आरोहीच्या आईला समजत नव्हतं, मानव इतका चांगला मुलगा असून आणि सगळं काही जुळून येण्यासारखं असताना केवळ जातीच्या भिंतीने सगळं काही रोखून धरलं होतं. म्हणूनच आरोहीला मानव पासून दूर ठेवणं महत्वाचं होतं. इकडे आरोहीला मनापासून टूर वर जायची इच्छा असते, पण घरच्यांच्या विरोध तिला माहीतच होता. काय करावं? कुणाला सांगावं? तिने मोठ्या धीराने वडिलांना याबद्दल सांगितलं. वडिलांना एकट्या मुलीला टूर वर पाठवायला तशी भीतीच वाटत होती पण त्यांना मानव सरांबद्दल खूप आदर होता. आपल्या मुलीनेही त्यांना साथ देऊन स्वतःची भरभराट करून घ्यावी असं त्यांना मनोमन वाटत होतं.
“बाळा, मी परवानगी देऊ शकतो, पण आईला समजलं तर?”
“जाऊद्या बाबा मग..इतके अडथळे येत असतील तर नकोच..”
“नाही बाळा, तू जर टूर वर चांगला परफॉर्मन्स दिला तर तुझ्या करियर साठी ते चांगलं असेल. आईला मी बरोबर सांगतो, तू जायची तयारी कर..”
वडिलांनी मान्य केलं म्हणून आरोही खुश झाली. टूरसाठी ती प्लॅनिंग करू लागली. 2 दिवसात निघायचं होतं. वडिलांनी आईला सांगितलं..
“अगं माझी बहीण नाही का, अक्कामाई..ती आरोहीला बोलावतेय तिच्याकडे, पाठवून देऊ थोडे दिवस..”
अक्कामाई आणि आरोहीच्या आईचं फारसं पटत नसे.
“अशी अचानक काय आठवण आली त्यांना? आणि आरोहीचं ऑफिस असतं, कशी जाईल ती?”
“सुट्टी घ्यायला लावतो..अगं अक्कामाईची आता तब्येत बरी नसते, अश्यावेळी जवळच्या लोकांची आठवण येते नातेवाईकांना.. जाऊदे की आरोहीला..”
“जाऊद्या की मग..”
आई अक्कामाईला कधीही फोन करत नव्हती ना बोलत होती. लग्नात साडीवरून दोघींचं खूप वाजलेलं त्यामूळे दोघींनी अबोला धरलेला. आई अक्कामाईला फोन करून शहानिशा करणार नाही याची वडिलांना खात्री होती. अबोला असला तरी आईने नवऱ्याला आणि मुलीला त्यांच्यापासून तोडलं नव्हतं.
आरोहीने ऑफिसमध्ये मानव सरांना टूरसाठी येणार म्हणून होकार दिला. मानवला बरं वाटलं, या निमित्ताने आरोहीसोबत वेळ घालवता येईल.
“ठीक आहे मिस आरोही, टूरवर काय काय करायचं, कलाइन्ट्स ला कुठल्या गोष्टी समजावून सांगायच्या हे सविस्तर सांगतो. बसा..”
आरोही मानवकडून सगळं समजून घेते. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर घरी जाताना काही खरेदी करून घेते. बॅग त्याच दिवशी भरून ठेवते.
“चला, आता घाई होणार नाही, महत्वाचे सगळे कपडे यात भरलेत, आता डायरेक्ट उचलायचं काम बाकी असेल फक्त..बाकीचं सामान हातातल्या बॅगेत घेईन..”
रात्री आरोही झोपल्यावर आई खोलीत येते,
“काय बाई इतकी घाई झालीये हिला, बॅग भरूनही ठेवली..काय काय भरलंय बघू..अरे देवा, इतके कपडे? आणि गावाकडे असे कपडे चालतील का? विचारच करत नाही आरोही”
आई तिचे जीन्स, टॉप, वन पीस काढून घेते आणि त्या जागी तिचे वापरातले पंजाबी ड्रेसेस ठेऊन देते. दुसऱ्या दिवशी आई आरोहीला सांगायचं विसरते की कपडे मी काढून दुसरे ठेवलेत म्हणून.
टूरवर जायचा दिवस उजाडतो. प्रवासात लागणाऱ्या सर्व वस्तू आरोही घेते, आई बाबांना निरोप देऊन ती ऑफिसमध्ये पोहोचते. बऱ्याच मुली इर्षेने तिच्याकडे बघत असतात, मानवसारख्या देखण्या मुलासोबत टूरला जायला मिळणं म्हणजे दुर्मिळ गोष्ट. केतकी मात्र खुश होती, आपली मैत्रीण तिच्या करियरला वेग देतेय हे पाहून तिला बरं वाटलं.
