कुसळ आणि मुसळ

दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ नाही..”आपण काय छळ सोसला आहे, हे सांगून तरी कोणाला खरं वाटेल काय?” कुसुमताई त्यांच्या मैत्रिणीला मृणालताईंना फोनवर सांगत होत्या.”सासुरवास गं अगदी सासुरवास.. आता जर तसं वागलं ना तर आपली रवानगी होईल थेट वृद्धाश्रमात..” मृणालताईंनी पुस्ती जोडली.”तुला सांगते.. माझ्या सासूबाई एवढ्या खाष्ट होत्या ना.. नवीन लग्न होऊन आलेली मी.. सोळा सतरा वर्षांचे वय असेल. सत्यनारायणाची पूजा झाली आणि मला लगेच स्वयंपाकघरात पुरणपोळी करायला सांगितली. ते ही पुरण वगैरे शिजवून. आता मला सांग, लग्नाच्या आधी पुरण वगैरे कधीतरी आपण केलं तरी होतं का? शाळा त्यानंतर शिवणक्लास उरलेल्या वेळात घरकाम. सणासुदीला आईच करायची पुरणपोळी. तर माझ्या हातून पुरण नीट शिजलं नाही. कणीक थोडी घट्ट भिजवली गेली. दोन पोळ्या लाटताना अगदी ब्रम्हांड आठवलं. तर सासूबाईंनी पूजेसाठी आलेल्या माझ्या दादावहिनीला एवढं सुनावले की काय सांगू..” कुसुमताईंनी बोलता बोलता डोळ्याला पदर लावला. “आणि आपल्या सुना? काय बिशाद आपली.. आपण बोलू आणि त्या ऐकतील.”कुसुमताईंचे हे बोलणे बाजारातून भाजी घेऊन आलेल्या त्यांच्या सुनेच्या, मीराच्या कानावर पडले आणि ती ऐकतच राहिली. ‘या आपल्याला कधी बोलल्या नाहीत?’ विचारातच ती भाजी ठेवायला स्वयंपाकघरात गेली. बाहेर सासूबाईंचा फोन चालू होताच. त्यांनी मीराला बघून न बघितल्यासारखं केलं. मीरा तिच्या खोलीत जाऊन बसली. सासूबाईंचे एकेक शब्द कानावर पडत होते.. आणि मीराला स्वतःचे दिवस आठवले. नुकतेच लग्न होऊन सासरी आलेली ती. शिक्षण पूर्ण होताच नोकरीला लागलेली. त्यामुळे स्वयंपाक वगैरे कधी केलाच नाही. केला तर अगदीच अडीअडचणीला तो ही आईच्या देखरेखीखाली. लग्न झाले आणि काही दिवसांतच कुसुमताईंची आई आजारी पडली. साहजिकच त्यांच्या तिथे फेऱ्या सुरू झाल्या. मीराने लग्नानंतर महिनाभर सुट्टी घेतली होती. त्यामुळे स्वयंपाकाची जबाबदारी अनायसेच तिच्यावर आली होती. तिने त्यातल्या त्यात सोपी म्हणून बटाट्याची भाजी केली. ती छान कोथिंबीर, खोबरं घालून सजवली. सगळे येताच तिने जेवायला वाढले. जेवणाचा पहिला घास तोंडात घेताच कुसुमताईंचे तोंड वाकडे झाले.
