देवता 3

गावाकडे चुलतभावाने लग्नासाठी बोलावलं आहे, पण कोणत्या तोंडाने जाऊ??”

हे ऐकून क्रांतीला राग आला, ती म्हणाली,

“कोणत्या तोंडाने म्हणजे? तुम्ही काही गुन्हा केलाय का?”

“हो, गुन्हाच आहे. मुलीचं लग्न न करता तिला घरात बसवलं हा गुन्हा, तिच्याशी लग्न करायला कुणी तयार नाही हा गुन्हा..”

“बाबा तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करायला मी तयार आहे, तुमचं भलं यात असेल तर तुम्ही कुणालाही घेऊन या…मी नाही म्हणणार नाही”

“फक्त बोलतेस असं, उद्या लाख नखरे करशील”

तेवढ्यात कार्तिक पेपर टाकायला आला, वडिलांचं लक्ष गेलं..

“या मुलाशी करशील लग्न??”

कार्तिक स्तब्ध होऊन बघत राहिला..

क्रांतीने डोळे मिटुन हो म्हटलं, वडिलांच्या डोळ्यातही पाणी आलं..

एकीकडे मुलीवरचं प्रेम आणि दुसरीकडे हतबलता..

कार्तिकला रीतसर बोलवून वडिलांनी सगळं सांगितलं,

“बोल, माझ्या मुलीशी करशील लग्न??”

कार्तिकने मुश्किलीने एक दोन वेळा तिला पाहिलं होतं, एका नजरेत त्याला ती आवडली होती. पण फारशी नजरानजर होत नसायची, सकाळी क्रांती उशिरा उठे आणि तो पहाटे पहाटे पेपर टाकून घरी जाई. त्याने त्यांची हतबलता समजुन होकार दिला. त्याच्या घरी फक्त एकदा बोलेल असं म्हटला.

क्रांतीने होकार दिला, वडिलांनी विचार केला की हा एकमेव मुलगा आहे जो लग्नाला तयार झालाय, त्याची अर्थिक कुवत नसली तरी मुलीशी नाव जोडलं गेलं तरी खूप, पैसा आपण पुरवू.

कार्तिक ने त्याच्या घरी सगळं सांगितलं, त्याच्या आई वडिलांनी मुलीला आणि तिच्या घरच्यांना गावाकडे भेटायला बोलावलं.

आई वडील आणि क्रांती मोठ्या निराश मनाने गावी गेले. तिथे कार्तिक ची आई बाहेरच उभी होती. हसतमुखाने त्यांनी सर्वांचं स्वागत केलं. क्रांती गाडीतून उतरली तोच बाजूला असलेल्या गोठ्यातून शेणाचा वास आला आणि तिने नाकाला हात लावला. पुढे कसं होणार आपलं याची तिला धडकी भरली. पण आता समोर जे आलं ते स्वीकारायचं हे ठरलं होतं.

छानपैकी पाहुणचार झाला, लग्नाची बोलणी झाली..वडील म्हणाले,

“हे बघा आपली आर्थिक तफावत असली तरी आमच्या कूस न उजवणाऱ्या मुलीला तुम्ही पदरात घेताय हा तुमचा मोठेपणा… लग्नासाठी आणि नंतर पाहिजे तेवढे पैसे मी पुरवत जाईल..”

कार्तिक चे वडील हसले आणि म्हणाले,

“साहेब, आमच्याकडे पैशाची श्रीमंती नसली तरी मनाची श्रीमंती आहे. पोरांना त्यांच्या कष्टावर संसार करू द्या, आम्हाला अन त्याला एकही रुपया नको..”

कार्तिक ची आई पुढे आली आणि म्हणाली,

“आणि कूस उजवली नाही म्हणून काय झालं? देवकी काय अन यशोदा काय, आईच असते…प्रत्येक बाई जन्मतः आई असते, तिची माया कधी आई बापावर, भावा बहिणींवर ती ओवाळून टाकत असते”


*****
भाग 4

1 thought on “देवता 3”

Leave a Comment