एक इजाजत भाग 5 ©वृंदा

लहान होती गं ती. तिला काय कळायचं? आई आमच्या वाट्याला जास्त आलीच नाही; मात्र आजीने आमच्यावर भरभरून प्रेम केले. त्यात गौरी माझ्यापेक्षा तीन वर्षाने लहान. मग तिच्यावर तर प्रेमाची नुसती लयलूट असायची. जोवर तिच्या वाट्याला एक सोबतीण मिळाली नाही, तोवर आजीचा पदर तिने कधी सोडलाच नाही आणि एक दिवस आमच्या अंगणात ‘ती’चा प्रवेश झाला.ती.. रत्ना! गौरीची सखी.”__रत्ना!तिच्या आठवणीने प्रकाशचे डोळे उगाचच लकाकले. त्या लकाकीपुढे सात-आठ वर्षाची एक चिमूरडी उभी राहिली आणि आठवली ती पहिल्यांदा भेटलेली श्रावण महिन्यातील ती रात्र!आकाशात चाललेला विजांचा गडगडाट आणि धो-धो बरसणाऱ्या त्या श्रावणसरी. एरवी हवाहवासा वाटणारा श्रावणातील पाऊस त्या रात्री मात्र अंगावर भीतीने शहारे निर्माण करत होता. आज दिवसभरात एकदाही पावसाने थेंबभरसुद्धा हजेरी लावली नव्हती आणि रात्री मात्र अचानक रौद्र रूपात तो प्रकट झाला होता.
“ए पोरांनो, आत या रे. मेला हा पाऊस थांबायचं नाव घेईन तर शपथ!” वत्सलाबाई प्रकाश आणि गौरीला आत बोलावत म्हणाल्या.
“आजी गं, आज काय देव रागावला होय? मग का गं तो इतका पाऊस पाडतोय? या विजांच्या आवाजाने मला तर भीतीच वाटतेय.” देवघरात जपमाळेचा जप करून ती ठेवत असताना गौरी घाबरून आजीच्या पदरात दडली.“ओ गौराबाई, हिरवे पाटलांच्या नात आहात ना तुम्ही? मग असं घाबरून चालायचं नसतं.” लाकडी आरामखुर्चीवर बसलेले आबासाहेब मिशीला पीळ देत म्हणाले.“पण आबा, वाटतीये मला भीती. मग मी काय करू?” ती आजीला अधिकच चिकटली.“अगं.. अशी दडतेस काय? देवाला नमस्कार कर आणि म्हण की बाप्पा, माझी भीती पार घालवून टाक.” समईतील वात सरळ करत वत्सलाबाईं.“गौरा, भीतीवर मात करायला स्वतःच शिकायचं असतं. तुला आता भीती वाटतेय ना? मग उठा आणि वाड्याचं दार तू स्वतः बंद करून ये.”
“आबा, नको. बाहेर विजा कडाडत आहेत. माझ्या अंगावर पडली तर?” ती घाबरत म्हणाली.“आणि उघड्या दारातून आत येऊन इथे सगळ्यांच्या अंगावर पडली तर? म्हणून म्हणतोय, जा दार लावून घ्या.” आबा ऐकणाऱ्यातील थोडीच होते?“आबा..”“गौराईऽऽ”आबांच्या शब्दातील ती जरब.. गौरीला त्यांचा आदेश नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. एरवी पहारेकऱ्यासारखा नेहमी दारावर उभा असलेला शिरपा या आडव्यातिडव्या पडणाऱ्या पावसाने वाड्यामागच्या त्याच्या झोपडीत गेला होता.गौरी जरा भितभीतच दारापाशी गेली. अस्सल सागवानापासून तयार करण्यात आलेले ते मजबूत दार ओढण्याचा ती प्रयत्न करू लागली आणि त्याचवेळी बाहेर लख्खकन वीज चमकली.“आईऽऽ”गौरीची किंकाळी कानावर पडली तसा प्रकाश धावत तिच्याजवळ गेला.“गौरी..”“दादा, तिथे कोणीतरी आहे.” धापा टाकत ती कशीबशी सांगण्याचा प्रयत्न करत होती.“कोण? कुठे? इथे कोणीच नाहीये.” तिला धीर देण्याचा प्रयत्न करत तो दाराजवळ जायला निघाला तसे गौरीने हात पकडून त्याला थांबवले.“दादा, तू जाऊ नकोस. तिथे ‘ती’ आहे.”“ती? ती म्हणजे कोण?”“भ.. भ.. भूत.” तिचा श्वास वरखाली होत होता आणि इकडे प्रकाश मोठ्याने हसायला लागला.“ती भूत कशी असेल? ‘तो’ भूत असेल. ‘ती’ तर भूतनी असेल.” प्रकाश हसत म्हणाला तेवढ्यात त्याच्या पाठीवर एक धपाटा पडला.