“अगं किती हा पाला घातला आहेस जेवणात? भाजी कमी आणि इतरच जास्त दिसतं आहे.””चवीला चांगली झाली आहे पण.” सुधाकररावांनी मध्ये बोलायचा प्रयत्न केला.
“तुम्हाला भाजी छान लागणारच..” चिडून कुसुमताई म्हणाल्या. त्यांच्या बोलण्याने मीराच्या डोळ्यात पाणी आले.”आई, काही झाले आहे का?” सानवी, मीराची सून विचारत होती. मीराने समोर बघितले. एवढ्यातल्या एवढ्यात तिचे मन भूतकाळात फेरफटका मारुन आले होते. जुन्या आठवणीने खरंच तिच्या डोळ्यातून अश्रू घरंगळला होता. तिच्या ऐंशी वर्षांच्या सासूबाई अजूनही फोनवर बोलत होत्या. नुकतीच कामावरून आलेली सानवी बहुतेक तिला शोधत आली होती.”काही नाही गं असंच.. डोळ्यात कचरा गेला बहुतेक.. तू फ्रेश होऊन ये.मी चहा ठेवते.””नाही.. तुम्ही बसा.. आज तुमचा व्हीआरएस नंतरचा पहिला दिवस आहे. कसा गेला ते सांगा.” सानवी उत्साहाने विचारत होती.
“छान गेला. आज किती तरी दिवसांनी मनसोक्त अंघोळ केली. ना ऑफिसला वेळेत पोहोचायचे टेन्शन ना ट्रेनची दगदग. त्यानंतर दुपारी भरपूर पुस्तकं वाचली. आता चालून आले. येताना मस्त भाजी घेऊन आले. तू बस.. मी चहा ठेवते आणि भाजी निवडायला घेते. कोणती भाजी करू ते मात्र सांग हं..” मीरा डोळ्यातलं पाणी लपवत उठली.”भाजी आजींच्या आवडीचीच करू.. म्हणजे परत चिडचिड नको.” हसू आवरत सानवी म्हणाली. तिचे हसू बघून मीराच्याही चेहर्‍यावर हसू उमटले. त्या दोघी हसताना ऐकून कुसुमताई मीराच्या खोलीत आल्या.”काय गं.. काय चालू आहे??” त्यांनी नेहमीच्या आवाजात विचारले.
“आजी, मी ना आईंना एक जोक ऐकवला. तुम्हाला ऐकवू?” सानवीने विचारले.”नको गं बाई.. तुमच्या त्या जोकने माझे पोट भरणार नाही. चहा ठेव जरा लवकर. आतापर्यंत रोज दोन चहा झालेले असतात माझे. मगाशी फक्त एकच झाला आहे. आणि काहीतरी खायला सुद्धा कर.. भूक लागली आहे. सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. आणि तुला ना सासूबद्दल काही आदरच नाही. जोक कसली सांगतेस सासूला? आम्ही नव्हतो बरं का सासूबाई समोर शब्दही काढत..” सानवीला सुनावून कुसुमताई तिथून गेल्या.”ना स्वतः कधी चांगल्या सासूबाई झाल्या ना मला होऊ देत आहेत..” स्वतःशीच पुटपुटत मीरा म्हणाली.कुसुमताई आणतील मीराच्या आणि सानवीच्या नात्यात अडचण की त्या स्वतःच सुधारतील.. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.©️®️ सारिका कंदलगांवकर

