ट्रिप 3 अंतिम

“असं कसं? जाऊयात”

आई बाबांना नाही म्हणणं मुलगी म्हणून तिलाच पटत नव्हतं.

हॉस्पिटलमध्ये खूप वेळ गेला. घरी येत 6 वाजले. आल्यावर स्वयंपाक, कपडे घड्या घालून ठेवणं, भांडी लावणं, झाकपाक करणं हे सगळं तिने केलं आणि 8 वाजताच तिला डुलकी येऊ लागली. गाढ झोपेत असताना परत आईचा आवाज,

“समीक्षाssss….आपलं, राधिकाssss… इकडे ये गं बाळा..”

“समीक्षा धावत गेली..”

“काय गं आई?”

“बाळा माझा गाऊन ओला झालाय, तेवढा बदलायला मदत कर मला..”

आईला कधी कधी झोपेतच गाऊन ओला करायची, तिला हे माहीत नव्हतं. राधिकाने कसंतरी ते काम केलं पण तो वास आणि ते कपडे बघून तिला किळस आली. नंतर तिला झोपच लागत नव्हती.
रात्रभर ती विचार करत होती,

“मी दादा वहिनीला उगाच बोलले, आई बाबांचं खरंच किती करावं लागतं. रात्री अपरात्री उठून केव्हाही मदतीला जावं लागतं. हे सगळं वहिनीच करायची, त्याबद्दल तिने कधी तक्रार केली नाही, उलट एवढं करूनही आईच तिचे गाऱ्हाणे करत राहिली. आज एक दिवस झाला तरी मी इतकी जाम झाले, वहिनी मुलांना सांभाळून हे सगळं कसं करत असेल?”

पुढचे 7 दिवस हाच दिनक्रम सुरू होता, राधिका तर आता आजारीच पडली. झोप पूर्ण नाही, त्यातही मधेच केव्हाही उठून जागरण…कधी एकदा इथून निघते असं तिला झालं.

आठव्या दिवशी दादा वाहिनी आले तेव्हा तिचा अवतार बघून साकेत तिच्या अवताराकडे बघतच राहिला, त्याला जे समजायचं ते समजलं.

राधिकाने दुसऱ्याच दिवशी घरी जायचा निर्णय घेतला, साकेत म्हणाला, “अगं थांब की अजून थोडे दिवस, तुझी वहिनी 2 दिवस माहेरी जातेय, तू थांब मदतीला..”

राधिकाला आता नको नको झालेलं, तिचा चेहरा बघण्यासारखा झालेला…तेवढ्यात वहिनी म्हणाली,

“नका हो चेष्टा करू…ताई मी काही माहेरी जात नाहीये, मुलांच्या परीक्षा आहेत आता…”

राधिकाला हायसं वाटलं, जातांना ती आईजवळ बसली आणि आईला समजावून सांगितलं,

“आई, वहिनीला आपण खूप बोलायचो पण विचार कर इतकं सगळं कोण करतं आजकाल? तिने तुमची रात्रंदिवस सेवा केली पण कधी तक्रार केली नाही…देवाचे आभार मान, अशी सून मिळाली म्हणून तुमचं वाढतं वय निभावलं जातंय..”

आईला सगळं आधीपासूनच कळत होतं, पण वळत नव्हतं.. सुनेबद्दलचा पूर्वग्रह, दुसरं काही नाही… पण लाडक्या लेकीने सांगितल्यावर बरोबरच असणार ना ! त्यांनीही स्वतःमध्ये बदल केला…आणि अशा प्रकारे साकेतची 8 दिवसांची ट्रिप फळास आली.

2 thoughts on “ट्रिप 3 अंतिम”

  1. खुप छान लिखाण आहे.

    वास्तवात सून काम करते तरी पूर्वग्रहदूषित भावनेने सुनेला त्रास देण्यात सासू धन्यता मानते..
    पण मुलीने समजावून सांगितल्यावर समजून घेतले हे खूप बरे झाले.
    असेच वास्तवात घडावे

    Reply

Leave a Comment