जैसे ज्याचे कर्म-3 अंतिम

तिला लवकर कळा सुरू होतील असं वाटत नव्हतं त्यामुळे सगळे निर्धास्त होते, घरातही कुणी नव्हतं, त्यामुळे आता तिची बहीण घाबरली होती.

सतीश पटकन कपडे बदलून निघायच्या तयारीत होता, त्याने आईला आणि दुर्गाला सांगितलं..

“वसुंधराला कळा सुरू झाल्या…मी निघतो..”

“अरे तिच्या घरी कुणी नाही का? इकडे दुर्गाला कधीही कळ येईल.”

“आई इकडे धावपळ करायला अख्ख गाव आहे, तिकडे एक तर तिच्या घरी कुणी नाही, एकटी बहीण काय काय करेल.”

आईला प्रचंड राग आला पण सतीश काही थांबणार नव्हता…

सतीश तिकडे गेला, त्याने पटकन दवाखान्यात हजेरी लावली, काही वेळाने तिचे आई वडील आले…बाळंतपण सुरळीत पार पडलं, एका गोंडस मुलाला वसुंधराने जन्म दिला…

त्याच दिवशी इकडे दुर्गाच्या पोटात कळा सुरू झाल्या, लागलीच तिला दवाखान्यात नेलं गेलं…धावपळ करायला बरीच मंडळी होती.. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला…

काही तासाने दुर्गा ने आपल्या नवऱ्याला फोन लावला, तिची आई आणि ती समोरासमोर होत्या, आईलाही नेमका तेव्हाच सतीश चा फोन आला,

“आई, मुलगा झालाय…”

“इकडे आपल्या दुर्गेलाही मुलगा झालाय, तू ये लवकर..”

“आई मी अजून 2 दिवस तरी येणार नाही, इकडे धावपळ करायला कुणी नाही..”

आईचा संताप झाला,

“तू जर आजच्या आज आला नाहीस तर तुझ्या बायका मुलांना घेऊन तिथेच रहा, इकडे पाय ठेवायचा नाही..”

असं म्हणत आईने फोन ठेऊन दिला..ती वॉर्डमध्ये आली, समोर पाहिलं तर दुर्गा रडत होती,

“काय ग पोरी काय झालं?”

“मी यांना इकडे बोलावलं तर त्यांच्या आईने माझ्यासमोर त्यांना साफ बजावलं, की बहिणीच्या मिस्टरांसोबत तू थांब..बायकोकडे गेलास तर इकडची कवाडं तुला कायमची बंद…”

आई काहीक्षण स्तब्ध झाली,

या प्रसंगात ती स्वतःलाच बघत होती,

बाहेरून रेडिओ वर भजन सुरू होतं…
ते अगदी तंतोतंत लागू होत होतं…

“कर्म येतसे फिरुनी…नाही त्याला गाव…
जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतोची ईश्वर..”

समाप्त

Leave a Comment