दादर मुंबई

अंतिम भाग

भाग 2

“आज काय विशेष तुमच्याकडे?” कुसुमताई आज नवीन मैत्रिणीशी, विमलताईंशी बोलत होत्या.
“काही नाही गं.. सूनबाई गेल्या आहेत पार्लरमध्ये. मी आवरते आहे पसारा..” पलीकडून विमलताई उत्तरल्या.
“बाई गं.. या वयातही आहेच का हे पार्लर वगैरे?” कुसुमताईंनी आश्चर्याने विचारले.”काही विचारू नकोस. अगं पन्नाशी उलटली तरी केस काय काळे करतील, फेशियल काय, वॅक्स काय.. आयब्रो वगैरे तर असतंच. सासू आहेच इथे आवरायला.” विमलताई वैतागून बोलत होत्या.”काय गं म्हणावं या सुनांना? तुला ही नातजावई आलाच की.. जावई आल्यानंतरही यांना आपल्या वयाची जाणीव होत नाही. बाई बाई.. आणि सासवांचं काही आहे का यांना? तुला सांगते माझं लग्न झालं ना तेव्हा आपण नाही का काजळ आणि ती खाकी पावडर वापरायचो.. हो तीच.. आमच्याकडे परवानगी नव्हती. पण मला बाई आवड होती. येऊन जाऊन वापरायचो काय तर काजळ, पावडर आणि लिपस्टिक. ते ही चोरून बाहेर जातानाच बरं का.. त्याचाही माझ्या नणंदबाईंना कसा कोण जाणे सुगावा लागला. त्यांनी केली लगेच चुगली आईला. केवढे बोलले मामंजी मला.. म्हणे मड्डम व्हायचं असेल तर घरात रहायचं नाही. किती वेळा माफी मागितली असेल काय सांगू..””पण मग त्यानंतर कधी वापरलंच नाहीस का?””हट्. मी वापरायचे बाई.. पण माहेरी. एकच तर आयुष्य मेलं. त्यात एवढीही हौसमौज करायची नाही की काय? आणि आपण काय या आजकालच्या मुलींसारखं वागतो?” बोलता बोलता कुसुमताईंचा आवाज कमी झाला. “आमच्या नवीन सूनबाईंचेच बघितले त्यादिवशी.. किती ते नेलपॉलिश.. आणि किती ते मस्करे आणि काय काय.. तशी पोरगी बरी आहे. माझ्या बोटांना पण लावून दिले. मी म्हटलं दे बाई करून.. नाहीतर मी कुठे हे करणार आहे?” चहा द्यायला आलेली मीरा आजसुद्धा सासूबाईंच्या गप्पा ऐकतच बसली. खरंतर सगळे कामाला गेल्यावर यांचा दिवस कसा जात असेल याचे तिला फार कुतूहल होतं. पण दोनच दिवसांत त्यांच्या सगळ्या गोष्टींचे रहस्य तिला समजले आणि त्याहूनही आश्चर्य वाटले.”चहा घेताय ना?” मीराने विचारले.”कशी पिणार? चेहर्‍यावर हे लावलं आहे ना?” कुसुमताई फेसमास्ककडे हात करत म्हणाल्या.”तू वापरतेस फेसमास्क?” समोरून विमलताईंनी आश्चर्याने विचारले. ते ऐकल्यावर आपण काय बोलून गेलो हे कुसुमताईंना समजले.
“ते आपलं घरगुती गं.. आपण कुठे यांच्यासारखे सतत पार्लरला जातो पैसे उधळायला. परवा बहिण आली होती. ती म्हणे चेहरा फारच काळवंडला आहे. मग केला मास्क आणि लावला तोंडाला.” कुसुमताई बाजू सावरत म्हणाल्या. स्वतःशीच कडवट हसत मीरा वळली. तिच्या आतेभावाचे लग्न होते म्हणून तिला लग्नाला जायचे होते. कामाचा एवढा लोड होता की पार्लरला जाऊन काहीच करणं शक्य नव्हतं. कशीबशी आयब्रो करायला म्हणून मुलांना सासूबाईंकडे ठेवून ती जाणार तोच सासूबाईंनी सुनावले होते..”तुम्ही कामाला जाता म्हणून तुमची मुले आम्ही सांभाळतो.. पण आता पार्लरला वगैरे जाताना पण आम्ही हेच करायचे का?” सासूबाईंचे बोल ऐकून दोन्ही मुलांना हाताशी धरून ती पार्लरमध्ये गेली होती. काम दहा मिनिटांचेच होते.. पण तेव्हाही त्यांनी अडून दाखवले. खरंतर ती पार्लरला नेहमी जाणाऱ्यातली नव्हतीच. पण जेव्हा केव्हा जायची तेव्हा घरात वाद ठरलेलेच असायचे.”काय सांगू बाई, आपण काय काय भोगलं आहे ते? आठवलं तरी अंगावर काटा येतो आणि राग राग होतो. एकत्र कुटुंब होतं ना आमचं..” फोन ठेवायच्या आधी कुसुमताई म्हणाल्या. मीरा स्वयंपाकघरात कुसुमताईंच्या बोलण्याचा विचार करत होती.. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला त्या हेच सांगायच्या, एकत्र परिवार होता म्हणून. पण सुधाकरराव एकदा बोलून गेले होते की लग्नानंतर एकदोन वर्षातच त्यांची मुंबईत बदली झाली होती. त्यामुळे कुसुमताई ज्या सासुरवासाचे वर्णन करायच्या तो जास्तीत जास्त दोन वर्ष.. पण आपलं काय? आज लग्नाला तीस वर्ष झाली तरी येताजाता त्यांचे टोमणे ऐकावे लागतात. काही केलं तरी ते कसं चुकलं आहे हे ऐकावं लागतं. यांना जर स्वतःच्या दोन वर्षांच्या सासुरवासाचा इतका त्रास होतो आहे मग माझ्या तीस वर्षांच्या त्रासाचे काय??
कशी बाहेर पडेल मीरा या सगळ्यातून, बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.©️®️ सारिका कंदलगांवकरदादर मुंबई

