देवी रक्षति रक्षितः भाग ५ ©सारिका कंदलगावकर

देवी रक्षति रक्षितः भाग ५

मागील भागात आपण पाहिले की शांभवीचा जन्म हा जणू देवीभक्तीचा प्रसाद आहे. आता बघू पुढे काय होते ते.

“हिचा जन्म.. देवीचे फळ??” पार्थने विचारले.

“हो.. असं आम्ही तरी मानलं.” सुधाकरराव म्हणाले.

“पण त्याचा आणि माझा काय संबंध? बाहेरचं काही खायचं प्यायचं नाही वगैरे नियम मला का?” पार्थ विचारत होता.

“कारण.. जशी चांगली शक्ती असते तशी वाईट शक्तीही असतेच.”

“मग??”

“शांभवीमध्ये चांगली शक्ती आहे असं मानलं तर कुठेतरी वाईट शक्ती आहे.. जी हिच्यापाठी आहे.” बाबांनी शांभवीकडे बघितले. पण ती तर त्या चिन्हाचे निरिक्षण करत होती.

“हिच्यापाठी.. वाईट शक्ती??” पार्थ हसू लागला. ते बघून बाबा चिडले.

“तुला मस्करी वाटते आहे का? अश्या अनेक गोष्टी तुझ्या जन्माआधी घडल्या आहेत म्हणून आपण इथे येऊन राहतो आहोत.” बाबा म्हणाले.

“म्हणूनच आपल्याला गाव नाही.. कोणी नातेवाईक नाहीत.. आहेत ती फक्त मोजकी मित्रमैत्रिणी. बरोबर ना बाबा?” शांभवीने मान वर करून विचारले.

“हो..” बाबा उत्तरले.

“म्हणून तुम्ही माझी एवढी काळजी घेता?”

“ते एक कारण आहे. तुम्ही दोघेही आम्हाला तेवढेच प्रिय आहात. पण तुझे संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे.” बाबा म्हणाले.

“संरक्षण?? कोणापासून?” शांभवीने विचारले.

“ते मलाही माहित नाही. पण तुझ्या जन्मानंतर अश्या काही घटना घडल्या की ज्यामुळे काही अधिकारी व्यक्तींनी आम्हाला काही सूचना दिल्या आणि आम्ही त्या पाळतो आहोत.” बाबा म्हणाले.

“या अश्या कश्या अर्धवट सूचना?” पार्थ बोलत होता.

“इथे आपण जेव्हा आलो तेव्हा आपलं कोण, परकं कोण हे आपल्याला माहीत नव्हते. तुम्हाला सहलीला वगैरे पाठवायचे
म्हणजे थोडी रिस्कच होती. आणि कोणी दिलेलं काही खायचं नाही यात काय नुकसान झालं रे तुझं?” शोभाताईंनी चिडून विचारलं.

“हेच ते.. नेहमी हिच्यासाठी तुम्ही माझ्यावर चिडता. माझ्याशी चिडून बोलता.” पार्थ म्हणाला.

“ते ती समजूतदार आहे.. आणि तू नाहीस म्हणून. आता पण बघ.. साधी गोष्ट आहे. पण ती गप्पपणे ऐकून घेते आहे आणि तू वाद घालतो आहेस.” बाबा म्हणाले.

“अहो.. तुम्ही शांत बसा.. आणि पार्थ बाबांशी असं बोलू नको.. आम्हाला जे सांगायचं होतं ते झालं आहे. यापुढे तुम्ही सांगितलेलं लक्षात ठेवा म्हणजे झालं.” शोभाताईंनी विषय संपवला.

“बस्स.. एवढंच सांगायचं होतं?” पार्थने विचारले. शोभाताईंनी बाबांकडे बघितलं. त्यांनी नकारार्थी मान हलवली.

“हो..”

“श्या.. मला वाटलं होतं काही रहस्य वगैरे असेल. मग मी जाऊ?” पार्थने विचारले.

