दुर्गावती ने पुस्तकात बरोबर संकेत दिला होता, आपल्याला फक्त मुलीच आहेत म्हणून आपल्याला दुय्यम स्थान आहे असा चुकीचा समज स्त्रीमध्ये निर्माण होऊ शकतो, रेखाच्या बाबतीत तेच झालेलं. रत्नपारखी घराण्याचं नाव केवळ मुलं पुढे नेतील, इथली श्रीमंती मुलांनाच मिळेल, पण माझ्या मुलींचं काय होईल या विचाराने रेखाच्या मनात धुडगूस घातलेला. देव्हाऱ्यात असलेली
ती वस्तू म्हणजे करोडोंची संपत्ती असं अरुंधती आजी सांगत असायची. अरुंधती आजीला तिच्या सासूने पुस्तकाला नीट जपून ठेवायला सांगितलं, यात संपत्ती असो नसो आजीला ते फक्त सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या पिढ्यांपर्यंत सुखरूप पोचवायचं होतं. अरुंधती आजीला दुर्धर आजार जडला अन आजी अंथरुणाला खिळली, स्वतःच्या तब्येतीपेक्षा आजीला पुस्तकाचं संवर्धन महत्वाचं होतं. रेखाला पुस्तकाचं समजताच तिने त्याचा ताबा घेतला होता. पण अरुंधती आजीला ते पुस्तक थोरल्या सुनेकडे, जानकीकडे द्यायचं होतं. रेखा अन आजीत वाद झाले, माझ्या मुलींना काय मिळणार? आपल्याकडे भरपूर संपत्ती आहे तेव्हा हा खजिना माझ्या मुलींनाच हवा असं रेखाने बजावून सांगितलं. अखेरच्या काळात आजीची तब्येत खूप गंभीर झालेली, आजी कित्येकदा “दुर्गे..वाचव…दुर्गे..” असं म्हणायच्या, त्यांच्या स्वप्नात दुर्गावती देवी येऊन पुस्तकाबद्दल विचारायची तेव्हा आजी तिलाच विणवण्या करायची. रेखाला ते पुस्तक कुणाच्याही हाती लागू द्यायचं नव्हतं, म्हणूनच आजी गेल्यानंतर पुस्तकावर तिने खापर फोडून त्याला लाल कपड्यात बंदिस्त करून देव्हाऱ्यात ठेवलं अन कुणालाही त्याच्या जवळ जाऊ दिलं नाही. त्या पुस्तकासोबत एक चावीही होती, रेखाला ती मोठ्या खजिन्याची असल्याची सतत वाटत असायचं त्यामुळे ती चावी तिने स्वतःकडे ठेऊन घेतली. पण प्रत्यक्षात ती चावी म्हणजे पुस्तकाचा दुसरा भाग पद्मिनीने ज्या पेटीत ठेवलेला त्याची ती चावी होती, पद्मिनीच्या जवळच्या भाटांकडे तिने जपून ठेवायला सांगितलेली आणि पद्मिनी नारायनकरने गुरुजींना सांगितलं की तुमच्या पिढीकडे ही जबाबदारी, नारायनकर आणि रत्नपारखी कुटुंब जेव्हा एक होईल तेव्हा ही पेटी तिच्याकडे सुपूर्द केली जावी. असं सांगत त्याची चावी मात्र पांडुरंग कडे दिली. पांडुरंग ने पुस्तक आणि चावी जपून पुढच्या पिढीकडे सुखरुपपणे सुपूर्द केलेली. रुद्रशंकर गुरुजी म्हणजे त्याच भाटांची आताची पिढी. त्यांनी आपलं कर्तव्य तंतोतंत बजावलं होतं.
पद्मिनीची हुशारी पाहून शुभदाला फार कौतुक वाटलं, जेव्हा दोन्ही कुटुंब एकत्र येतील तेव्हाच पुस्तकाचे 2 भाग एकत्र केले जातील या दूरदृष्टीने तिने बरोबर दुसऱ्या भागाची चावी पुस्तकाच्या पहिल्या भागाजवळ ठेवलेली, नाहीतर आतापर्यंत त्याचं काय झालं असतं कुणास ठाऊक.