आरोही बाहेर उभी होती, शेजारी कंपनीची गाडी. मानवाची वाट बघत होती. मानव घाईघाईने पायऱ्या उतरत येत होता, त्याची ती चाल आणि उतरतांना भुरभरणारे केस पाहून आरोही तिथेच खल्लास झाली.
“मिस आरोही, ऑल सेट?”
“येस सर..”
“ओके लेट्स गो..”
दोघेही गाडीत मागच्या सीटवर बसतात.आरोहीची बॅग ड्रायव्हर मागच्या डिकीत ठेवतो.
“सर तुमची बॅग??”
मानव आणि ड्रायव्हर हसायला लागतात.
“काय झालं? मी काही चुकीचं बोलले का?”
“मॅडम, सरांसाठी हॉटेल मध्ये स्पेशल बुकिंग असतं. डिझाइनरने रेडी केलेले कपडेही तिथे तयार असतात, सरांना नेहमी जावं लागतं. त्यामुळे हॉटेलमध्ये VIP ट्रीटमेंट असते..”
आरोहीचं तरीही मन मानत नाही, एकही साधी बॅग नाही? कसं काय? हॉटेल काय सगळंच देणार आहे काय??
आरोहीच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह मानवला समजतं.
“मला माहितीये तुम्हाला काय प्रश्न पडला असेल ते..”
“नाही, काही नाही..”
“हे बघा, आतले कपडेही तिथे मिळतात..अगदी नवे कोरे..टॉवेल, ब्रश पासून सगळं नवीन..”
हे ऐकून आरोहीचं समाधान झालं. मानवला हसू आवरेना, आरोहीलाही स्वतःचं हसू आवरता येत नव्हतं.आणि अश्या प्रकारे दोघांमध्ये मैत्रीची मोकळीक तयार झाली.
_____
आरोहीच्या वडिलांनी हाक दिली तशी आई भानावर आली, खरं तर 15 वर्षापूर्वीच्या या घटनेला आई खूप विसरायचा प्रयत्न करत होती पण काही केल्या ती घटना डोळ्यासमोरून जात नव्हती. आरोहीसोबत आई जुन्या आठवणींना उजाळाही देऊ शकत नव्हती. कारण आरोहीला काहीच आठवेना.
___
मानव आणि त्याची बायको काव्या ऑफिसमध्ये चर्चा करत बसले होते. नवीन ब्रँच अमेरिकेत चालू करण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी कंपनीला त्यांचा पूर्ण ग्राहकवर्ग, त्यांच्या नोंदी आणि काही स्टॅटिस्टिक्स मेल करायचे होते. ऐनवेळी मानवचा लॅपटॉप सुरू झाला नाही आणि तो जरा घाबरला. काव्याने विचारलं,
“काय झालं?”
“अगं पुढच्या 15 मिनिटात मेल करायचा आहे, लॅपटॉप चालू होत नाहीये आणि documents माझ्याच लॅपटॉप वर आहेत..”
मानव लॅपटॉप सुरू करण्याचा खटाटोप करू लागला, काव्याने लगेच तिचा पेन ड्राईव्ह पुढे केला..
“मानव, तुझा लॅपटॉप कधीपासून त्रास देत होता, ऐनवेळी पंचाईत नको म्हणून मी त्याचा बॅकअप घेऊन ठेवलेला..घे, यात आहेत सगळे documents, माझा लॅपी घे अन कर मेल..”
मानवला एकदम आरोही आठवली, असंच तिने पंधरा वर्षांपूर्वी एकदा बॅकप घेऊन मोठा अनर्थ टाळला होता.
“थँक्स तर म्हण..”
“ओह..अगं मी जरा गडबडलो होतो..खरंच थँक्स..”
____
प्रमिला भावाचा संसार मार्गी लावून घरी परतत होती, वाटेत त्यांचं गाव लागत होतं. ड्रायव्हरला सांगून तिने गावाकडे गाडी घ्यायला सांगितली.
“तिकडून कच्चा रस्ता आहे, तिकडून घ्या गाडी..”
“मॅडम पण तिकडून वेळ लागेल, रस्ताही खराब आहे..”
“असुदेत, तीकडूनच घे..”
मॅडम दरवेळी असं का करतात हे ड्रायव्हरला समजेना..त्याला कोण सांगणार? मोठ्या रस्त्यावरच आरोही अन तिच्या मामा मामीचा अपघात झालेला. ते दृश्य विचलित करणारं होतं, आणि पुन्हा तिला त्या आठवणी नको होत्या.
क्रमशः
भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/
Khup chhan.. Utsukata lagun aahe..
Khupch chan aahe next bhag kadhi post karnar mala pudhcha bhag vachaycha aahe..
वेबसाईटवर आला आहे 😊😊😊