कर्तव्य-1


“आत्या माझ्यासाठी काय आणलं??”

कॅनडावरून आलेल्या आत्याभोवती भाच्यांचा गराडा जमला. आज तब्बल 2 वर्षांनी आत्या माहेरी आली होती. घरातले दादा, वहिनी, आई, बाबा डोळ्यात प्राण आणून लेकीची परत यायची वाट बघत होते.

चार वर्षांपूर्वी मितालीचं लग्न झालं होतं. मिताली दिसायला सुंदर, शिकलेली..माहेरची परिस्थिती पण बरी होती. त्यांना आशिष रावांचं स्थळ आलं आणि बघताक्षणी होकार दिला गेला. मुलाकडचेही चांगले सुशिक्षित आणि मुलगा हुशार, समजदार होता. त्यांनी लागलीच लग्न उरकलं. अल्पावधीतच त्यांना कॅनडाची ऑफर आली आणि दोघेही तिकडे गेले. घरात परदेशात  जाणारी ती पहिली व्यक्ती होती.

घरात तिची वहिनी तिच्या इतकीच शिकलेली होती. पण तिच्या वाट्याला सुख तसं कमीच आलेलं. तिचा नवरा- आशुतोष, म्हणजेच मितालीचा भाऊ. त्यालाही दुसऱ्या शहरात चांगल्या जॉब ऑफर असताना आई वडिलांसाठी त्याने घर सोडले नाही.

मितालीचे सासू सासरे त्यांच्या जाण्याला आढेवेढे घेत होते, एकुलता एक मुलगा. त्यात आमची वयं पाहता त्यांनी जाऊ नये असंच त्यांना वाटायचं. पण मितालीच्या आई वडिलांना मात्र मिताली आणि तिच्या नवऱ्याने बाहेर पडून प्रगती करावी असंच वाटायचं. मिताली आणि तिच्या नवऱ्याने आई वडिलांना समजवलं की ते अधूनमधून येत राहतील, संपर्कात राहतील आणि वेळ आली तर शेजारच्या लोकांना आणि नातेवाईकांना मदतीसाठी सांगून ठेवलं. त्यांना कॅनडाला जायचंच होतं, नेमकं त्याचवेळी मितालीच्या भावाला- आशुतोषलाही तिथून एक ऑफर आली, त्याला मात्र आई वडिलांनी साफ विरोध केला. मुलीला बाहेर जाण्यासाठी हट्ट करायचा आणि मुलाला मात्र जवळच ठेवायचं असं दूतर्फी त्यांचं वागणं झालं नातवंडांना पुढे करून त्याला जाऊ दिले नाही. आपल्या मुलीच्या बाबतीत आणि मुलाच्या बाबतीत असलेल्या वागणुकीत मोठा विरोधाभास होता.

वहिनीने मात्र या सगळ्यात कुठेही तक्रार केली नाही. मितालीला आपल्या वहिनीबद्दल मोठा आदर होता, प्रेम होतं. तिने वहिनीसाठी बऱ्याच वस्तू आणलेल्या. आपल्या आई वडिलांना आपली वहिनीच नीट सांभाळू शकेल याचा तिला विश्वास होता.

मितालीने तिकडून आणलेल्या वस्तू सर्वांना वाटल्या. तिच्या आई वडिलांना मुलीचं किती कौतुक करू अन किती नको असं झालं. ती इतक्या वर्षांनी माहेरी आली म्हणून सगळी नातेवाईक मंडळी त्यांना भेटायला येत होती. प्रत्येकासमोर आपल्या लेकीने काय काय आणलं, कॅनडाला तिने कसा सोन्याचा संसार थाटला हीच कॅसेट रिपीट मोड वर आई ऐकवत होत्या. मितालीला सुद्धा तेच तेच ऐकून कंटाळा आलेला..

“अगं आई प्रत्येकासमोर किती कौतुक करशील? बस की आता…”

“कौतुक करण्या सारखीच तर आहे माझी लेक…”

“अगं मी एक दिवस आलीये, पण कायम तुझ्यासोबत असते त्या वहिनीचं कौतुक कधी ऐकलं नाही मी तुझ्या तोंडून..”

“तिचं कसलं कौतुक, तिचं कामच आहे ते..”
क्रमशः

Leave a Comment