“भूत भूत करून तिला कशाला रे घाबरवतोस? चला जेवायला या. मी पानं वाढायला घेतेय. तुम्ही दोघं मला मदत करा.” इंदुताई तिथे येत म्हणाल्या.त्या बोलायचा अवकाश की आणखी एक वीज कडाडली आणि तिच्या उजेडात एक धूसर चेहरा प्रकाशला दिसला.“दादा, बघितलंस? ती तिथेच आहे आणि तिकडे दूर दुसरे भूत सुद्धा आहेत. आबाऽऽ मला वाचवा.” भेदरलेली गौरी धावतच आबांना जाऊन बिलगली.“मघापासून दोघांचं काय भूतभूत चाललंय? सुनबाई, जरा कंदीलाची ज्योत मोठी करा आणि बघा काय ते. गौरा तू पण चल. आमची गौराई अशी भित्री भागुबाई असलेली मला चालणार नाही.” एका हाताने धोतर सावरत आणि दुसऱ्या हाताने गौरीला जरासे ओढतच आबा बाहेरच्या खोलीत यायला निघाले.बाजूला असलेला कंदील हातात घेत इंदूताईंनी त्याची वात वर केली आणि धिटाईने दरवाजाच्या मध्यात उभे राहत अंगणातील अंधारात नजर टाकली. एव्हाना वत्सलाताई आणि अण्णादेखील छपरात आले होते.“कोण आहे रे?” इंदुताईच्या हातचा कंदील स्वतःच्या हातात घेत अण्णांनी करड्या आवाजात विचारले.“मालक, मी हाये.. रत्ना!” एक बारीक आवाज किणकीणला.अगदी फुटभर अंतरावर ती उभी होती. पावसात भिजल्याने नखशिखांत ओलीचिंब झालेली एक चिमूरडी. ओल्या केसातून नाजूक, गोऱ्या चेहऱ्यावर निथळणारे पाण्याचे थेंब. तिच्या अंगाला भिजल्यामुळे घट्ट बसलेले काळ्या रंगाचे परकर पोलके.थंडीने कुडकूडत ती दारात उभी होती. डोळे मात्र प्रचंड बोलके होते. कसली तरी आस घेऊन ती एकेकाच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत होती.
“कोण आहेस तू? आणि एवढ्या पावसात इथे काय करते आहेस?”तिच्या बोलक्या डोळ्यात डोकावत प्रकाशने प्रश्न केला.“मी रत्ना हाय जी.” तिचे तेच उत्तर.“प्रकाश, तू थांब जरा. मला विचारू दे. ए मुली, इथे काय करतेस? काय हवंय तुला? चोरी करायला आलीस का?” अण्णांच्या आवाजाने नि एकावेळी इतक्या साऱ्या प्रश्नांनी ती बावरली.“मी चोर नाय जी. मी रत्ना..” हुंदका आवरून बोलताना तिने एक नजर प्रकाशकडे टाकली आणि तिची अगतिकता बघून त्याचेही डोळे पाणावले.“अण्णा, लहान लेकरू आहे. जरा प्रेमानं घ्या की. सूनबाई, तुम्ही विचारा जरा.” जे प्रकाश बोलू पाहत होता, तेच शब्द आबांच्या मुखातून बाहेर पडले.“रत्ना, बाळा अशी आडोश्याला उभी रहा आणि आम्हाला सांग बघू, तू कुठून आली आहेस? कुणासोबत आहेस?” इंदूताईंच्या शब्दाने जणू तिला तरतरी आली. नुकतेच रडू फुटू पाहणाऱ्या डोळ्यात आशेचा किरण डोकावला.“मी एकटी नाय. माझे आईबाबा अन् धाकला भाऊ हाय. त्ये तिथं आडोश्याला उभी हाईत. आमी लै दुरून आलोय. तिकडं रानात तंबू ठोकला व्हता. वादळानं पार दैना झाली. कोणीतरी बोललं का हिरवेपाटील मोठया मनाचा माणूस हाय. मदत करेल. म्हून आम्ही इकडे आलोय.” इंदूताईंच्या प्रेमळ शब्दाने रत्ना पटापट सांगायला लागली. बोलायला तशी चुणचुणीत होती.