एक हात ढलपी


(भाग १) (सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे)“किती काम करायचे बाई, थकून गेला जीव अगदी. पण कोणाला काही आहे का त्याचे? “ विनायकरावाच्याकडे बघत बघत वृंदाताई बोलत होत्या. विनायकराव ऐकून न ऐकल्या सारखे पेपर वाचत बसले होते. त्यांना वृंदाताईंच्या स्वभावाची आणि त्यांच्या बोलण्याची चांगली सवय झाली होती. वृंदाताईंच्या बोलण्याचा रोख आपल्याकडे वळतो आहे हे बघून विनायकराव उठून गॅलरीत गेले.संध्याकाळी सून परत कधी येते यांची त्या वाट पहात होत्या. “आल्यावर चांगली बघते तिच्याकडे. “ मनातल्या मनात सारखे घोकत होत्या. विशाखा त्यांची सून घरात आल्याबरोबर त्यांनी तोंडाचा पट्टा सुरू केला.
“ सासू थकली आहे, तिच वय झाले आहे, तुला काही आहे की नाही त्याचे? नुसती नट्टापट्टा करून निघून जातेस आणि वर नोकरी करते म्हणून तोरा बघा किती? “
“काय झाले आई, एवढी का चिडचिड करता आहात? “ विशाखा सौम्य आवाजात म्हणाली.“ काही न करता, सगळे काम माझ्यावर टाकून निघून जातेस आणि वर मलाच विचारतेस?” वृंदाताई आणखीनच उसळून म्हणाल्या. इतक्यात त्यांची मुलगी चारू घरात आली.“ आई, अग आत्ता कामावरून आलीय ना, जरा श्वास तरी घेऊ दे तिला. किती कटकट करतेस? “ चारू म्हणाली.“अग, सगळं काम टाकून जाते ही. सगळं काम माझ्यावर पडते. आता काय वय आहे का माझे काम करायचे? आणि वर नोकरी करते म्हणून हिचा तोरा. मला नाही होत असावा. आता अगदी आराम हवा आहे मला. “ वृंदाताई तणतणल्या.“आई तुला नक्की प्राॅब्लेम कसला आहे? विशाखा नोकरी करते, तिला बाहेर मान मिळतो हा की तुला काम पडतो हा? “ चारूने हसत हसत विचारले.“आता तूही माझीच चेष्टा कर. जातेच मी”. वृंदाताई आणखीच चिडल्या.
“नाही ग आई, जरा मजा केली. बस ना इथे, मीत तुझ्यासाठी आले ना? “ चारूनी त्यांना बसवलं“ विशाखा तू स्वयंपाकासाठी बाई का लावत नाहीस? म्हणजे तुलाही त्रास नको आणि आईलाही. “चारूने हळूच विशाखाला डोळा मारत विचारले.विशाखा काहीच बोलली नाही.वृंदाताई म्हणाल्या “ करायचीच काय आहे बाई? इन मीन चार माणसे घरात. आम्ही दोघे आणि ही दोघे. असे असते तरी काय काम? ““ तरीही तुला इतक काम पडतं? “ चारू.“विशाखा तू काहीच करत नाहीस का? अशी कशी ग तू? इथे माझ्या ऐवजी तुझी आई असती तर केले असतेस ना? माझी आई बिचारी, तिला एवढी राबवतेस तू” चारू विशाखाकडे नाटकीपणाने बघत म्हणाली.“ नाही ग चारू. मला जमेल ना तेवढे सगळे करून जाते मी. अगदी कुकरमध्ये भात ही ठेवून जाते. फक्त गॅस लावायचा असतो. खूप गडबड होते ग सकाळी. त्यात तुमच्या बंधूराज आहेतच, त्यांना सगळे हातात लागते. फक्त पूजा तेवढी नाही जमत मला. आणि मिटींग असेल तर मात्र नाईलाज असतो माझा. मला नेहमीपेक्षा तासभर आधी घरातून निघावे लागतेच. आणि दोन बस बदलून वेळ लागतो जायला ऑफिसला. “ विशाखा आपले म्हणणे सांगू लागली. चारूने खुणेने तिला “गप बस, मला माहिती आहे. “ असे सांगितले. इतक्यात विशाखाचा नवरा वरूण आणि विनायकराव दोघेही घरी आले. विशाखा सगळ्यांसाठी खायला करायला स्वयंपाकघरात गेली. भाऊ, बहीण, आई वडीलांच्या गप्पा सुरू झाल्या.खाता खाता जोरात हशा पिकला होता. वृंदाताई ही त्यात सहभागी झाल्या होत्या. चारू बर्याच दिवसांनी आल्यामुळे घरात वातावरण अगदी छान होते. खाणे झाल्यावर विशाखा चहा करायला गेली. आणि तिच्या पाठोपाठ चारू ही आत आली.“विशाखा तू घाबरून जाऊ नकोस ग. आईची सवयच आहे. उगीच चिडचिड करत रहायची. काही होत नाही चार कामे केली तर. करू देत तिला. तिची तब्येत ही चांगली राहिल आणि तिचा वेळ ही चांगला जाईल. “ बोलता बोलता चारूने खाण्याच्या ताटल्या विसळल्या आणि चहासाठी कपबशा ही घेतल्या. “असू देत ग. “ विशाखा म्हणाली तरी तिने केलेच. दोघीं चहा घेऊन बाहेर आल्या.क्रमशः©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

