जैसे ज्याचे कर्म-1

सतीशची बहीण दुर्गा बाळंतपणासाठी माहेरी आली होती. आईने लेकीचे सगळे हट्ट पुरवत होती. दुर्गाचं हे पहिलं बाळंतपण त्यामुळे घरातले सर्वजण पुरेपूर काळजी घेत होते. दुर्गाला दोन भाऊ, सतीश आणि बजरंग. सतीशचं लग्न झालं होतं, त्याचीही बायको बाळांतपणासाठी माहेरी गेलेली. तिला सातवा महिना होता आणि बहिणीला आठवा.

सतीश इकडे बहिणीची काळजी घेतच होता आणि सोबतच बायकोचीही वेळोवेळी विचारपूस करत होता.

“अरे सतीश, येतांना बदाम आणि खारीक घेऊन ये जास्तीचे..”

“अजून काही आणायचं आहे का?”

“एवढं आण, काही लागलं की फोन करेन..”

सतीश बाजारात जाऊन सामान घेऊन आला.

“हे काय? जास्तीचं का आणून ठेवलं?”

“म्हटलं थोडं वसुंधराकडे पाठवूयात..आप्पा जाणारेत त्यांच्या गावी तेव्हा त्यांच्याजवळ पाठवून देईल..”

हे ऐकताच आईचा चेहरा उतरला, बहिणीची काळजी सोडून बायकोकडे याचा ओढा. आई धुसफूस करू लागली,

“तिच्या घरचे आहेत की तिची काळजी घ्यायला..”

“आई तुलाही माहीत आहे, तिला भाऊ नाही..घरी ती, तिची बहीण आणि वडील फक्त. वडील आजारी असतात तिचे, काय करतील ते एकटे?”

“फार काळजी तुला त्यांची…हो ना?”

“माझ्या बायकोची काळजी मी नाही करणार तर शेजारचा करेन का?”

आई आणि मुलामध्ये वाद सुरू झाले, हे नेहमीचंच होतं. आपल्या मुलाला आता त्याच्या बायकोचाही जबाबदारी आहे हे त्याच्या आईला सहन होत नव्हतं. तिच्या मते सतीशने फक्त स्वतःच्या आई वडील आणि बहिणीकडे बघावं.

तेवढ्यात आप्पा आले,

“दुर्गे…तुझ्या नवऱ्याने काय पाठवलं आहे बघ…”

दुर्गाचा चेहरा फुलला, पोस्टातून तिच्या नवऱ्याने बराच सुकामेवा पाठवला होता. ते पाहून आईचा चेहरा आनंदला,
“काय बाई, जावई असावा तर असा..”

मुलाने एकदा आईकडे पाहिलं पण वाद नको म्हणून त्याने बोलणं टाळलं…


Leave a Comment