कानामागून आली

‘आपण कितीही काम करा पण कोणालाच त्याचे काहीही पडलेले नसते. दहा वर्ष झाली मला या घरात येवून पण अजूनही सासू सासऱ्यांचा मान कधी मोडला नाही. पण ही महाराणी…मानपान, आदर हे असे शब्दच जणू तिच्या डिक्शनरीत नाही वाटतं. सकाळचे आठ वाजत आलेत पण अजून बेडरूमचे दार बंदच. सासूबाईंना देखील तिला काही बोलता येत नाही का? मी बोलावं असं त्यांना वाटतं, पण बोलून मीच का वाईट व्हायचं? खरं तर हे त्यांचं काम आहे ना.’आज अश्विनीचा खूपच संताप होत होता. एकसारखे तिचे विचारचक्र सुरु होते.
“आशू चहा झाला असेल तर दे गं, मला उशीर होतोय.” हातातील घड्याळाचा बेल्ट सेट करत अमित किचनमध्ये येत बोलला.
अश्विनी विचारांत इतकी गुंतली होती की, अमितच्या बोलण्याकडे तिचे लक्षच नव्हते.”अगं अश्विनी… चहा दे की त्याला.” रंजना ताईंनी देखील आवाज दिला पण अश्विनी मात्र तिच्याच तंद्रीत होती. अश्विनीला काय झाले असेल, याचा सासूबाईंना पुरेपूर अंदाज होता. अश्विनीने लक्ष नाही हे पाहून सासूबाई स्वतःच लेकाला चहा देण्यासाठी पुढे सरसावल्या.”आई काही हवंय का तुम्हाला?” तितक्यात अश्विनी विचारांतून बाहेर आली आणि सासूबाईंकडे तिचे लक्ष गेले.”अगं अमितला चहा हवाय. तुझं काम सुरू होतं म्हणून मग मीच द्यावं म्हटलं.”अहो आई मी देते तुम्हा दोघांनाही चहा, तुम्ही बसा. भाजीला फोडणी देवून झालीच आहे. होतंच आलंय माझं आता. देते मी लगेच.” अश्विनी म्हणाली.
गेल्या दहा वर्षात अश्विनीच्या याच समजूतदार स्वभावाने तर तिने सर्वांचे मन जिंकले होते. सासू सासरे, नवरा, दिर, दोन मुले या साऱ्यांचे अगदी मनापासून ती सर्वकाही करायची. कितीही त्रास झाला तरी तिने कधीच बोलून दाखवले नाही. उच्चशिक्षित असूनही मोठ्या आनंदाने ती घर सांभाळत होती.’आपण जर नोकरी केली तर मुलांकडे, आई बाबांकडे, घराकडे कोण लक्ष देणार?’ हा एकच विचार करून ती पुढ्यात जे होते त्यात आनंद मानत होती.कधीकधी तिलाही वाटायचे की आपणही नोकरी करावी, स्वतःच्या पायावर उभे राहावे, दोन पैसे कमवावेत; पण अमित या गोष्टीसाठी तयार नव्हता. कारण अश्विनी जर घराबाहेर पडली तर संसाराची बसलेली घडी विस्कळीत होणार याची त्याला खात्री होती.”तुला नोकरीची गरजच काय? आणि नोकरी करायचे म्हटले तरी कुठे एवढ्या पगाराची नोकरी तुला मिळणार आहे. पाच दहा हजारासाठी कशासाठी एव्हढा जीवाचा आटापिटा करायचा? त्यात मुले मोठी होत आहेत… त्यांची शाळा, अभ्यास याकडे कोण लक्ष देणार? अधूनमधून आई बाबांची आजारपणं देखील सुरुच असतात. तू घरात नसलीस तर हे सगळं कोण पाहणार? सगळं करून नोकरी करायची म्हटले तर तुझी खूप दगदग होईल. त्यामुळे तब्बेतीची देखील हेळसांड होईल. मग कशाला उगीच जीवाचा आटापिटा करतेस?”
अमितचे हे विचार अश्विनीला देखील पटायचे. कारण खरंचच ‘आपण घराबाहेर पडलो तर सगळेच अवघड होऊन जाणार. मुलांना देखील मी वेळ देऊ शकणार नाही. धावपळ होणार ती वेगळीच. त्यांचा अभ्यास, त्यांचं खाणंपिणं हे सगळं आईंना नाही जमणार. जाऊ दे… त्यापेक्षा जे आहे ते खूप छान आहे. कामाचा थोडा त्रास झाला म्हणून काय झालं? देवाने इतकी सुंदर फॅमिली दिली आहे. इतर बायकांसारखा मला सासूचा सासुरवास तरी सहन करावा लागत नाही. कुठलेही बंधन नाही की दबाव नाही. मग त्यांच्या समाधानाचा देखील मीच विचार करायला हवा.’असे म्हणून अश्विनी गेले दहा वर्षे झाली आनंदाने सारं काही सांभाळत होती.याआधी सर्व काही अगदी छान सुरू होते. सासू सुनेचे छान गुळपीठ जमायचे. कधीकधी तर रंजनाताई अमितविरुध्द अश्विनीच्या बाजूने उभ्या राहायच्या. त्याची चूक असेल तर त्यालाच डाफरायच्या. त्यामुळे अश्विनीला सासूचा खूपच आधार वाटायचा. सासू सुनेचे हे प्रेम पाहून शेजार पाजारच्या इतर सुनांना मात्र दोघींचाही हेवा वाटायचा. अश्विनी तर स्वतःला खूपच भाग्यवान समजत होती.’असे सासर आणि सासरची माणसे मिळायला खरंच भाग्य लागतं.’ असे ती वारंवार बोलून देखील दाखवायची. पण जणू काही तिचीच दृष्ट लागली तिच्या या सुखी संसाराला.सहा महिन्यांपूर्वी अमितच्या लहान भावाचे म्हणजेच अश्विनीच्या दिराचे…आलोकचे लग्न झाले आणि अश्विनीचा आनंदच जणू मावळला. याचे कारणही तसेच होते. आलोकच्या बायकोचे म्हणजेच अमृताचे वागणे घरातील कोणालाच पटत नव्हते.  विशेष म्हणजे आलोकला देखील त्याच्या बायकोच्या चुका दिसत नव्हत्या.सकाळी उन्हं डोक्यावर आली तरी लोळत पडणे, घरात सासू आणि मोठी जाऊ लवकर उठून जवळपास सगळीच कामे आवरतात पण अमृताला मात्र त्याचे काहीच वाटायचे नाही.तसे पाहिले तर आलोकचे लग्न खूपच उशिरा झाले. कारण शिक्षण घेवूनही हातात दोन रुपयाची नोकरी नाही. हा त्याच्या लग्नात मुख्य अडसर बनला होता. परंतु लग्नाचे योग बळकट होते म्हणूनच की काय जणू त्याचे वय उलटून गेल्यावर देखील अमृता त्याच्या आयुष्यात आली. अमृता म्हणजे आलोकची नवसाची बायको होती असे म्हणायला काहीही हरकत नाही. क्रमशः©® कविता वायकर

आलोकची बायको अमृता माहेरी थोडी जास्तच लाडाकोडात वाढलेली होती. तिला जगाचे काहीही घेणेदेणे नसायचे. कोणी आपल्याला वाईट म्हणेल, आपले काहीतरी चुकत आहे या अशा विचारांचा आणि तिचा दूरदूरपर्यंत जणू संबंधच नव्हता. पण तिच्या या बेजबाबदार वागण्याचा त्रास मात्र अश्विनीलाच व्हायचा.”काय गं अश्विनी, अमृता उठली नाही अजून?” सासूबाईंनी मुद्दाम अश्विनीजवळ अमृताचा विषय काढला.