दिगंबरपंत मोठया चिंतेत होते, लीलाधर सोबर जमिनीचा व्यवहार करायचा होता, मोठी जागा विकत घेऊन त्यावर इथली पूर्ण टेक्सटाईल कंपनी तिकडे हलवायची होती, याचा खर्च जवळपास 20 कोटीत जाणार होता. रक्कम मोठी होती, दिगंबरपंतांना सहज कर्ज मिळालं असतं पण तरीही इतका मोठा व्यवहार करायचा म्हणजे त्यांना भीती वाटत होती. अखेर सर्वांशी सल्लामसलत झाली, बदल हा झालाच पाहिजे आणि रिस्क उचलणं भागच आहे असं सर्वांचं मत ठरलं. अखेर 15 कोटींमध्ये कर्ज घेऊन लीलाधरकडून जमिनीचे कागदपत्रे तयार करून घेतली.
शुभदा पुस्तकाचा पुढील अनुवाद करायला घेते, त्यात असं असतं की..
“जेनीबाई खरंच खूप हुशार आहे, रोज वर्तमानपत्र वाचते ती. परदेशात राहून इथली खडानखडा माहिती तिला आहे. तिने मला सांगितलं, त्यांच्या देशात बायका कंपन्यात जातात, कामं करतात, काहीजणी मोठ्या पदावर आहेत म्हणे.ऐकून असं कौतुक वाटलं म्हणून सांगू, हिंदुस्थानाला असे सोन्याचे दिवस कधी येतील देव जाणे. जगदीशपंत पंधरा दिवस बाहेरगावी चाललेत, ते असे जाणार असले की घरात जणू एक उत्सवच असतो. आपला नवरा घरात नाही म्हणून उत्सव..असं ऐकून विचित्र वाटलं ना? पण काय करणार? त्यांचा वावर म्हणजे हातात चाबूक घेऊनच आमच्यामागे फिरत असतात. नको नको होतं अगदी. ठरल्याप्रमाणे ते गेले अन घरात आम्ही फार करामती केल्या. पांडुरंग ने गोडाचं खायला आणलं, कांता सुद्धा आमच्यात येई, फार गुणी मुलगी ती. जेनीबाईला घरी बोलवून घेतलं, तिने तिच्याकडचे छान गोलाकार कपडे खास आणले, मी अन कांताने ते घालून पाहिले. किती मोकळं वाटलेलं म्हणून सांगू. अश्या मोकळ्या कपड्यात कायम वावरता आलं असतं तर? असो. जेनीबाई मला घेऊन बाहेर फिरायला नेई, माझ्याच देशातल्या गोष्टी मला नव्याने दाखवी. कितीतरी ठिकाणं मी अजूनही पाहिली नव्हती. मग ती बॉम्बे ऑफिसमध्ये जाई. तिथे सरकारी काम असावं बहुतेक. त्यांना पैसे देई आणि काही कागदावर लिहून देई. मला समजतच नव्हतं हे काय चाललंय. मग एकदा तिला विचारलं तेव्हा तिने सगळं सांगितलं. दुनिया किती मोठी आहे, कितीतरी व्यवहार होतात या जगात, आपण मात्र चुलीभोवती रिंगण घालून बसलोय. या काळात पांडुरंग अन कांताचं बोलणं वाढलं, एके दिवशी दोघांना चोरून बोलताना मी ऐकलं, कांता म्हणत होती की आपलं लग्न झालं असतं तर किती सुखी असतो आपण? पण जात आडवी येते, आता माझ्या वडिलांनी एक बीजवर शोधलाय माझ्यासाठी, खूप पैसे देणार आहे म्हणे. आता नशीबच वाईट असेल तर कुणापुढे हात पसरवू?? दुर्गावतीने हे ऐकलं आणि तिची तळपायाची आग मस्तकात गेली. पैशासाठी मुलीला विकायला निघाला हा बाप? ही माणसं समजता कोण स्वतःला? बायकांना हातातलं खेळणं?? दुर्गावती तडक कांताच्या आईकडे म्हणजेच पद्मिनीकडे गेली अन तिला जाब विचारला. तिची तर मुळीच इच्छा नव्हती बीजवराला मुलगी द्यायची, पण नवऱ्यासमोर काय चालणार? मग मी निर्णय घेतला, माझा जीव गेला तरी बेहत्तर पण कांताच्या आयुष्याशी खेळ होऊ देणार नाही. दिगंबरपंत आले की त्यांना सरळ दोघांच्या लग्नाबद्दल सांगणार, त्यांनी नाही ऐकलं तर सरळ पांडुरंग अन कांताला राजस्थानला माझ्या एकट्या आईकडे पाठवून देणार”
त्या काळात अशी धीरोदात्त भूमिका घेणारी दुर्गावती म्हणजे आजच्या काळातील खरी स्त्रीवादी होती. स्त्रियांवरील होणाऱ्या अन्यायाला तिने प्रतिकार केला होता. त्याही पुढे जाऊन आंतरजातीय विवाहासारख्या आधुनिक विचाराला जन्माला घातलं होतं. त्यानंतर लिहिलं होतं.
