच…हेच सलत आहे तुम्हाला, आणि त्याचा राग तुम्ही असा काढता..”

“म्हणजे??”

“म्हणजे आपल्याला मिळालं नाही मग दुसऱ्याचं कसं वाईट यात तुम्ही स्वतःचं समाधान करून घेताय. हे बघा मावशी, मला तुमच्याबद्दल आदर आहे. प्रत्येकाच्या नशिबात सगळ्या गोष्टी येत नसतात. आम्ही शहरात राहतो, सासूबाई आम्हाला समजून घेतात, आम्ही त्यांना समजून घेतो. आमचं सगळं सुरळीत सुरू आहे. पण तुम्ही आल्या की काहीबाही बोलतात, आमची उणीदुणी काढुन सासूबाईंचं मन दूषित करतात…हे काही बरोबर नाही…तुम्ही उद्या निघून जाल, पण आम्हाला आयुष्यभर एकत्र राहायचं आहे आणि तेही आनंदाने, नका आमच्या नात्यात ढवळाढवळ करून आमचं नातं खराब करू..”

कावेरीबाईंना प्रचंड संताप झाला,साधनाचं असं तिखट बोलणं जिव्हारी लागलं…पण आता आपण अजून काही बोललो तर ही काय बोलेल या धाकाने त्या शांत राहिल्या.

सासूबाई घरी आल्यावर त्या शांतच होत्या, सासूबाईंनी विचारलं,

“काय गं, चेहरा का उतरला आहे??”

“त्यांना ना एकदम त्यांच्या नातवाची आठवण आली..”

साधना म्हणाली,

कावेरीबाईंनी तिच्याकडे रागाने पाहिलं, आणि गपगुमान आपली बॅग उचलून त्यांनी निरोप घेतला…

मोठ्या जावेला चक्कर यायचीच बाकी होती. पण तिला साधनाचं मनापासून कौतुक वाटलं, जे तिला 3 वर्षात जमलं नाही ते साधनाने एका दिवसात करून दाखवलं…तिने साधनाची पाठ थोपटली.

प्रत्येक कुटुंबात अशी काही माणसं असतात जी दोन दिवस येतात पण घरातल्या माणसातच गैरसमज निर्माण करून निघून जातात. ही माणसं तात्पुरती असतात पण कुटुंबाला मात्र कायम एकत्र राहायचं असतं, त्यामुळे अश्या व्यक्तींना वेळीच त्याची जाणीव करून देणं गरजेचं असतं.

समाप्त

Leave a Comment