“आता काय सांगायचे आई, नव्याचे नऊ दिवस संपले तरीही हे असेच सुरू आहे. तिचे तिला नको का समजायला. आता माहेरी नाही सासरी आहोत आपण तेही समजत नाही का तिला?”
“अगं मग तू का काहीच बोलत नाहीस तिला. तू एकटीच कशाला मर मर करतेस? तिलाही तिच्या जबाबदारीची जाणीव करून दे ना मग.””अहो आई…मी काय बोलणार? तुम्ही बोलायला हवं याबाबत तिच्याशी. माझ्यापेक्षा तुम्ही बोललं तर फरक पडेल.””काय करावं बाई. एक तू आहेस, सगळं काही कसं अगदी परफेक्ट करतेस. तुला शिकवण्याची मला कधी गरजच पडली नाही. आणि एक ही… हिला शिकवण्याची काही सोयच नाही.” सासूबाई चरफडतच बोलल्या.”आई आता सहा महिने झाले तिला घरात येऊन. आज ना उद्या तिला तिची चूक समजेल याची आपण वाट पाहत बसलो. पण आता पाणी डोक्यावरून जायला लागले आहे. त्यात आलोक भाऊजी देखील तिला काहीच बोलत नाहीत याचेच खरं तर मला विशेष वाटते. कधी कधी वाटते की ती मुद्दामच असे वागत असावी. काही खरे नाही बघा.”तेवढ्यात आलोक किचनमध्ये आला.”वहिनी ग्लासभर पाणी कोमट करून दे ना.””का ओ भाऊजी घसा दुखत आहे का तुमचा?””नाही गं! माझा नाही अमृताचा घसा दुखत आहे!”आता यावर काय बोलावे ते ह्या दोघी सासू सुनेला मात्र समजेना. अश्विनीने मोठ्या मुश्किलीने स्वतःवर कंट्रोल ठेवला. पुढे काहीही न बोलता तिने कोमट पाण्याचा ग्लास आलोकच्या हातात दिला. कारण एकच सकाळी सकाळी घरात उगीच वाद नकोत.अश्विनीला वाटलं होतं, ‘आईंनी सुनेला नाही पण निदान लेकाला तरी समज द्यावी. हिताच्या चार गोष्टी सांगाव्यात. काही काम धंदा नाही तर निदान घरच्या शेती व्यवसायात तरी लक्ष घाल.’ असे दरडावून सांगावे. पण खरं तर सासूच्या या स्वभावाचे अश्विनीला नवलच वाटायचे.
अमितसोबत याविषयी बोलावं म्हटलं तर तोही पुन्हा अश्विनीलाच सांगणार,’धाकट्या जावेला समजून घे’ म्हणून. आलोक आणि अमृताच्या ह्या अशा बेजबाबदार वागण्याचा त्रास मात्र अश्विनीलाच व्हायचा. रंजना ताईदेखील, ‘तू तिला समज दे’ म्हणून अश्विनीलाच सांगायच्या पण स्वतः मात्र शब्दाने कधी धाकट्या सुनेला बोलायच्या नाहीत.सुनेला बोलून लेकाच्या नजरेत वाईट व्हायचे नाही. बहुतेक हेच कारण असावे त्यांच्या गप्प बसण्यामागे.अमृता स्वतःचे आवरुन किचनमध्ये येईपर्यंत अश्विनीची जवळपास सर्वच कामे उरकली होती. गेल्या सहा महिन्यांपासून हेच रूटीन फिक्स केले होते अमृताने.’नवीन आहे जाऊ दे…सुधारेल आज ना उद्या.’ असे म्हणत सहा महिने गेले; पण अमृताचा ‘आज’कधी उगवलाच नाही आणि ‘उद्या’ उगवेल ही आशाच आता अश्विनीने सोडून दिली होती.सकाळचे आठ वाजले होते, अश्विनीची दोन्ही मुले शाळेत देखील गेली. अमित देखील आवरुन निघणारच होता तेवढ्यात अमृता किचनमध्ये आली. अमृता आली नि अमित डबा घेऊन बाहेर पडला. कारण त्यालाही आजकाल अमृताचे हे वागणे खटकत होते; पण तरीही तो वाद नको म्हणून शांतच होता.  जास्त करून त्याला आलोकचा राग येत होता. त्याला हे सर्व कसे काय खटकत नाही याचेच अमितबरोबरच घरातील सर्वांनाच नवल वाटत होते.”ताई चहात आले टाकले आहे ना ओ?” अमृता अश्विनीला म्हणाली.”हो टाकले आहे ना… का गं?””काही नाही, माझा घसा दुखतोय ना म्हणून विचारलं. आल्याचा चहा घ्यावा म्हटलं. तेवढाच घशाला आराम. तेवढी पक्कड देता का ताई?”ताई ताई आणि आई आई करत अमृता बरोबर तिचे काम करून घेत होती.