भाग 3 अंतिम

दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.. अंतिम भाग”आई, तुमचं काही बिनसलं आहे का?” स्वयंपाकघरात शून्यात बघत बसलेल्या सानवीने मीराला विचारले.
“नाही गं.. माझं काय बिनसणार? ते ऑफिसची सवय झाली होती ना इतके दिवस.. मग आता अचानक सुनं सुनं वाटू लागलं आहे.” मीरा म्हणाली.”आई, तुम्ही मला आपलं मानता का?””हा काही प्रश्न आहे का? अर्थातच.. जशी जुई तशीच तू.””मग काय झालं आहे ते खरंखरं सांगा. खरंतर गरज नसताना आजींसाठी म्हणून तुम्ही व्हीआरएस घेतलीत. पण गेले दोन दिवस मी बघते आहे.. तुमचा चेहरा उतरलेलाच असतो. मला सांगण्यासारखं नाही का काही?” सानवीने विचारले.”आजी कुठे आहेत?””त्या खाली नानानानी पार्कात गेल्या आहेत. त्या काही बोलल्या का?””त्या बोलल्या नाहीत.. पण..” सानवीशी हे बोलावं की नाही हा प्रश्न मीराला पडला.
“पण काय?? तुम्हाला मला सांगणं एवढं अवघड वाटतंय का?”
“नाही गं.. खरंतर सासूबाईंचा एक नवीन स्वभाव समोर आला आहे. इतके वर्ष दिवसभर कामाला जायचे म्हणून समजायचे नाही.””काय नाही समजायचे?””हेच बघ ना.. लग्न झाल्या दिवसापासून त्या सतत मला बोलत आल्या. मला ना एक सण आठवत नाही की जेव्हा त्यांनी मला रडवलं नसेल. पण मग इतर मैत्रिणींची अवस्था बघायचे.. त्यांचे दारू पिणारे नवरे, हुंडा मागणारं सासर दिसायचं. असं वाटायचं एवढीशी गोष्ट सोडली तर आपल्या संसारात काय कमी आहे? आईही तेच सांगायची. मग मन मारत संसार केला. पण गेले दोन दिवस सासूबाईंच्या मैत्रिणीशी गप्पा कानावर येत आहेत. आम्हाला सासरी इतकं छळलं, तितकं छळलं.. मग माझ्या छळाचं काय गं? त्यांनी मला दिलेला त्रास तर त्यांच्या बोलण्यातही येत नाही. म्हणजे आपल्याला होतो तो त्रास आणि दुसर्‍याला आपण देतो तो?” मीरा बोलत होती.”तुम्ही आधी बसा.. हे पाणी प्या..” सानवीने मीराला तिकडच्या खुर्चीवर बसवले.”मला एक सांगा.. तुम्हाला नक्की खटकलं तरी काय?””हेच गं.. आपण दुसर्‍याला छळछळ छळायचे आणि वर आपणच रडायचे माझा छळ झाला म्हणून..” मीरा बोलत होती.”आई, तुम्हाला ती म्हण माहिती आहे का?””आता इथे म्हणीचं काय गं?””ते म्हणतात ना.. दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. आजींचं अगदी तसंच होतं आहे. बहुतेक त्यांचं वय झालं आहे. त्यामुळेच त्या स्वतःचं चुकीचं वागणं आठवून स्वतःला अपराधीपणाची भावना येऊ देत नाहीत.””अगं पण इतकं खोटं वागून? आजचंच बघ ना.. आपण पार्लरमध्ये जातो म्हणून आरडाओरड करणाऱ्या या.. स्वतः मात्र फेसमास्क लावून बसल्या होत्या. आणि आत्ता आत्तापर्यंत त्याही फेशियल वगैरे सगळं करायच्या. नंतर ती वाफ सहन होई ना म्हणून त्यांनी फेशियल बंद केले. पण मग इतरांना का नावं ठेवायची?”