“जा..” बाबा पण पार्थवर चिडले होते.

“शांभवी, तुला पण आमचा राग आला आहे?” बाबांनी विचारले.

“कसा राग येईल मला बाबा? पण हे सगळं खूप विचित्र आहे असं नाही का वाटत?”

“वाटतं ना.. म्हणूनच तर आज तुला सांगितलं.. कारण आपल्याला ज्या गोष्टी विचित्र वाटतात त्यामागे काही ठोस कारणं असू शकतात. तू म्हणालीस की तू आज कोणाच्यातरी गाडीखाली आलीस, मग कोणालातरी भेटलीस काय.. असं वाटू लागलं की काहीतरी होणार आहे. मनावर अचानक भितीचं सावट आल्यासारखं झालं आहे बघ..” बाबा म्हणाले.

“बाबा, आधी ही मी काळजी घेत होतेच. आता तुम्ही हे सांगितल्यावर जरा जास्तच काळजी घेईन. पण एक गोष्ट मला सांगाल का?”

“बोल ना..”

“हे चिन्ह नक्की तुम्हाला कोणी दिलं? आणि त्या अधिकारी व्यक्तींना मला भेटता येईल का?”

“विश्वास ठेवशील माझ्यावर?” बाबांनी विचारले.

“हा काय प्रश्न आहे का बाबा? अर्थात.”

“मग खरंच विश्वास ठेव. मी माझं आधीचं आयुष्य सोडलं तेव्हा एक ओझरती भेट झाली होती त्यांच्याशी. त्यानंतर मला जे काही संदेश येतात ते कोणा नवीन नवीन व्यक्तीकडून येतात. ना मी त्यांना परत कधी भेटलो आहे ना ते मला कधी. पण त्यांच्यावर विश्वास ठेवून हे पाऊल मी उचलले एवढे मात्र नक्की. आणि कुठेतरी मनाला माहित आहे की कुठे ना कुठे ते आपल्या सगळ्यांवर लक्ष ठेवून आहेत.”

“माझा विश्वास आहे बाबा तुमच्यावर. मला फक्त हे चिन्ह कुठेतरी बघितल्यासारखं वाटलं. पण त्याचा अर्थ समजत नव्हता. म्हणून मी विचारले.” अपराधीपणाने शांभवी म्हणाली.

“हो.. हो.. समजलं. यापुढे जेव्हा मला त्यांचा संदेश येईल तेव्हा मी तुझी इच्छा त्यांना नक्कीच सांगेन. झालं समाधान?”

“हो बाबा..” शांभवीच्या चेहर्‍यावर परत एकदा हास्य परतले होते.

“मग जा आता झोपायला. काल रात्रभर झोप झाली नसेल ना.. उद्या ऑफिसला जायला उशीर झाला तर परत तो खडूस ओरडेल.” बाबा म्हणाले.

“बाबा.. तुम्हीपण त्याला खडूस म्हणू लागलात?”

“मग काय? माझ्या एवढ्या गोड लेकीला नुसतं धारेवर धरतो.. अजून काय म्हणायचे त्या माणसाला?” बाबा हसत म्हणाले. शांभवी जायला निघाली.

“शांभवी, ते चिन्ह देतेस ना?” बाबांनी तिला हाक मारली.

“हो बाबा..”

“आणि अजून एक.. आज जे तू काही इथे ऐकलं आहेस ते कोणालाही बोलू नकोस.”

“बाबा, मी नाही बोलणार. पण मला काही गोष्टी समजत नाहीत.”

“विचार.. उत्तर असेल तर नक्की देईन.”

“तुम्ही म्हणालात की आपल्याकडे देवीची फार आराधना व्हायची.. मग आता तर देवीची साधी मूर्ती देखील नाही. असं का?” शांभवीला हे खूप खटकत होतं.