हातातील काम बाजूला ठेवून अश्विनीने अमृताला पक्कड दिली.खरं तर अश्विनीच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. पण तिचे बोलण्याचे धाडस काही झाले नाही. खरचंच ‘कानामागून आली अन् तिखट झाली ‘ ही म्हण अगदी परफेक्ट सूट होत होती अमृताला.सासूबाईंकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत अश्विनी बाहेर निघून गेली. अमृता मात्र चहा घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेली. खरं तर सासूबाईंना देखील खूपच राग आला होता पण त्यादेखील काहीच बोलत नव्हत्या. तसे पाहिले तर त्यांचा हक्कच होता सुनेला समज देण्याचा. पण तरीही त्या बोलत नव्हत्या. त्यामुळे अश्विनीची चिडचिड जरा जास्तच वाढत चालली होती. सासूबद्दल तिच्या मनात नकळतपणे नकारात्मक भावना निर्माण होऊ लागली होती.’आपण अमृताला काही बोललो तर आलोकला नाही सहन होणार. तो बायकोची बाजू घेऊन मलाच चार शब्द सुनावणार आणि जे मला नाही सहन होणार. त्यापेक्षा जाऊ दे, आपण शांत बसलेलंच बरं.’ असा विचार करून रंजना ताई धाकट्या सुनेच्या चुकांकडे दुर्लक्ष करत राहिल्या.आलोक आणि अमृता सोडून घरातील सगळेच सकाळी लवकर उठत. पाच साडे पाच झाले की सासूबाईंची खुडबुड सुरु व्हायची. मुलांची शाळा लवकर असते त्यामुळे सासूच्या पाठोपाठ अश्विनीदेखील उठायची. सकाळचे दोन तास मग सगळे आवरण्यातच जायचा. तसेही सासू उठल्यानंतर सुनेने लोळत पडणे हे अश्विनीच्या मनाला पटत नसे. त्यामुळे आधीपासूनच तिला लवकर उठायची सवय होती. ही सवय जणू आता तिच्या अंगवळणीच पडली होती.क्रमशः

एक दिवस अमृताने तिची पुढे शिकण्याची इच्छा सासूबाईंना आणि अश्विनीला बोलून दाखवली.”आई मला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे. दादाने ॲडमिशनची पूर्ण चौकशी केली आहे.” मागचा पुढचा कोणताही विचार न करता अमृता तिचा निर्णय सांगून मोकळी झाली.रोज होणारी अश्विनीची धावपळ तिला दिसत असूनही तिने लहान जाऊ या नात्याने अश्विनीचा कामाचा भार हलका करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही की अश्विनीनेदेखील मोठी जाऊ म्हणून अमृतावर कधीही कोणतीही हुकुमशाही गाजवली नाही. उलट लहान बहिणीप्रमाणे ती अमृताला सांभाळून घेत होती. परंतु अश्विनीच्या चांगुलपणाचा नेहमीच अमृताने फायदा घेतला.अमृताचा पुढे शिकण्याचा निर्णय म्हणजे अश्विनीसाठी तर खूप शॉकींग बातमी होती. सासूला देखील अमृताच्या हा निर्णय पटला नव्हता. तसाही घरकामात तिला कधी रस नव्हताच आणि शिक्षणातही तो कधीच दिसला नाही.चुकून मुले कधी म्हणालीच की, ‘काकी आमचा अभ्यास घेतेस का?’ यावर अमृताचे एकच उत्तर पाठ असायचे,’ये बाबांनो तो अभ्यास सोडून बाकी सगळे सांगा. हवं तर पाहिजे तो खेळ खेळेल मी तुमच्यासोबत पण अभ्यासाचे आणि माझे थोडे वाकडे आहे.’
मग असे असताना आता अमृताने पुढे शिकण्याचा घेतलेला निर्णय त्यात कितपत तथ्य आहे? हे अश्विनीला कळेना.’अमृताने फक्त पळवाट म्हणून तर हा शिक्षणाचा निर्णय घेतला नाही ना?’ असे एक ना अनेक प्रश्न अश्विनीला सतावत होते.विचार करून करून अश्विनीचे डोके सुन्न झाले होते.’आपला समंजस आणि तडजोड करण्याचा तसेच स्वतःपेक्षाही जास्त जगाचा विचार करण्याचा स्वभावच आपल्याला प्रत्येक वेळी नडतो. त्यात आलोक भाऊजी जशी अमृताला साथ देतात, तिची चूक असली तरी तिला नेहमी पाठीशी घालतात आणि हेच कारण आहे तिच्या बिनधास्त आणि अविचाराने वागण्याचे.’अश्विनीचे मन तिलाच खात होते.’एवढे शिकून आपण काय केले? आज आपल्यापेक्षा कमी शिकलेली आपली जाऊ लग्नाआधी साधं ग्रॅज्युएशन पण पूर्ण करु शकली नाही आणि आता हिला अचानक पुढे शिकण्याची उपरती कुठून झाली?’अश्विनीच्या मनात एक ना अनेक प्रश्न डोके वर काढू लागले. मनातून तिला खूपच त्रास होत होता. कारण घर संसार जबाबदाऱ्या यांतून ती ठरवूनदेखील आता बाहेर पडू शकत नव्हती.
‘लहान जाऊ आल्यावर तरी थोडी फार का होईना पण घरकामातून आणि या सांसारिक जबाबदार्यांतून सुटका होईल, थोडाफार का होईना पण कामाचा भार हलका होईल, हळूहळू आता घराबाहेर पडता येईल, जमले तर घरातील शक्य तेवढी कामे आवरुन छोटी मोठी नोकरी देखील करता येऊ शकते, घरात माझ्या बदली जर कोणी असेल तरच हे शक्य होईल आणि ते काम आलोक भाऊजींची बायकोच करू शकते.’ असे अश्विनीला आधी वाटले होते. पण तो तिचा निव्वळ भ्रम होता.खूप काही ठरवले होते तिने पण एकही गोष्ट आता तिच्या मनासारखी घडत नव्हती.जाऊ घरात आली तरी अश्विनीचे जे आधी सुरू होते आताही तेच सुरू होते. उलट आधी ती कोणाकडून कुठलीही अपेक्षा न करता सगळे आनंदाने करत होती. पण आता ती लहान जावेकडून एवढी तर अपेक्षा ठेवूच शकत होती.