“पण तुझे आईबाबा..ते तर दिसत नाहीत? कुठं आहेत ते?” अण्णांचा अजूनही तिच्यावर विश्वास बसत नव्हता.“भाऊ धाकला हाये ना. त्याला चालता येत नाही म्हणून बाबा त्याला घेऊन हाईत आणि आईच्या पोटात बाळ आहे तर मीच तिला तिथं थांबवलं नि एकलीच हिथं आले.” तिने फाटकाजवळच्या ओसरीकडे बोट दाखवत म्हटले.शहानिशा करायला म्हणून अण्णांनी कंदील पुन्हा उंच पकडला. ओसरीच्या कडेला एक महिला आणि एका पुरुषाची धूसर आकृती जाणवली. त्या पुरुषाच्या खांद्यावर एक बाळ होते खरे. म्हणजे रत्ना खोटी बोलत नव्हती.“ए बाळा, तू आधी आत ये बघू. बघ कशी ओली झालीहेस. तुला मी कापडं देते ते बदलून घे.” इंदुताई कळवळून म्हणाल्या.“बाई, कापडं नगं. थोडं खायला मिळेल काय? माझा भाऊ भुकेला हाय. भूक लागली की लै आकांत करतो. त्याच्यासाठी थोडं अन्न मिळल?” इंदूताईंना खरं तर भरून आले होते. त्यांनी आत्ताच तर मुलांना जेवणासाठी हाका दिल्या होत्या आणि ही पोर त्यांच्याकडे अन्नासाठी याचना करत होती.त्यांनी एकदा रत्नाकडे आणि मग आबांना बिलगून असलेल्या गौरीकडे नजर टाकली. दोघी जवळपास एकाच वयाच्या होत्या. एक सर्व सोईंनी युक्त अशा घरात राहूनही आजोबाच्या मिठीत सुरक्षितता शोधत होती आणि दुसरी सारं काही उध्वस्त होऊनही खंबीरपणे उभी राहत धाकट्या भावासाठी दोन घासाची सोय करु पाहत होती.“आबा, आपण हिला जेवण द्यायचं?” आबांच्या हाताला हात घासत गौरीने किलकिल्या नजरेने विचारले.“गौराई, तुम्हीच घाबरून हिला भूत म्हणालात ना? मग आता मदत करायची की नाही हे तुम्हीच ठरवा.”“हो. देऊयात ना. ही पूर्ण ओली झालीये तर हिला माझा ड्रेस पण देऊ. ए रत्ना, थांब हं. जाऊ नकोस. मी आलेच.” गौरी धावतच आतल्या खोलीत पळाली. तिला देण्यासाठी फ्रॉक शोधायचा होता ना?“गौरी, अगं हळूऽऽ” वत्सलाताई तिच्या मागे आत गेल्या.“अण्णा, तुम्ही मागच्या दारातून शिरपाला हाक द्या. हिच्या कुटुंबाला रात्रीपूरतं त्याच्या झोपडीत राहू दे म्हणा. सकाळचं मग सकाळी बघूया. सुनबाई तुम्ही यांच्या समद्यांच्या जेवणाच्या डब्याचे बघा.” आबासाहेबांनी पटापट आदेश सोडले.त्याची अंमलबजावणी करायला अण्णा आणि इंदूताई दोघेही पांगले. आबा छत्री घ्यायला आत गेले. तिथे आता फक्त दोनच व्यक्ती उरल्या होत्या. दाराच्या आत प्रकाश आणि दाराबाहेर रत्ना!एक दहा वर्षाचा हळवा जीव.. तर दुसरी बोलक्या डोळ्यांची सात-आठ वर्षांची कोवळी पोर!पुढील भाग लवकरच.:क्रमश:©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)साहित्यचोरी गुन्हा आहे.*

Leave a Comment