“त्या देवीभक्ती मुळेच तर तू जन्माला आलीस. आणि अचानक काही लोकांच्या कारवाया वाढू लागल्या. त्यांच्यापासून लपता यावं म्हणून आपण आपला सगळा भूतकाळ पुसून इथे राहू लागलो. देवीशी कोणताही संबंध जोडला जावा अशी माझी इच्छा नाही.”

“बाबा.. ते माझ्यामागे नक्की कशासाठी आहेत?”

“ते कोणालाच माहित नाही. पण तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून तर आपण इथे मुंबईत आलो. जिथे लपून जाणं सहज शक्य आहे.”

“म्हणजे बाबा, आपलं हे नावही खोटं आहे?”

“तू जा.. आता.” बाबांनी बोलणं टाळलं. शांभवी शहाण्या मुलीसारखी तिथून गेली. शोभाताईंनी ती गेल्याची खात्री करून घेतली.

“तुम्ही सगळं नाही सांगितलंत.. मला भिती वाटत होती. सगळं ऐकल्यावर हे दोघं कसे वागतील याची.. नशीब माझं.”

“सगळं कसं सांगेन? तेवढं समजतं मला.. थोडं थोडंच सांगूयात. मला त्या पार्थची काळजी वाटते. तो दाखवतो, मी कसा नीडर आहे वगैरे. पण खरं समजल्यावर तो असाच वागेल का?” सुधाकरराव म्हणाले.

“आपलं आयुष्य पण आपल्याला काय काय दिवस दाखवतं आहे. कुठे आपलं तिकडचं आयुष्य आणि कुठे हे?” निराशेने शोभाताई म्हणाल्या.

“तुला पश्चाताप होतो आहे का?”

“असं कसं म्हणता? लग्न झाल्यापासून तुमच्याशी बांधले गेले आहे. तुम्ही जे कराल त्या सगळ्यासाठी मी तुमच्यासोबत आहे.. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत.” शोभाताई म्हणाल्या. ते ऐकून सुधाकररावांच्या डोळ्यात पाणी आले.

“तुझ्यामुळेच मी हे सर्व करू शकलो आहे. देवी आईचे खूप खूप उपकार आहेत माझ्यावर.. तुझ्यासारखी जीवनसंगिनी दिल्याबद्दल.” सुधाकरराव भावूक होत म्हणाले.

“आपण नक्कीच मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून शांभवीची जबाबदारी आपल्यावर आली.” शोभाताई देवाला हात जोडत म्हणाल्या.


“आदेश दे माते.. आदेश दे.. वाट बघतो आहे तुझ्या आदेशाची.. कसं शोधू तुला? कशी दिसतेस तू? कुठे आहेस तू? मला काहीच माहित नाही.. ती घटिका जवळ येत चालली आहे. ती घटिका जर चुकली परत हजारो वर्ष प्रतिक्षा करावी लागेल योग्य त्या क्षणांची.. माते.. कृपा कर बालकावर.. दर्शन दे.. मला.. दर्शन दे.”

तो ओलेत्याने देवीला विनंती करत होता. देवीचा उग्र चेहरा तिथे असलेल्या धगधगत्या होमकुंडातील अग्नीने अजूनच भयावह वाटत होता. तो होमकुंडापाशी बसला. त्याने सुरूवात केली.. शेवटची आहुती पडताच अचानक खूप जाळ उठला. धूर वर जाऊ लागला. त्यावर जाणाऱ्या धुरात त्याला एक चिन्ह दिसू लागले.

“माते.. माते.. मी तुझा सच्चा पुत्र आहे.. म्हणून तू मला मार्ग दाखवलास ना? मी नक्की तुझे गेलेले वैभव परत मिळवून देईन. ते ही तुझ्याच मदतीने..” त्याच्या डोळ्यात आनंद दिसत होता.

असं नक्की काय घडलं असेल ज्यामुळे शांभवीच्या आईबाबांना नाव बदलून रहावं लागलं असेल.. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

Leave a Comment