आलोक घरात लहान होता. शिक्षण पूर्ण होऊनही मनासारखी नोकरी न मिळाल्याने गाठीशी रुपयादेखील नव्हता.पोटापुरती शेती असूनही त्याला शेती काम करणे म्हणजे कमीपणा वाटायचा. अश्विनी आणि अमितचे लग्न झाले तेव्हापासून हा नोकरीच्या शोधात होता. पण पगार कमी आहे, घरापासून लांब मी नाही राहू शकत, दादासारखे घरी राहून करता येईल अशीच नोकरी मी करेल. ही अशी एक ना अनेक कारणे सांगून त्याने प्रत्येक वेळी हाती आलेली दोन रुपये कमावण्याची संधी अनेक वेळा गमावली.त्याचे लग्न जमवताना देखील खूप प्रॉब्लेम्स आले. बिन कामाच्या मुलाला कोणी मुलगी देखील देईना. खूप शोधमोहीम राबवल्यानंतर कुठे अमृता त्याच्या आयुष्यात आली होती. दोघेही एकमेकांना अगदी तोडीस तोड भेटले होते. बऱ्याच बाबतीत दोघांचेही एकमत व्हायचे. आळशीपणा देखील दोघांमध्येही सारखाच भिनला होता. त्यात घरात लहान असल्याने कधी कोणती जबाबदारी त्याच्यावर पडलीच नाही. अमित मात्र त्याच्या पूर्णपणे विरुध्द होता. जबाबदारीने सर्व गोष्टी अगदी चोखपणे निभावत होता. चांगल्या पगाराच्या नोकरीमुळे त्याची आर्थिक बाजू देखील स्ट्राँग होती. त्यात त्याला बायकोदेखील त्याच्यासारखी मिळाली. अगदी हुशार आणि जबाबदार अश्विनी बायको म्हणून त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचे नशीबच पालटले. लग्न झाल्यापासून अगदी जबाबदारीने तिने घर सांभाळले.ह्याउलट आलोक आणि अमृताची जोडी होती. दोघांनाही कामाचा सारखाच कंटाळा. रोज सकाळी उशिरापर्यंत लोळत पडण्याची घाणेरडी सवय घरातील इतरांना मात्र त्रासदायक ठरत होती. पण अमृताला मात्र सर्वकाही समजत असूनही ती मुद्दाम असे वागत आहे याची आता अश्विनी आणि रंजना ताईंना खात्रीच पटली होती.”मी म्हणून तुमच्याशी लग्न केलं. आधीच तुम्हाला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. पहा मग तुम्ही किती भाग्यवान आहात.”अनेकदा गमतीच्या सुरात अमृता आलोकला हे असे ऐकवून दाखवायची.यावर आलोक देखील हसून रिप्लाय द्यायचा. दोघांचेही हे असे बेजबाबदार वागणे आणि वायफळ गप्पा मात्र अश्विनीला वेळोवेळी खटकायच्या; पण त्यांच्या या अशा वागण्यावर सासू सासरे मात्र मौन बाळगायचे. त्यावेळी अश्विनीला मात्र खूपच त्रास व्हायचा.मुळात या सगळ्या गोष्टींना सासूबाईच जबाबदार होत्या. कारण आधीपासूनच आलोकचे प्रमाणापेक्षा जास्त झालेले लाड, घरात शेंडेफळ आहे म्हणून त्याला मिळणारी उजवी बाजू आणि अमित मोठा आहे म्हणून त्याला वेळोवेळी करून दिलेली जबाबदरीची जाणीव ह्या दोन गोष्टींमुळेच दोन्ही मुले दोन विरुध्द पद्धतीने वाढत गेली आणि त्याचाच परिणाम आता हा असा दिसत होता.विचार करून करून अश्विनी मात्र आतून तुटली होती. मनातून कुठेतरी तिला खूपच वाईट वाटत होते. पण या सर्वात चूक कोणाची? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच होता.क्रमशःकाय असेल आता अश्विनीचे पुढचे पाऊल. धाकट्या जावेला पुढे शिकण्यासाठी ती देईल का साथ? जाणून घ्या पुढील भागात.

“अथर्व, आरुष बस झाला खेळ…चला आता अभ्यासाला बसा.” रागातच अश्विनी मुलांवर डाफरली.
“थांब ना गं आई…खेळू दे ना गं थोडावेळ. तू नेहमी असंच करतेस. तुझ्यापेक्षा काकीच छान आहे. ती बघ किती छान खेळते आमच्यासोबत. कधीच अभ्यास कर म्हणत नाही आणि तुझं मात्र सारखं सुरू असतं, खाऊन घे आणि अभ्यास कर. खेळा असं स्वतःहून कधीच म्हणत नाहीस आणि तू पण कधी आमच्यासोबत खेळत नाहीस.”
सहा वर्षाच्या लेकाचे, आरुषचे हे असे बोलणे ऐकून खरं तर अश्विनीच्या पायाखालची जमीनच सरकली. हे काय सुरू आहे, तिला काहीच समजेना. सर्वांसमोर आज लेकाने देखील तिला चुकीचे ठरवले होते आणि सहा महिन्यांपूर्वी आलेली काकी मुलांना जास्त प्रिय झाली होती. आरुषच्या बोलण्याने घरात एकच शांतता पसरली. क्षणभर कोणी काहीच बोलेना. नंतर सासूबाईंनी नातवाला समज दिली.”आरु आईसोबत कोणी असं बोलतं का? तुमच्या भल्यासाठीच ती बोलते ना आणि तुम्ही तिला त्याबदल्यात हे असे ऐकवणार का?”
आजीने कितीही समजावले तरी त्याक्षणी काय चूक आणि काय बरोबर हे थोडीच ना त्या लहान लेकराला समजणार होते. शेवटी जे लाड करतात, मुलांच्या मनासारखे वागतात तेच त्यांना प्रिय असणार हेही तितकेच खरे.अश्विनी तर काहीही न बोलता तिचे काम करत राहिली. लेकाचे बोल खूपच लागले तिच्या मनाला.’ ही अशी समज जर वेळीच लेकाला आणि सुनेला दिली तर पुढे घडणाऱ्या या अशा अनेक गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या.’ अश्विनी मनातच बोलत होती.अमृता मात्र त्यावेळी वेगळ्याच तोऱ्यात होती. तिच्या चेहऱ्यावरील आनंदच सर्व काही सांगून गेला. जणू काही तिलाही हेच हवे होते. पाणावलेल्या डोळ्यांनी अश्विनीने अमृताकडे एक कटाक्ष टाकला. एवढे सगळे होवूनही अमृताच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचे हसू होते. आरुषसोबत खेळण्यात ती आणखीच रममाण झाली. एका शब्दाने तिने मुलांना दुखावले नाही की खेळ थांबवला नाही. उलट तिला खेळण्यासाठी आणखीच जोर आला. असेच चित्र त्याक्षणी दिसत होते.
मोठा अथर्व मात्र ताबडतोब दप्तर घेऊन बसला. वाढत्या वयामुळे त्याला थोडी समज आली होती.
“आई घे ना गं माझा अभ्यास, मी घेतले बघ दप्तर.” केविलवाण्या सुरात अथर्व बोलला. जणू काही आईच्या भावना  त्याला समजल्या होत्या.अश्विनीचा मात्र आता मूडच नव्हता. मनावर झालेला शब्दांचा घाव तिच्या जिव्हारी लागला होता. तरीही डोळ्यांतील अश्रूंना कसाबसा आवर घालत तिने लेकाचा अभ्यास घेतला. तिचे मात्र अजिबात लक्ष नव्हते.”आरु जा आता अभ्यास कर. नाहीतर आई रागावेल.” अमृता छोट्या आरुषला म्हणाली.”मला नाही अभ्यास करायचा. तू खेळ माझ्यासोबत. नाहीतर मी नाही बोलणार तुझ्याशी.” आरुष मात्र अमृताला सोडायला तयारच नव्हता.”आज नको उद्या आपण पुन्हा खेळू.” अमृताने आरूषची समजूत घालून त्याला अभ्यास करायला पाठवले. विशेष म्हणजे अमृताच्या एका वाक्यावर त्यानेही लगेच दप्तर घेतले. अश्विनीला मात्र या गोष्टीचे नवल वाटले.’काय जादू केली आहे हिने माझ्या लेकावर देवच जाणे? मुलांना वेळ देते, लहान होऊन त्यांच्याशी खेळते, हे ठीक आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. अथर्वला समजते पण आरूषचे काय? चूक बरोबर यांतील फरक अजून नाही कळत त्याला. पण अमृताला तर कळतो ना! मग दरवेळी मुद्दाम हे असे वागून काय मिळते हिला? काम म्हटल्यावर हे दुखते नि ते दुखते, मग काम सोडून मुलांसोबत असा टाईमपास करताना सगळा आजार कुठे जातो? कोणत्याही गोष्टीला एक ठराविक मर्यादा असते की नाही? त्यात आपण आता माहेरी नाही सासरी आहोत याचेही भान नाही हिला. आईंना देखील तिच्या चुका दिसतात पण तरीही त्या गप्पच बसतात. त्यांची सगळी कामे वेळच्या वेळी होतात मग त्यांना तरी काय घेणेदेणे आहे म्हणा, तिने काम केले काय आणि नाही केले काय! मला त्रास देण्यासाठी अमृता मुद्दाम असे वागते हे मात्र नक्की. तोंडावर ताई ताई करत खूप गोड वागते आणि मीही तिच्या त्या खोट्या प्रेमाला भुलते.’ मनातच अश्विनी बोलत होती; पण आता तिलाही हळूहळू अमृता समजायला लागली होती.
