जेव्हा त्या उमगतात-3 अंतिम

दुसऱ्याच दिवशी सासूबाई खूप वेळ झाला तरी उठत नव्हत्या,

जे नको होतं तेच झालं,

झोपेतच त्यांना एटॅक आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली,

ती खूप रडली, कुटुंब पोरकं झालं,

तिला त्यांची कमी जास्तच जाणवत होती,

काम करतांना मधूनच तिला भास होई त्यांच्या ओरडण्याचा,

आज ते ओरडणं, रागावणं तिला हवंहवंसं वाटत होतं,

आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झालेली,

वर्ष सरत गेली,

एकदा खूप वर्षांनी तिची आई तिच्याकडे राहायला आलेली,

आईने लेकीचा संसार पाहिला,

लेकीकडे पाहिलं,

म्हणाली,

“तू अशी नव्हतीस..”

“म्हणजे??”

“कामात इतकी तत्परता, वक्तशीरपणा, सहनशीलता आणि संयम तुझ्यात नव्हताच कधी…लग्नाआधी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आकांडतांडव करायचीस, आता हे सगळं आलं कुठून??”

तिच्या डोळ्यापुढून मागचा काळ सरसर गेला,

कौतुक जसं पचवतो तसा अपमानही पचवता यावा यासाठी सासूबाईंचं पाहुण्यांसमोर बोलणं,

मनाला मुरड घालण्याची सवय व्हावी म्हणून साडी घेताना लावलेले बोल,

वेळच्या वेळी कामं व्हावी म्हणून आरडाओरड,

हे कशासाठी होतं?

शेवटच्या दिवसात त्या जे सांगत होत्या त्याचा अर्थ तिला आत्ता उमगला,

आपल्या लेकाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आधी सुनेला खंबीर बनवणं, पुढच्या पिढ्यांना संस्कारांची आणि शिस्तीची शिदोरी मिळावी म्हणून घरातल्या स्त्रीला तयार करणं…सगळं सगळं तिला आत्ता समजत होतं,

ती भावुक झाली,

आईला म्हणाली,

“आई तू आयुष्य दिलंस, पण ते निभावून कसं न्यायचं हे सासूबाईंनी शिकवलं..
आई तू सुखाची पाखरण केलीस, पण भयाण वादळात तग धरण्याचं बळ सासूबाईंनी दिलं..
संसार कसा करायचा हे तू शिकवलंस, पण संसार तारून कसा न्यायचा हे सासूबाईंनी शिकवलं..”

आईलाही हे ऐकून समाधान मिळालं,

“भाग्यवान असतात मुली… खंबीर होण्यासाठी त्यांना सासू सारखा शिक्षक मिळतो…उगाच नाही स्त्री पुरुषापेक्षा खंबीर असते असं म्हणतात..”

समाप्त








1 thought on “जेव्हा त्या उमगतात-3 अंतिम”

Leave a Comment