” जगदिशपंतांनी आम्हाला अगदी लाथाडून टाकलं, त्यांना मी जेव्हा हे बोलले तेव्हा माझे केस धरून माझं डोकं जमिनीवर आपटायला निघालेले, मला म्हणत होते की इतकी हिम्मत कशी आली तुझ्यात? मी काहीएक ऐकलं नाही, पांडुरंग अन कांताला पळवून लावलं अन लग्न करा असं सांगितलं. पद्मिनी दुरूनच लाखो आशीर्वाद देत होती. दोघांना दूर जाताना तिला थांबवावं असं वाटलंच नाही”
इतकं वाचून होताच शुभदाला रेखाने आवाज दिला अन चटदिशी शुभदा धावत गेली..
“मी नको म्हणत असतानाही देव्हाऱ्यातल्या पुस्तकाला हात लावलास ना? कुठेय ते पुस्तक? त्याच्या जागी हे दुसरं पुस्तक कुणी ठेवलं??”
“म्हणजे तुम्हाला माहीत आहे तर, की यात पुस्तक आहे ते, आजवर आम्हाला यात एक वस्तू आहे असंच सांगत होता..”
“जास्त बोलायला लागलीस?? आजवर इथल्या सुनांनी असं तोंड वर करून कधीच विचारलं नाही..”
“तुम्ही विसरताय, हे रत्नपारखी घराणं आहे..मान खाली घालून घरातल्या स्त्रियांनी वागावं हे या घराण्याला मान्यच नाही मुळात..”
“मला शिकवू नकोस, काल आलेली मुलगी तू अन डोईजड होऊ पाहतेय. कुठेय ते पुस्तक, ताबडतोब माझ्याकडे दे..”
“तुम्हाला कशाला हवंय ते पुस्तक? तुमच्याकडे जी चावी आहे त्यावरून खजिना शोधा की..”
रेखा एकदम चमकते. हिला कसं सगळं ठाऊक??
“तुमच्या माहितीसाठी सांगते, त्या चावीने जी पेटी उघडते ना ती माझ्याकडे आहे..”
शुभदा ती पेटी घेऊन येते, पेटी तोडलेली असली तरी त्याचं कुलूप तिने सांभाळून ठेवलेलं असतं. शुभदा त्याला किल्ली लावते अन ते खोलून दाखवते.
“ही पेटी तुझ्याकडे कशी आली?? काय होतं त्यात? कुठला खजिना होता? अन तोडायची हिम्मतच कशी झाली तुझी? त्याची चावी माझ्याकडे होती..सांग, काय खजिना होता..”
“पुस्तकाचा दुसरा भाग होता त्यात, सोडा..तुम्हाला काय कळणार खरा खजिना काय होता ते..”
“अगं मुली माझ्या आजेसासू उगाच म्हणत नव्हत्या की त्या पेटीतून पैशांची बरसात होईल म्हणून…किती सोनं होतं त्यात?? कुठे लपवलं तू??”
शुभदाला अश्या नीच मानसिकतेचा तिटकारा येतो..रेखा काही पुन्हा बोलणार तोच शुभदाला फोन येतो..
“शुभदा, लवकर हॉस्पिटलमध्ये या..दिगंबरपंतांना हृदयविकाराचा झटका आलाय..जी जमीन 15 कोटीत विकत घेतली ती अनधिकृत होती, लीलाधर पैसे घेऊन फरार झालाय..याचाच धक्का आजोबांना बसलाय.”
शुभदाच्या हातातून फोनच कोसळतो. कारण या 15 कोटींचं नुकसान म्हणजे त्याची भरपाई घर, गाड्या, जमिनी विकून द्यावी लागणार होती. रस्त्यावर येणार होते सगळे..
शुभदाचे पुस्तकाचे शेवटची काही पानं फक्त बाकी असतात. त्यात असेल का काही खजिना? त्यात असेल का दिगंबरपंतांच्या नुकसानीवर उपाय??
क्रमशः
5 thoughts on “घराणं (भाग 12) ©संजना इंगळे”