खरोखर ‘कानामागून आली अन् तिखट झाली’ ही म्हण अमृताला अगदी तंतोतंत लागू होत होती.  अश्विनीच्या नंतर ती सून म्हणून घरात आली; पण आज मात्र तिलाही ती वरचढ ठरली होती. मोठ्यांचा मानपान नाही की चुकीबद्दल कुठलाही खेद नाही.आपले काहीतरी चुकत आहे, आपली मोठी जाऊ आणि सासू सकाळी लवकर उठून सगळी कामे आवरतात, आपल्या वाट्याला अर्धी कामेदेखील येत नाहीत आणि जेवढी कामे वाट्याला येतात त्यातही नीटनेटकेपणा नाही. उगीच करायचे म्हणून करायचे आणि बाजूला व्हायचे. हे असे तिचे कामाचे तंत्र.’आपल्याला देखील आपली जबाबदारी ओळखून वागायला हवे,’ हे असे विचार तर अमृताच्या गावीही नव्हते. घरात बसून टाईमपास करण्यापेक्षा काहीतरी कर असा सल्ला देणारी माहेरची मंडळी मात्र लेकीला चार हिताच्या गोष्टी सांगण्यापेक्षा उलट तिला चुकीचे सल्ले देत होते.पुढच्या दोनच दिवसांत अमृताने कॉलेजला जायला सुरुवात केली. फॅशन डिझायनिंगला एडमिशन जे घेतले होते. आता कॉलेजला जायचे म्हटल्यावर तरी मॅडमने लवकर उठावे, पण नाही. अमृताने मात्र तिच्या रूटीनमध्ये अजिबात बदल केला नाही. सकाळी अकराचे कॉलेज होते. मॅडम साडे नऊ पावणे दहालाच घराबाहेर पडायच्या. त्यात सकाळचा डबा थोरल्या जावेने बनवलेला असायचाच.
अमृताचे माहेर कॉलेज पासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर होते. मग काय… दोन दिवस झाले की मॅडम आहेतच माहेरी. एकदा दोनदा तर सासरी कोणालाही न सांगताच मॅडम माहेरी मुक्कामी थांबल्या.”अजून का आली नाही?” हे विचारण्यासाठी सासूने फोन केला.”आईची तब्बेत बरी नाही, म्हणून थांबले.” समोरुन हे असे अनपेक्षित उत्तर मिळाले.”मग फोन करुन कळवायला काय झाले होते?” रागातच रंजना ताई बोलल्या. त्यांनाही ह्यावेळी तिचा खूपच राग आला होता.”सॉरी मी विसरले, माझ्या लक्षातच नाही.” अमृता मात्र सॉरी म्हणून चूक मान्य करुन मोकळी झाली.पुढे काहीही न बोलता सासूने फोन ठेवला.’आता पाणी डोक्यावरून जायला सुरुवात झाली होती. वेळीच जर सावध झाले नाही तर नाकातोंडात पाणी जायला मग वेळ लागणार नाही.’ अश्विनी मनातच विचार करू लागली.क्रमशःआता काय असेल अश्विनीच्या मनात? अमृताला ती अद्दल घडवणार का? जाणून घ्या पुढील भागात.

अमृताचे बेजबाबदारपणाचे वागणे दिवसेंदिवस वाढतच चालले होते. त्यात आलोकची देखील तिला साथ होती. आता नवसाची बायको आहे म्हटल्यावर नवऱ्याची साथ तर असणारच. रंजना ताईदेखील धाकट्या सुनेच्या चुका दिसत असूनही गप्प बसण्यातच शहाणपण समजत होत्या. या सगळ्यांत अश्विनीचे मात्र हाल होत होते. घरातील कामे करण्यात तिला आता काडीचाही रस राहिला नव्हता. आज घडलेला प्रकार तिने अमितच्या कानावर घालण्याचे ठरवले. याआधीही तिने तसा खूपदा प्रयत्न केला. पण अमित मात्र ‘तू मोठी आहेस, समजून घे थोडं’ असे सांगून चर्चेला पूर्णविराम द्यायचा. त्यामुळे अश्विनी एकटीच मनात कुढत बसायची.’आज मात्र काहीही झाले तरी सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा.’ हे अश्विनीने मनाशी पक्के केले.
रात्रीची जेवणं आटोपून सर्वजण झोपायला जाणार तोच आरुषने ‘मी काका काकीकडेच झोपणार’ म्हणून हट्ट सुरू केला. सगळेजण त्याला समजावत होते पण तो ऐकायलाच तयार नव्हता. अमितने देखील त्याला दम भरला मग तर तो अजूनच अडून बसला.
“बरं रडू नकोस, झोप आमच्याकडे.” इच्छा नसतानाही अमृताने त्याचे मन जपले. लेकरूही त्यामुळे खुश झाले. आता तर अमृता काकी अजूनच गोड झाली त्याच्यासाठी. अश्विनी मात्र आई म्हणून आज हरली होती. तिला तर आता रडूच आवरेना. कसेबसे अश्रूंना आवरत ती तिच्या रूममधे निघून गेली. आत गेल्यावर मात्र तिच्या अश्रूंचा बांध तुटला. मन शांत होईपर्यंत तिने रडून घेतले.अमितदेखील तिच्या पाठोपाठ रूममध्ये आला.’आतापर्यंत अश्विनी मला हेच तर सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण मी मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले तिच्या बोलण्याकडे.’ अमितचे मन त्यालाच खात होते. त्यालाही आता भावना अनावर झाल्या.अश्विनीला कुशीत घेऊन तो तिची समजूत काढू लागला.”फक्त तुमच्यासाठी मी आजपर्यंत तिचे सगळे नखरे सहन केले, हे लक्षात ठेवा. आता प्रश्न माझ्या मुलांचा आहे. आता मी काहीही ऐकणार नाही तुमचे. दिवसेंदिवस या घरात माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला जातोय. पण जाऊ दे म्हणून प्रत्येक वेळी सोडून देत राहिले. आता जर असेच सुरू ठेवले तर माझी मुलेदेखील माझी राहणार नाहीत. तशीही एक आई म्हणून मुलांच्या नजरेत माझी किंमत काय आहे ते मी समजून चुकले आहे.मोठी जाऊ म्हणून कितीदा समजून घ्यायचं एखाद्याला. मोठं असूनही त्यांच्या नजरेत आपली किंमत शून्यच असेल तर नकोय मला असा खोटा मान, मोठेपणा. समोरचा गोड बोलून दरवेळी स्वतःचा स्वार्थ साधू पाहत असेल तर आपणच एकट्याने किती दिवस एकतर्फी सगळा कारभार सांभाळायचा? आणि एवढे करूनदेखील पुन्हा मीच मूर्ख ठरणार असेल तर मग, मीच का सर्वांची मने जपत बसायची.” रडत रडत अश्विनी बोलत होती.
