आजवर कधीच त्याने आपला मोबाईल बायकोच्या नजरेस पडू दिला नव्हता, अंघोळ करतानाही सोबत घेऊन जाई,
पण तिनेही शिताफीने त्याचा पासवर्ड माहीत करून घेतला होता,
आज संधी मिळाली,
त्याचा मोबाईल तिच्याकडे होता,
तिने पटकन पासवर्ड टाकला आणि सर्व चेक केलं,
एकेक गोष्ट बघून तिच्या पायाखालची जमीन सरकत होती,
त्याचे आणि मुलींचे चुकीच्या स्थितीतील फोटो, दारू, व्यसनं करतानाचे फोटो, कित्येक महिलांशी केलेले विचित्र चॅट, फूस लावणारे मेसेज…सगळं बघून तिच्या हातातला मोबाईल गळून पडला…
तो बाहेर आला तसा तिने त्याला जाब विचारला,
आपलं सगळं पितळ उघडं झालंय समजल्यावर त्याने आईला हाक दिली,
“आई ही तुझी सून बघ, माझ्यावर कसले घाणेरडे आरोप करतेय…”
“माझ्याकडे पुरावे आहेत, दाखवू का?”
तिने मोबाईल काढताच त्याने तिच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला,
“आई माझ्यावर संशय घेतेय ही..”
“अगं तुला काही लाज, नवरा एवढा दमून आलाय तर आल्या आल्या सुरू केलं..”
“दमून??? आई ती लोकं काय म्हणाली ऐकलं नाही का तुम्ही?”
“अगं आपल्या नवऱ्याला सोडून बाहेरच्या लोकांवर विश्वास आहे तुला??”
“बघ ना आई..” असं म्हणत त्याने हातातला मोबाईल मुद्दाम जोरात खाली आपटला..जेणेकरून सर्व पुरावे नष्ट होतील,
“चिडू नकोस बाळा..बघितलं? तुझ्यामुळे आज हा इतका चिडखोर बनलाय..”
आता तिच्या सहनशक्तीचा अंत झाला,
तिने बॅग भरली,
तिथून काढता पाय घेतला,
काही दिवस माहेरी राहिली,
मग स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतःचं घर घेतलं आणि एकटी राहू लागली,
तिकडे नवऱ्याचं आणि सासूचं काय झालं ते कधी विचारलंही नाही,
बरीच वर्षे लोटली,
तिच्या ऑफिसमध्ये लंच ब्रेक सुरू होता,
तिच्या मैत्रिणीने नुकतीच एक धार्मिक यात्रा पूर्ण केलेली, तिथले फोटो दाखवत होती ती,
एका फोटोवर तिची नजर स्थिरावली,
त्यात तिची मैत्रीण आणि मागे भिक्षेकऱ्यांची ओळ दिसत होती,
त्यातला एक चेहरा तिला ओळखीचा वाटला,
माझ्या सासू सारखी दिसते का ही???
नाही….सासू सारखी नाही…सासूच आहे ती..!!!
तिच्या अंगावर शहारा आला,
नवऱ्याने तिला तर फसवलं होतंच, पण ज्या आईने त्याचावर डोळे झाकून विश्वास ठेवला तिलाही???
समाप्त
तात्पर्य:
आंधळ्या पुत्रप्रेमापोटी अनेक डोळस आयुष्य बरबाद झाले आहेत. वेळीच ही पट्टी काढा.
1 thought on “पट्टी-3 अंतिम”