(भाग २) (सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे)दोघी चहा घेऊन बाहेर आल्या आणि वृंदाताईंनी परत बडबड सुरू केली. “ कधी नव्हे आलीय चारू आणि तू तिलाही कामाला लावले? काय ग विशाखा हे? बघ वरूण तुझी बायको, तुझ्या आईवर काम टाकून जातेच आता, चारू आलीय किती दिवसांनी तर तिलाही लावले कामाला. ““ आई, “ चारू जरा जोरातच म्हणाली. “ अग चहा आणि खाणे मी नाही केले, विशाखानीच केलयं. आणि दोन कपबशा बाहेर आणल्या म्हणजे काही काम होत नाही. ‘
“ वृंदा, सारखी कसली ग ओरडत असतेस विशाखाला? बिचारी दमून येते तरी दोन्ही वेळेला ताजा स्वयंपाक करते. तुझी आवड निवड बघते. तुझ्या सगळ्या आज्ञा पाळते. आणखी काय करायला हवं तिने? “ विनायकराव देखील सुनेची बाजू घेत आहेत हे बघून वृंदाताईंना कसेकसे झाले.
“ तुम्हांला माहिती तरी असते का किती काम असतं ते? उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला. “ वृंदाताई फणकारल्या. आता ह्या दोघांचे भांडण लागणार हे लक्षात येऊन वरूण आईला म्हणाला, “ आई खरचं ग खूप काम असतं. सांग बघू काय काय काम लावते ही तुला? ““ काय सांगू बाबा, सकाळी उठल्यावर आधी तोंड धुणे, मग चहा घ्यायचा, मला बाबा गरम गरम चहा लागतो. मग स्वतःची वेणी घालायची, अंघोळ करायची. जरा पावडर कुंकू होईपर्यंत विशाखा नाष्टा देते. मग नाष्टा झाला की देवाची पूजा करायची, पोथी वाचायची. ही केव्हाच निघून जाते कामाला. बाबाच कुकर खाली गॅस लावतात. आणि मग भाजी आमटी गरम करून मी वाढते जेवायला. मग मागचे परत मलाच आचरावे लागते. तो पर्यंत भीमाबाई येते कामाला, तिच्या मागे मागे फिरावे लागते. पेपर वाचता वाचता जरा कुठे डोळा लागला की तुमच्या बाबांना चहा लागतो. दिवसभर नुसती मर मर मरते, पण तुझे बाबा बघ एकदा. थोडे तरी काही वाटते का त्यांना बायको बद्दल? “ असे म्हणून वृंदाताईंनी डोळ्याला पदर लावला आणि चारू, वरूण आणि विनायकराव एकमेकांना टाळ्या देऊन हसू लागले. विनायकराव पटकन म्हणाले, “ एक हात लाकूड आणि सात हात ढलपी. ““ आई अगं तू काय काम करतेस? अंघोळ करणे, वेणीफणी करणे ही काय कामे झाली का? ते तर स्वतःचे आवरणे झाले. तू पूजा कर असे तुला कुणी सांगितले आहे का? पोथी वाचायची जबरदस्ती केली आहे का? तू तुझ्या आवडीने पूजा करतेस, मग त्याचा तुला त्रास कसा होतो? उलट मन प्रसन्न व्हायला हवे ना? कूकर सुद्धा बाबाच लावतात म्हणतेस, मग तुला असे काय काम पडते? फक्त मागचे आवरतेस ना. आणि भिमाबाईंच्या मागे फिरण्याऐवजी लवकर झोप म्हणजे तुला मिळेल विश्रांती. “ चारू आईला समजवणीच्या सुरात म्हणाली. “ भिमाबाईंच्या मागे मागे फिरायची काय गरज आहे? इतकी वर्षे त्या कामाला आहेत आपल्याकडे. “
“अग चारू, त्यांच्या मागे मागे नाही फिराव लागतं, ही फिरते. त्याशिवाय गावच्या बातम्या कशा कळणार हिला? “ विनायकराव त्यांची चेष्टा करत म्हणाले.
“आई तू जेवढे काम करतेस ना, त्याच्यापेक्षा गाजावाजा जास्त करतेस. त्यामुळे तुला सगळे नावचं ठेवतात अगं, आणि असे बघ आज विशाखा तुझ्या प्रत्येक शब्दाला मान देते आहे, तुझे सगळे ऐकून घेते आहे, पण तू अशीच करत राहिलीस ती तरी तुला विचारेल का? प्रेम दोन्ही कडून असते. ते आधी द्यावे लागते तरच मिळते. आई तू खूप प्रेमळ आहेस, पण तो प्रेमळपणा तुझ्या सुनेला ही दाखव. तिला ही तुझे प्रेम मिळू दे. “ चारू बोलत होती. वृंदाताईंना आपली चूक उमगली. त्या सुने जवळ जाऊन उभ्या राहिल्या आणि न बोलता दोघी सासवासुना एकमेकाच्या मिठीत शिरल्या.समाप्त

5 thoughts on “एक हात ढलपी”

 1. Hello there! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m trying to get my
  blog to rank for some targeted keywords but I’m not seeing
  very good success. If you know of any please share. Thanks!
  You can read similar art here: Sklep internetowy

  Reply
 2. Good day! Do you know if they make any plugins to assist with SEO?
  I’m trying to get my site to rank for some targeted keywords
  but I’m not seeing very good gains. If you know of
  any please share. Thanks! I saw similar text here: GSA List

  Reply

Leave a Comment