अश्विनीने आज इतक्या दिवसांची तिच्या मनाची सर्व खदखद बोलून टाकली. तिला खूपच हलके वाटत होते. ह्यावेळी अमित देखील तिच्या पाठीशी भक्कम उभा होता.
“शांत हो आशू, मला सगळं समजतंय. आपण मोठे आहोत म्हणून आपण आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत, हा माझा अट्टाहास होता. पण घरातील कोणालाच त्याची किंमत नसेल तर आता बस…मी नाही जाणार तुझ्या मनाविरुद्ध. पण यावर एक मार्गदेखील शोधलाय मी.””मार्ग…म्हणजे नेमके काय करणार आहात तुम्ही?””आपण आता इथे नाही राहायचं.””म्हणजे मला नाही समजलं, तुमच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे?””मला माफ कर अश्विनी, मी तुझ्यापासून एक खूप मोठी गोष्ट लपवली होती. पण आता मला ती चूक सुधारण्याची संधी मिळालीये असेच मी समजतो.””माझ्यापासून नेमकं काय लपवलंय तुम्ही?””आशू… अगं एक आठवड्यापूर्वी मला प्रमोशन लेटर मिळाले होते; पण मी ते नाकारले. फक्त आणि फक्त आई बाबांचा विचार करून मी तसे केले. पण तरीही माझ्यातील कॅलीबर पाहून सरांनी मला आठ दिवसांची मुदत दिली आहे. पाच सहा  दिवसांत विचार करून मी माझा निर्णय द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे.””पण असे का केले तुम्ही? असं प्रमोशन कोणी नाकारतं का?””अगं प्रमोशन झाल्यावर कंपनीच्या दुसऱ्या शाखेत मला शिफ्ट व्हावं लागणार आहे आणि कंपनीची दुसरी शाखा शहरात आहे. तुम्हाला सोडून, इथला सगळा कारभार यांच्या हातात सोपवून मी एकटा तिकडे कसे जाणार होतो? पण आता माझाही निर्णय पक्का झालाय, आता मी एकटाच नाही तर तुला आणि मुलांना सुद्धा घेऊन जाणार आहे. करू दे मग इथे यांना कसे करायचे ते. मॅडमला कॉलेजला ऍडमिशन घ्यायची खूपच हौस होती ना मग आता घरातील कामे करून कर म्हणावं कॉलेज. हे सर्व तिने मुद्दाम केले आहे, मला कळत नाही का आशू? ज्या व्यक्तीला शिक्षणाची एवढीच आवड होती तर मग घराच्या बाजूलाच कॉलेज असतानादेखील लग्नाआधीच तिला का नाही शिकावेसे वाटले? बस झालं आता, तिला काय करायचे ते करु दे आणि आईलाही किती सहन करायचं तेवढं करू दे. लाडक्या सुनेला अजून किती दिवस अशी पाठीशी घालते पाहुयात.”
‘आपल्या माघारी इथे कसे होणार? या विचारांत अश्विनी क्षणभर गुंतली होती. तिचे मन पुन्हा घरच्या विचारांत अडकले. पण आता नाही, बस झालं. आता भावनेच्या आहारी जाऊन चालणार नाही.आतापर्यंत स्वतःच्या इच्छा,आकांक्षा बाजूला ठेवून घरातील प्रत्येक जबाबदारी मनापासून पार पाडत आले. त्याची कदर मात्र कोणीच केली नाही. मग आता मी तरी इथला विचार करून स्वतःला असा किती दिवस त्रास करून घ्यायचा? मी इथून गेल्याशिवाय तशीही माझी किंमत कोणाला कळणार नाही.’ मनातच अश्विनी बोलत होती.अश्विनीने देखील आता अमितसोबत जाण्याचा निर्णय पक्का केला. दुसऱ्याच दिवशी अमितने प्रमोशन स्विकारले. पुढच्या आठ दिवसांत त्याला नवीन ठिकाणी जॉईन व्हावे लागणार होते. दोन दिवसांत सगळी प्रोसिजर पूर्ण करुन मगच त्याने घरात ही बातमी सांगितली. नवीन ठिकाणी राहण्याची देखील व्यवस्था आधीच करून ठेवली. मुलांच्या शाळेचीही चौकशी केली. सर्व गोष्टी अगदी जुळून आल्या होत्या. जणू देवाच्याही मनात हेच असावे.अमितचा निर्णय ऐकून सर्वात जास्त धक्का रंजना ताईंना बसला. ‘कितीही काही झाले तरी आमची अश्विनी आमची साथ कधीही सोडणार नाही,’ याची त्यांना खात्री होती. पण आता तिच्या या निर्णयाला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत, हे रंजना ताईंना पटले होते. अश्विनीशिवाय घराला घरपण उरणार नाही.  अमृताला तर अश्विनीची सर कधीही येणार नाही हेही त्यांना चांगलेच ठाऊक होते.ठरल्याप्रमाणे अमित त्याच्या फॅमिलीला घेऊन निघाला. रंजना ताईंच्या अश्रूंचा बांध अखेर तुटला. गेल्या चार पाच दिवसांत त्यांना नीट झोपही लागली नव्हती. सासूला रडताना पाहून अश्विनीला देखील भरुन आले; पण ह्यावेळी तिने मन घट्ट केले. अजिबात रडायचे नाही असे तिने आधीच ठरवले होते.”मुलांना सुट्टी असेल तेव्हा येत जा अधूनमधून.” सासूने हक्काने दोघांनाही सांगितले.”आई काळजी घ्या, येते मी.” म्हणत मन कठोर करून अश्विनी गाडीत बसली.आता अश्विनी नाही म्हटल्यावर तरी अमृता जबाबदारीने वागेल असे रंजना ताईंना वाटले होते. पण कसले काय! तिच्या वागण्यात तर काडीचाही बदल झाला नाही!अश्विनीच्या माघारी घरातील सर्व जबाबदारी आता एकट्या रंजना ताईंवर पडली. त्यांना तर पावलोपावली अश्विनीची आठवण यायची. तिच्या आठवणींत त्यांचे डोळे पाणवायचे. त्यावेळी अमृताच्या वागण्याचा अश्विनीला किती त्रास होत असेल याची जाणीव रंजना ताईंना स्वतः अनुभव घेतल्यावरच झाली. त्यांनाही खूप मनस्ताप व्हायचा पण त्यांचाही नाईलाज होता.’अश्विनीच्या भावना जर आपण वेळीच समजून घेतल्या असत्या तर आज आपल्यावर ही वेळ आलीच नसती.’ याची जाणीव आता रंजना ताईंना होत होती. पण आता त्याचा विचार करून काहीही फायदा नव्हता.क्रमशः

