दिवसभर तिचे वडील फोन करत होते तिला, पण तिच्या मनात राग होता..तिने उचललाच नाही..नंतर करते कामात आहे असा मेसेज तिने टाकून दिला.
कार्तिक हसला, क्रांती छान तयार होऊन आली आणि कार्तिक कडे बघतच राहिली,
“हे काय? एकदम सूटबूट??”
“छान आहे ना??”
“मस्तच..” तिला या पोशाखातला तो खूप आवडला होता..
“बरं लग्न कुठे आहे?”
“हे काय, आपल्या मागे मंगल कार्यालय आहे तिथेच. दोन मिनिटांचा रस्ता..”
दोघेही लग्नाला गेले. क्रांतीला तिथली लोकं ओळखीची वाटू लागली. मग समजलं की तिच्या मावस बहिणीचं लग्न आहे, आणि मुलगा कार्तिकचा मित्र आहे..
तिने डोक्यावर हात मारून घेतला..
लग्न समारंभात जाताच कार्तिक भोवती गर्दी जमा होऊ लागली, जो तो कार्तिक चं अभिनंदन करत होता..
क्रांतीला धक्काच बसला, हा काय प्रकार चाललाय?
एकेकजण म्हणू लागला,
“पहिल्याच attempt मध्ये mpsc काढशील असं वाटलं नव्हतं हा..अभिनंदन..”
“सकाळी सकाळी पेपरमध्ये तुझा फोटो पाहिला आणि उडालोच..मानलं हो तुला खरंच..”
क्रांतीला चक्कर यायची बाकी होती, सगळं सोडलं आणि ती धावतच घरी गेली…पेपर चाळला..पहिल्याच पानावर कार्तिकचा फोटो,
“प्रशासकीय अधिकारी परीक्षेत कार्तिक पवार राज्यातून तृतीय..”
तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिला सगळं समजू लागलं, याला इतकं सगळं ज्ञान असणं, दिवसभर लायब्ररीत जाणं.. सकाळी पेपर वाचायला सांगणं आणि दुसरं काम घेतलंय असं सांगणं, मला सरप्राईज द्यावं म्हणून कसला अभ्यास करतोय हे नीट न सांगणं…तिने देवापुढे साखर ठेवली.जे होतं ते चांगल्या साठीच होतं यावर तिचा विश्वास बसला.डोळे पुसून ती परत कार्यालयात गेली.
तिकडे सर्वजण कार्तिक सोबत फोटो काढण्यासाठी नंबर लावत होते. तिचे आई वडील “आमचा जावई” म्हणून अभिमानाने ओळख दाखवत होते…नवरदेव त्याला भेटायला खास स्टेजवरून उतरून त्याच्या जवळ आला होता…सगळं अगदी स्वप्नवत..
घरी गेल्यावर ती फक्त त्याच्या मिठीत रडत होती..
मग म्हणाली,
“तुझ्याशी लग्न करणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय होता..मी आई होऊ शकत नाही हे माहीत असून माझ्याशी लग्न केलंस तू. देवता आहेस तू माझ्या आयुष्यातला..माझी आई होण्याची शक्यता फक्त 1% म्हणजे नगण्य होती पण तू त्या 1 टक्क्याकडे न बघता माझ्या नसलेल्या 99 टक्क्यावर प्रेम केलंस..”
असं म्हणत तिने कॅलेंडरवर नजर फिरवली, आजचा दिवस तिने गोल करून ठेवला…पण तिथेच काही क्षण थबकली,
तिची तारीख 10 नोव्हेंबर, आज 25 नोव्हेंबर… अजूनही पाळी आली नाही?? ती मागे सरकली, मटकन बसून घेतलं…मळमळ होऊ लागली…
“डॉक्टरांकडे चल..”
“काय झालं??”
“चल पटकन, कसलाही विचार करू नकोस..”
दोघेही गेले,
तिच्या टेस्ट झाल्या…
संध्याकाळी डॉक्टरांकडे रिपोर्ट घ्यायला गेले,
“अभिनंदन… तुम्ही आई होणार आहात..”
समाप्त
काय सुंदर कथा…
khup chan katha aahe
Khup sunder katha