“आई, तेच तर सांगते आहे.. आपण मारणाऱ्याचा हात धरू शकतो. बोलणाऱ्याचे तोंड नाही. मी ना तुम्हाला एक युक्ती सांगते.. तुम्ही ना हे हेडसेट घ्या. आणि आजी कोणाशी फोनवर बोलायला लागल्या की गाणी ऐकत बसा.” सानवीने सुचवले.
“तुला मस्करी वाटते आहे का?” मीराने डोळ्यात पाणी आणत विचारले.”अजिबात नाही.. उलट मी आमच्या मानसशास्त्रात वापरत असलेले उपाय सांगते आहे. जी गोष्ट आपण बदलू शकत नाही त्याचा त्रास किती आणि का करून घ्यायचा? तुम्हाला आजींचा स्वभाव माहिती आहे. तुम्ही तो ना बदलू शकणार ना त्यावर काही बोलू शकणार मग का मनाला लावून घ्यायचे? त्यापेक्षा ती बोलणी कानावर न येता तुमचे मन आनंदी कसे राहिल याचा विचार करा..” सानवी मीराला समजावत म्हणाली.”प्रयत्न करते..” मीरा सुस्कारा सोडत म्हणाली.”करायलाच पाहिजे.. नाहीतर आजीच रडायला लागली तर बाळाने काय करायचे?””म्हणजे?””हिच बातमी तुम्हाला सांगण्यासाठी मी गेले दोन दिवस लवकर येते आहे. पण तुमचा उतरलेला चेहरा बघून परत पाठी फिरते आहे. आता तरी चेहरा नाही उतरणार ना? नाहीतर बाळही चौकोनी चेहरा घेऊन जन्माला येईल..””अजिबात असं बोलू नकोस.. आता ना हे कुसळही नको आणि मुसळही.. मनातलं सगळं किल्मिष सोडून मी हे घर कसं आनंदी राहिल तेच बघते..” उत्साहाने मीरा म्हणाली.. आणि त्या उत्साहाने भरलेल्या मीराकडे सानवी आनंदाने बघत राहिली.सासुरवास.. प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपला झाला तो छळ आणि आपण वागतो तेच योग्य.. मग यातून आपल्या सुनेवर होत असलेला अन्याय दिसून येत नाही. त्यातून नवीन सासू मीरासारखी असेल आणि सून सानवी सारखी तर हे लोण पुढच्या पिढीपर्यंत जात नाहीत. नाहीतर मग आहेच पहिले पाढे पंचावन्न.कथा कशी वाटली ते नक्की सांगा.©️®️ सारिका कंदलगांवकरदादर मुंबई

8 thoughts on “कुसळ आणि मुसळ”

 1. Hey there! Do you know if they make any plugins to assist with Search Engine
  Optimization? I’m trying to get my blog to rank for some targeted
  keywords but I’m not seeing very good success. If you know of any please share.
  Thank you! You can read similar blog here: Sklep internetowy

  Reply
 2. Hey! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m trying to get
  my site to rank for some targeted keywords but I’m not seeing very good gains.
  If you know of any please share. Thanks! You can read similar article here: Auto Approve List

  Reply

Leave a Comment