न राहवून एक दिवस रंजना ताईंनी अमृताला खूप सुनावले.”अगं थोडी जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग. आज तुझ्यामुळे अश्विनीने अमित सोबत जाण्याचा एव्हढा मोठा निर्णय घेतला. तुला नसेल तिची गरज पण आम्हाला आहे. निदान आतातरी सुधर. “”नका तुमच्या लाडक्या सुनेचे कौतुक ऐकवू मला. तिलाही तेच हवे होते. नेहमी आम्हाला अडाणी  आणि मूर्ख समजत होती. हिने चार पुस्तकं जास्त काय वाचली तर तिचा रुबाब तो केव्हढा! मी एडमिशन घेतले तर तिच्या का मग पोटात दुखायला लागलं? आणि मी तिला कधीच नाही सांगितले की मोठेपणा घेऊन सगळी कामे करत जा. तिला जमत होते तुमच्या पुढे पुढे करायला पण आता माझ्याकडून तशी अपेक्षा अजिबात ठेवू नका. मी अश्विनी नाही अमृता आहे हेही ध्यानात ठेवा.””अगं मोठी जाऊ आहे तुझी ती. निदान अरे तुरे तरी करू नकोस आणि तू तुझ्या सासूसोबत बोलत आहेस हेही विसरु नकोस.””बस झालं आई, मला नका शिकवू. तसाही माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. मला नाही आवडत कोणी चांगलं म्हणावं म्हणून पुढे पुढे नाचायला. ते तुमच्या अश्विनीलाच चांगलं जमत होतं. आता गेलीच ना ती. जाताना तुमचा विचार नाही केला तिने. मग आता तिचा विषय घेऊन मला का ऐकवताय?” सासूला उलटसुलट बोलून अमृता निघून गेली.
‘दहा वर्ष झाली माझ्या अश्विनीला घरात येऊन. कधी एका शब्दाने दुखावले नाही कोणाला. हिने मात्र सहा महिन्यांतच घराचे तुकडे पाडले. कानामागून आली अन् तिखट झाली.’ रंजना ताई तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या.डोक्याला हात लावून रंजना ताई भिंतीचा आधार घेत खाली टेकल्या. अश्विनीच्या आठवणींत त्या हमसून हमसून रडू लागल्या.’अश्विनीने जे केले ते योग्यच आहे. हिचा खरा चेहरा जरी तिला दिसत नव्हता तरी तिने हिला बरोबर ओळखले होते. पक्की आतल्या गाठीची आहे ही. तोंडावर इतकी गोड बोलते आणि मनात आपल्याच माणसांबद्दल हे असले विचार करते.’रंजना ताईंना आता स्वतःचाच राग येत होता.’ का मी प्रत्येक वेळी गप्प बसले. त्यावेळी अश्विनीला साथ दिली असती तर माझी अश्विनी मला सोडून कधीच दूर गेली नसती.दुसऱ्याच दिवशी नवऱ्याला घेवून रंजना ताईंनी घर सोडले.
‘इकडे जे होईल ते होईल. नाही सहन होत आता.’ खूप विचार करून रंजना ताईंनी अश्विनी आणि अमितचे घर गाठले.अमितने आलोकला फोन करून आई बाबा त्याच्याकडे आलेत ही बातमी लगेचच त्याला सांगितली. उगीच तो काळजी करत बसेल म्हणून मोठा भाऊ या नात्याने अमितने त्याचे कर्तव्य पार पाडले.सहा महिने झाले तरी आलोकने मात्र आई बाबांना गावी येण्याचा साधा विषय देखील घेतला नाही. गावी काय सुरू आहे? कसे करतात दोघे हे अद्याप तरी कोणाला समजले नाही.फक्त बाबांना एकदा दोनदा त्यांच्या शेजारच्या काकांनी फोन केला होता तेव्हा त्यांच्या कानावर काही गोष्टी आल्या होत्या.
आता अमितलाच काहीतरी करावे लागणार होते. एक जबाबदार आणि घरातील मोठा मुलगा म्हणून अमितने सुट्टी घेऊन एकदा गावी चक्कर मारली.शेतीची अवस्था फारशी बरी नव्हती. एकट्या आलोकला सगळे हॅण्डल होत नव्हते. अमितने मोठा भाऊ या नात्याने खूप समजावले त्याला.”दादा तू परत ये.” म्हणत आलोक विनवणी करू लागला.”नाही होत माझ्याकडून हे सगळं. उत्पन्नापेक्षा खर्चाचा आकडा वाढतच चाललाय. आजवर खूप चुका केल्या मी. वहिनीचा आणि आई बाबांचा खूप मोठा गुन्हेगार आहे मी. मला माफ कर दादा.””हे बघ आलोक, बायकोच्या प्रेमात त्यावेळी तू वाहवत गेलास. चांगले वाईट काहीच समजले नाही तुला. पण अरे हे सर्व न समजण्या इतपत तू लहान देखील नाहीस. थोडा व्यावहारिक दृष्टीने विचार करायला शिक. कोणत्या गोष्टीवर किती खर्च करायचा याचे नियोजन कर. नशिबाने जे काही मिळाले आहे त्याची किंमत आणि जाणीव ठेव. आयुष्य खूप लहान आहे. आपल्या आई बाबांनी शून्यातून हे सगळं उभं केलं. त्याचा असा अंत होऊ देऊ नकोस.””दादा खरंच चुकलं रे माझं.””तुला जर इतकंच वाटतंय तर मग आईची आणि बाबांची तुला एकदाही आठवण नाही आली? एकही फोन करावासा वाटला नाही तुला त्यांच्यासाठी?”कोणत्या तोंडाने आलोक आता उत्तर देणार होता. खरंतर बायकोपुढे त्याचे काहीच चालत नव्हते.
‘एवढे सगळे होऊन देखील दादा इतक्या शांततेत मला समजाऊन सांगत आहे,’ आलोकच्या डोळ्यांत आसवांची दाटी झाली.आपल्यामुळे हे सगळे घडले आहे, याची अमृताला तर जराही खंत नव्हती.अमितने मात्र यावर उपाय म्हणून पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला. पण आता अश्विनीला हे अजिबात मान्य नव्हते. तिने तिचा निर्णय स्पष्ट शब्दांत अमितला सांगून टाकला.”खूप संधी देऊनही एखादी व्यक्ती सुधरायचे नावच घेत नसेल तर शेवटी त्यांचे नशीब. आता माझेही पेशन्स संपलेत. खूप समजूतदारपणा दाखवला, पण आता नाही.””अगं आशू पण आपल्याच घराची आणि शेतीची वाताहत आपण आपल्या डोळ्यांनी बघायची का?” अमित म्हणाला.”अजिबात नाही. त्यावर एक उपाय आहे आणि तो म्हणजे शेतीची वाटणी. ज्याने त्याचं करावं आता. भाऊजींना झेपत नसेल तर दुसऱ्या कोणाला तरी आपल्या हिस्स्याची शेती कसायला देऊ.” आलोक आणि अमृताच्या बेजबाबदार वागण्यामुळे अश्विनीने इतका मोठा कठोर निर्णय घेतला होता.
