नणंद-2

“काहीही म्हणा पण मेघा कुणाचाही वाढदिवस असला तरी स्टेटस ठेवायला विसरत नाही हो…सर्वांना फोन करून त्यांची कायम विचारपूस करत असते, माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे तर सकाळी सकाळी फोटो टाकला तिने..”

साक्षी हे ऐकून अचंबित झाली,

या त्याच मावससासू होत्या ज्यांना एका ट्रीटमेंट साठी सासूबाईंनी घरी आणलं होतं, तेव्हा पूर्ण दोन महिने त्यांची सेवा एकट्या साक्षीने केली होती…त्याबद्दल आजवर कुणी तिचं नाव काढलं नाही, आणि 2 सेकंदात टाकलेल्या फोटोचं इतकं कौतुक??

दिवसेंदिवस हे सगळं बघून ती निराश होत असायची,

नवऱ्याला या सगळ्यात स्वारस्य नव्हतं, त्याला हे सगळं क्षुल्लक वाटायचं..”दुर्लक्ष कर” असं तो म्हणायचा…

असंच एकदा तिची नणंद, कोमल माहेरी आली. साक्षीला खूप आनंद झाला, कोमल आणि तिचं नातं खूप छान होतं. दोघी एकमेकींशी प्रेमाने राहायच्या. कोमल येताच साक्षीने भरपूर पदार्थ बनवले, तिचे लाड होतील अश्या सगळ्या गोष्टी केल्या.

कोमल घरी आली, सासूबाईंना आनंद झाला. गप्पा गोष्टी सुरू असतांना सासूबाईंनी मेघाचा विषय काढलाच, “ती असती ना तर आत्तापर्यंत स्वयंपाक झाला असता, आणि तुला बघून इतका आनंद झाला असता ना तिला, सकाळीच फोन येऊन गेला तिचा…तू येणार म्हणून खूप आनंद झाला तिला..”

कोमलला सगळं स्पष्ट दिसत होतं.

या मिनिट दोन मिनिटाच्या फोनच्या कारभाराने मोठी वहिनी स्वतःची इमेज चांगली बनवत होती, आणि अबोल अशी लहान वहिनी राबून राबून झिजून जातेय हे कोमलला कळत होतं..

मेघा आणि तिचा नवरा सुट्टीत भारतात येणार असं ठरलं, चांगली महिनाभराची सुट्टी काढून दोघे थांबणार होते..

कोमलने विचार केला आणि साक्षीला सांगितलं,

“मोठ्या वहिनी,म्हणजेच तुझ्या जाउबाई मेघा…पुढील आठवड्यात घरी येताय..तुला एक सांगते ते ऐक, ते आले की दुसऱ्याच दिवशी तू माहेरी निघून जा..”

“काय बोलताय ताई? ते येणार आणि मी जाऊ? त्यांचं कोण करेल मग??”

“आयुष्यभर सर्वांचं करत राहणार आहेस का? तुझी तगमग मला दिसतेय सगळी…इतकंही भोळं बनून नाही चालत वहिनी… मी आईला बरोबर समजवते…”

कोमलने गेम खेळायला सुरवात केली, सगळं काही साक्षीला तिच्या कष्टांची पावती देण्यासाठीच फक्त…

“आई, अगं आता मेघा वहिनी येणार, किती मस्त ना..”

1 thought on “नणंद-2”

Leave a Comment