सरिताच्या हातून ट्रे पडतो, तिला गरगरल्यासारखं होतं. थरथरत्या हातांनी ती ट्रे आणि ग्लास उचलते आणि चेहरा लपवत आत जायला निघते तोच मानवची बायको तिला थांबवते,
“सरिता असू दे, होतं असं कधी कधी..आवरता येईल, हे बघ आपल्याकडे कोण आलंय मी ओळख करून देते..”
सरिताची नजर वर करायला बिचकत असते, मानवची बायको सांगते..
“हे मिस्टर नकुल आणि त्यांची बायको आरोही. मानवच्या ओळखीतले आहेत..आणि आता खुप छान मैत्री झालीये दोन्ही कुटुंबांमध्ये..”
सरिता थरथरत्या हातांनीच नमस्कार करते. आरोहीकडे बघण्याची सारिताची हिम्मत होत नाही,
“अहो पाण्याचा ट्रे पडलाय फक्त, इतक्या का घाबरताय?”
आरोही म्हणाली तशी सरिता अजूनच घाबरली, पण आरोही तिच्याकडे अशी बघत होती जणू पहिल्यांदाच बघतेय, सारिताला आश्चर्य वाटलं, हिने मला ओळखलं नसावं? सरिताने काहितरी कारण सांगून तिथून पळ काढला अन ती किचनमध्ये गेली. आर्वी तिथेच होती,
“मावशी काय झालं? इतकी घाबरलेली का आहेस?”
“काही नाही गं…ते पाण्याचा ट्रे पडला ना माझ्या हातून..बरं हे पाहुणे म्हणजे…कुठे भेटले तुम्हाला??”
“अगं खूप वाईट घटना घडलीये त्या आंटीच्या बाबतीत, एका अपघातात म्हणे त्यांची सगळी मेमरी गेली, त्यांना आधीचं काहीच आठवत नाही म्हणे.”
सरीताच्या डोळ्यासमोरून तो प्रसंग गेला..अपघात, आरोही, बाळ…
(फ्लॅशबॅक)
आरोही आणि मामीचा शाब्दिक वाद मामा थांबवण्याचा प्रयत्न करत असताना मामाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि समोर येणाऱ्या ट्रक ने जोरात धडक दिली. मामा जागीच गेला, मामी आणि आरोही जखमी झाले, दोघींना दवाखान्यात नेण्यात आलं. आरोहीला बरं व्हायला खुप वेळ लागत होता. त्यावेळी मामीच्या डोक्यात भलतंच शिजू लागलं..मामा सोडून तिला आधार कोण होतं? आता एकमेव बाळाच्या आधारे तिला जगायचं होतं. पण आरोहीने उद्या त्याचावर हक्क दाखवला तर? नाही…मी हे होऊ देणार नाही.. मामीने हॉस्पिटलमध्ये एका नर्सला पैसे देऊन एका अपघातात मृत झालेल्या आणि शरीर छिन्नविच्छिन्न झालेल्या मृतदेहाच्या कागदपत्रांच्या जागी स्वतःचं नाव लिहायला लावलं. कारण ती व्यक्ती रस्त्यावर भीक मागणारी एकटीच होती, तिला कुणीही नातेवाईक व कुटुंब नव्हतं त्यामुळे चौकशी करायला कुणीही येणार नाही हे तिला पक्कं माहीत होतं. मामीने कागदोपत्री स्वतःला मृत घोषित करून तिथून पळ काढला. सर्वात आधी ती वेष बदलून घरी गेली, तिला माहीत होतं की बाळ नक्की प्रमिला कडे असणार. प्रमिला आणि तिच्या भावाचं बोलणं तिने ऐकलं होतं, बाळ अनाथाश्रमात दाखल होणार हे तिला समजलं आणि ती त्याच आश्रमात काम करायला रुजू झाली. सगळं काही नीट सुरू होतं. एके दिवशी मानव आणि त्याची बायको आर्वीला घेऊन गेले, आणि सरिता सुद्धा त्यांच्या मागोमाग गेली. आणि तेव्हापासून ती इथेच स्वयंपाकीन म्हणून काम बघत होती. आर्वीला मुलीसारखी जपत होती, पुत्रसुखाचा आनंद घेत होती.
“मावशी..सरिता मावशी? काय झालं? कसला विचार करतेय??”
“काही नाही, चल वाढायला घेते मी..बसा तुम्ही..”
सरीताची भीती जराशी कमी झालेली. आरोहीला काहीही आठवत नाही हे एका अर्थी तिच्यासाठी चांगलंच झालं होतं. सरिताने सर्वांना ताट मांडली, सर्वांना डायनिंग टेबल वर बसायला सांगितलं. सारिताने वाढायला घेतलं. एकेक पदार्थ वाढून झाला, आर्वीला खीर आवडते म्हणून तिला जरा जास्तच वाढली..खीरीवर छान साजूक तूप सरिता वाढत होती..