“अमित आम्हाला पटतंय अश्विनीचं. असं केल्यावरच त्यांचे डोळे उघडतील.” आई बाबांनी देखील सुनेच्या निर्णयाला दुजोरा दिला.अमितला मात्र आलोकची खूपच काळजी वाटत होती. पण आई बाबांनीच वाटणीचा विषय उचलून धरला. अमितचाही आता नाईलाज होता.काही दिवसांतच वाटणीचा विषय अमृता आणि आलोकपर्यंत पोहोचला. अमृताने मात्र या गोष्टीला नकार दिला.”तू आता बोलूच नको काही. आज तुझ्यामुळे आपल्यावर ही वेळ आलीये हे ध्यानात ठेव. खूप झालं आता. तू लग्नाला हो म्हणालीस म्हणून माझे लग्न झाले, फक्त तुझ्यामुळे माझ्या नशिबी लग्नाचे सुख आले, नाहीतर आयुष्यभर मला तसेच राहावे लागले असते हे वारंवार ऐकवून माझ्यावर तू किती उपकार केले आहेत याची वेळोवेळी जाणीव करून दिलीस मला. वहिनीच्या आणि आईच्या जीवावर मजा करत राहिलीस. काम नको म्हणून मुद्दाम तुझ्या माहेरच्यांच्या सांगण्यावरून कॉलेजला ॲडमिशन देखील घेतलेस आणि मीदेखील नंदीबैलासारखा तुझ्या हो मध्ये हो मिळवत राहिलो. कारण तू माझी नवसाची बायको आहेस ना!”लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदा आलोक बायकोला इतके तोडून बोलत होता.”अहो पण मी तरी काय करू, मला आई आणि ताई असेच सांगत होत्या. अंग राखून काम करायचे, सासूचे आणि जावेचे पुढे पुढे करायचे नाही. नाहीतर आयुष्यभर त्यांची गुलामी करावी लागेल. कोणी चांगलं म्हणावं म्हणून नाही तर आपल्याला जे चांगले वाटते तेच नेहमी करायचे आणि ह्या जन्मी त्यांना सून मिळाली हेच त्यांचे नशीब, असं कोणी सांगितल्यावर मग मी तरी काय करू?””अगं पण तुला तुझं डोकं नाही का? तुझ्या माहेरच्यांनाही ही गोष्ट कळायला हवी. त्यात नशिबाने तू मला मिळालीस म्हणून मीही तुझ्या प्रेमात आंधळा झालो होतो. चुकून काही बोललो तर तू नको मला सोडून जायला हा एकच विचार करून मी गप्प बसलो. पण आता मला असं वाटतंय तुझ्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली मी. एकवेळ लग्नच नसते केले मी तरी चालले असते.””असं नका ना ओ बोलू, चुकलं माझं.”यापुढे तोंडातून एक शब्दही काढायचा नाही. नीट राहता येत असेल तर राहा नाहीतर जे तुला शिकवतात ना त्यांच्याकडे निघून जा.” आलोकने त्याच्या लाडक्या बायकोला खूपच कठोर शब्दांत सुनावले. कारण तोही आता पुरता हतबल झाला होता.अमृताला देखील मनातून तिची चूक समजली होती.’अश्विनी ताईंच्या चांगुलपणाचा मी खूपच फायदा घेतला. पुढचा विचार मी कधी केलाच नाही. पण आई आणि ताई जसं सांगत होत्या तसंच मी वागत होते. मी त्यांचं ऐकायला नको होतं.’आलोकने अमृतासोबत सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या.”यापुढे माहेरच्या लोकांचे काहीही ऐकायचे नाही. मला फक्त तुझी साथ हवीये बाकी काही नको आणि कष्टाला पर्याय नाही हेही ध्यानात ठेव.” आलोकने अमृताकडून वचन घेतले.अमृताने देखील सासू सासऱ्यांची माफी मागितली आणि त्यांना गावी बोलावून घेतले. अमित आणि अश्विनीने मग वाटणीचा विषय बंद केला. अमृता आणि आलोकला तसेच अमृताच्या माहेरच्यांना सर्वांनी समज दिली.”यापुढे लेकीच्या संसारात लक्ष घालायचे नाही,”असे अमृताच्या वडिलांनी तिच्या आईला आणि बहिणीला खडसावले.काही दिवसांतच अमृतामधील बदल सर्वांना दिसला. सासू सासरेही मनातून समाधानी झाले. अश्विनीने देखील दूर राहून तिच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याचे पालन केले. घरदार आणि मुलांना सांभाळून तिने एका कोचिंग क्लासेसमध्ये टीचिंगदेखील सुरू केले. आता कुठे खऱ्या अर्थाने अश्विनीला समाधानी झाल्यासारखे वाटत होते.खरंच नात्यांच्या बाबतीत घरोघरी मातीच्या चुली असे काही अंशी तरी असतेच. पण प्रत्येकाने एकमेकांना समजून घेण्याचा निदान प्रयत्न तरी करायला हवा. नशिबाने जे मिळाले ते टिकवताही यायला हवे आणि सुखाबरोबरच समाधानाचा देखील विचार व्हावा.आजकाल ग्रामीण भागात लग्न ही खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी कितीही कमावता असला तरी त्याचा काही फायदा होत नाही. पर्यायाने लग्न जमवणे आणि जमलेच तर ते टिकवणे ही काळाची गरज बनली आहे.समाप्त.वरील कथा ही काल्पनिक आहे परंतु तिचा वास्तवाशी काही संबंध नाही हे म्हणणे उचित ठरणार नाही. कारण अशाही घटना कुठे ना कुठेतरी समाजात आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्याच सासवा आणि सगळ्याच जावा काही वाईट असतात असे नाही. त्यात रंजना ताई आणि अश्विनी सारखे अपवाद देखील असतात.धन्यवाद©®कविता वायकर

18 thoughts on “कानामागून आली”

 1. Hey! Do you know if they make any plugins to assist with SEO?
  I’m trying to get my website to rank for some targeted keywords but
  I’m not seeing very good results. If you know of any
  please share. Thanks! You can read similar
  article here: GSA Verified List

  Reply
 2. Wow, wonderful blog structure!
  How lengthy have you been running a blog for? you made running a blog glance easy.
  The overall look of your web site is fantastic, as well
  as the content material! You can read similar here prev next and
  those was wrote by Trudie78.

  Reply

Leave a Comment