“खीरीवर तूप नको मला नाही आवडत..”
आर्वी आणि आरोही सोबतच एका सुरात बोलल्या,
“अय्या आंटी तुलाही नाही आवडत का तूप?”
“नाही ना, पण खीर म्हणजे अगदी जीव की प्राण..”
“सो स्वीट. आपली आवड एकच आहे ना..?”
दोघींना हा योगायोग वाटत होता. पण सरीताच्या डोळ्यात मात्र पाणी तरळलं. कितीही झालं तरी आर्वी आरोहिचीच सावली, तिचाच अंश…कितीही वेगळे झाले असले तरी नाळ तीच राहणार होती. सारिताला एकीकडे पुत्रसुखाचं समाधान होतं तर दुसरीकडे आरोही बद्दल खूप वाईट वाटत होतं. स्वतःचं मूल समोर असून ते दुसऱ्याचं म्हणून अंतर ठेवावं लागतंय. जेवणं झाली, सरिता सगळं आवरू लागली, आर्वी, आरोही आणि मानवची बायको तिघीही बाहेरच्या अंगणात गेले. मानव आणि नकुल शतपावली साठी बाहेर गेलेले. मानवची बायको सारिताला म्हणाली,
“ते नंतर आवरता येईल गं, बस आमच्यासोबत.. आरोही, तुम्हाला माहितीये का ह्या आमच्याकडे आर्वी लहान असतानाच आलेल्या. आमच्या कुटुंबाचा एक भागच बनून गेल्या बघ. आम्हाला आणि आर्वीला आईसारखी माया दिली. खूप प्रेम दिलं. आर्वीचं मला कधीच टेन्शन आलं नाही. तिच्या शाळेपासून जेवणापर्यंत सगळं सरिता मावशींनी पाहिलं, म्हणूनच मला आजवर ऑफिसमध्ये लक्ष देता आलं..”
आरोही शांतपणे सगळं ऐकत होती. सरिता म्हणाली,
“ताई बस की आता कौतुक..”
“अगं तुझं कौतुक करावं तेवढं कमी..”
मानव आणि नकुल फिरून आले, सर्वजण आता गप्पा मारत बाहेर खुर्च्या टाकून बसले. छान गप्पा चालू होत्या, इतक्यात नकुलला खुशी चा फोन आला अन तो बाजूला गेला..आर्वी म्हणाली,
“आई आईस क्रिम आणलंय, ते आणू का?”
“हो आण बाळा.”
आर्वी आत गेली, पण तिला काही सापडेना. फ्रीज मधेच तर ठेवलं होतं? कुठे गेलं? मावशी…आई..अगं सापडत नाहीये..”
“फ्रीज मधेच आहे ना बाळा नीट बघ..”
“नाही सापडत… तुम्ही या इकडे..”
सरिता आणि मानवची बायको आत गेल्या. आता फक्त आरोही आणि मानव एकमेकांसमोर बसलेले. मानवला असं वाटत होतं की आरोहीला ओरडून ओरडून सांगावं, की एकेकाळी एकमेकांना आपण प्रेमाच्या शपथा दिलेल्या, खूप प्रेम केलं होतं एकमेकांवर..तुला मी खरंच आठवत नाहीये का? पण मानवने स्वतःवर खूप नियंत्रण ठेवलं. आरोहीने मानव कडे पाहिलं, काहीवेळ दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले..
“ही मुलगी पण ना, फ्रीजमध्ये अगदी मागे आईस क्रिम ठेऊन दिलं अन समोर असून दिसत नव्हतं हिला…” सरिता आणि मानवची बायको परत येत बोलत होत्या. सर्वांनी मिळून आइस्क्रीम खाल्लं…
“चला, निघुया आता..मानव सर, खूप छान पाहुणचार केलात तुम्ही, पण पुढच्या वेळी तुम्ही आमच्याकडे यायचं बरं का..”
नकुल आणि आरोही निघाले, आर्वीला चुकल्याचुकल्या सारखं वाटत होतं. आरोही परत मागे फिरली आणि सरिता मावशीजवळ जाऊन हळूच म्हणाली..
“तुम्हाला मामी म्हटलं तर चालेल?
क्रमशः
भाग 25 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-25-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/
Khup Chan
Kupach chhan
Pan nehmi pudhe ky hote he wachnysathi vegli link open karave lagte
Mi kadh purn story vachel ase zale aahe please lavkar send kra na👍