एक इजाजत भाग 16 ©वृंदा


एक इजाजत!भाग -१६

“कसला प्रयत्न?” चंपाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.“वही. तेरे दिल में मोहब्बत हैं की नफरत इस चीज के बारे में. जाते मी.” ज्या काळजीने शीलाआँटी आली होती, आता तेवढीच निर्धास्त होऊन ती परत गेली.कदाचित तिच्या प्रश्नाचे उत्तर तिलाच ठाऊक असावे…मोहब्बत की नफरत? या द्वन्द्वात मात्र चंपा अडकली होती.द्वन्द्व कसले? उत्तर तर तिलाही ठाऊक होते. ती कधीतरी प्रकाशचा द्वेष करू शकली असती काय? प्रेम म्हणजे काय हे कळायला लागल्यापासून त्याच्याविषयी केवळ एकच भावना तिच्या मनात उमलली होती आणि त्यापूर्वीही त्याच्यावर एक अधिकार होताच की. म्हणून तर तिने त्याला मागणी घातली होती.. लग्नाची!तिची लाडकी मनू जगात येण्यापूर्वीच देवाने तिला परत बोलावले होते. तेव्हापासून ती फारच खट्टू झाली होती. वच्छीचे आजारपण त्यात शरदची होणारी हेळसांड आणि तिच्यावर पडलेली जबाबदारी.. या साऱ्या फाफटपसाऱ्यात स्वतःसाठी वेळ मिळाला तर तिला प्रकाश आणि गौरीची आठवण यायची आणि सोबत शिक्षणाचीही.“बाबा, मी शाळेत जाऊ?” तिने खूप प्रयत्नाने गोविंदाला गळ घालण्याचा प्रयत्न केला.“रत्ने, शिकून काय करणार हाईस? आपल्यासाठी नसती गं शाळा. तू जाशील तर शऱ्याकडं कोण लक्ष देणार?” त्याच्या उत्तराने ती खट्टू झाली.“काका, येऊ द्या कि तिला शाळेत. मी तर जातेच ना?” अचानक बाहेरून आलेल्या गौरीचा आवाजाने रत्नाच्या मनात आशा निर्माण झाली.“गौराबाई, तुमची गोष्ट वेगळी आहे..”“काका, शिकू दे की तिला. गावातच शाळा आहे. पुस्तकांचाही प्रश्न नाही. शाळेतून पुस्तक मिळतात. अभ्यासात काही लागली तर मी मदत करेन. म्हणजे तुम्हाला तिचा अभ्यास घ्यावा लागणार नाही.” गोविंदाचे बोलणे थांबवत प्रकाशने युक्तिवाद केला.“प्रकाशदादा..”“टाकूया रत्नीला शाळंत.” इतका वेळ गप्प असलेली वच्छी गोविंदाला म्हणाली.“अगं पण..”“शऱ्यासाठी पोरीचं जीवन मला वाया नाही घालवायचं. अस्सल रत्नासारखी माझी लेक म्हणून तिचं नाव मी रत्ना ठेवलं. तिच्या इच्छा मारून तिला जगवलं तर मंग काय फायद्याचं? रत्नी शिकल, तिला वाटेल ते ती करील. आयबाप म्हणून आपण साथ नाही द्यायची तर मंग कोण तिची साथ देईल?”कधी नव्हे ते वच्छी गोविंदापुढे आपले म्हणणे मांडत होती. त्याला तिचे बोलणे पटले की नाही ते कळत नव्हते पण यावेळी बायकोचे ऐकावे असे त्याने ठरवले.“ठीक आहे. रत्ने तू शिकायचं म्हणतेस तर शिक. मी आडकाठी करणार नाही.” गोविंदाचा होकार कळताच त्या तिकडीला काय आनंद झाला होता. एकमेकांचे हात गुंफुन तिघेही फेर धरायला लागली._____“आबा, तुम्हाला ठाऊक आहे, रत्ना शाळेत येणार आहे.” रात्री जेवताना गौरी आबासाहेबांना आजचा किस्सा सांगत होती.“अरे वा! चांगलय की मग. गौराबाई तुम्हीच तिला शाळेत जायचा म्हणून तयार केले ना?” आबासाहेब कौतुकाने विचारत होते.“मी आणि दादा दोघांनीही. उलट माझ्यापेक्षा दादाने तिला छान समजावून सांगितलं. शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं.”“असं आहे होय? भारीच की.”“आबा, रत्नाला ना डॉक्टर व्हायचे आहे. शरदला बरं करायचे आहे. ती डॉक्टर असती तर तिने त्यांच्या मनूला देवबाप्पाकडे जाण्यापासून वाचवू शकली असती ना हो?” बोलताबोलता तिचा चेहरा लहानसा झाला.“गौरा, ही मनू कोण गं?” वत्सलाआजींनी कुतूहलाने विचारले.“तिच्या आईच्या पोटात बाळ होतं ना, तिचं नाव मनू होतं. रत्नाला ती फार आवडायची. ती बाहेर आली की आम्हीही तिच्याशी खेळणार होतो; पण त्या पूर्वीच देवबाप्पाने तिला त्याच्याकडे बोलावून घेतले.” ती उदासवाणे म्हणाली.“गौरी, डॉक्टर होणं काही साधी गोष्ट नाही. तुझी ती रत्ना कशी काय डॉक्टर होणार गं? त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, पैसा खर्च करावा लागतो. कुठून आणणार आहे ती एवढा पैसा?” अण्णासाहेबांनी मुद्दाम डिवचले.“अण्णा, मग आपण तिला मदत करू की. आपल्याकडे तर खूप सारा पैसा आहे. हो ना आबा?”“आबांच्या लाडक्या गौराबाई, पैसा असा झाडाला लागलेला नसतो. उठसुठ कोणालाही वाटत बसायला.” अण्णासाहेब.“अण्णा, अरे लहान आहे ती. तिला काय कळतंय? तू असा बोलायला लागलाय की जशी ती पोर उद्याच डॉक्टर होतेय की काय? आधी तिला पहिल्या वर्गात दाखल करावे लागेल. ते डॉक्टर वगैरे तर फार लांब राहिलं.” आबासाहेब अण्णांना समजवत म्हणाले…नाही म्हणता म्हणता रत्नाची शाळा सुरु झाली. पाऊस वारा सोबतीला होताच. त्याला बरोबर हुलकावणी देत ती बांधावरून धावत शाळेत पोहचू लागली. हळूहळू पाटीवर अक्षर गिरवू लागली.“अक्षर कशी वळणदार काढायची. कोणी पाहिलं की एका नजरेत ती अक्षरं त्यांना वाचता यायला हवीत. कळलं ना? आता तू लिहून दाखव हं.” प्रकाश तिला सांगत होता.दिवाळीची शाळेला सुट्टी लागली होती. तेव्हा ती तिच्याकडून शब्द गिरवून घेत होता.“काय लिहिलेस बघू?”मघापासून ती पाठीवर काही अक्षर काढत होती आणि मिटवत होती पण ती काय लिहितेय त्याला कळत नव्हतं.“बघू तरी.” शेवटी त्याने पाटी हिसकावून घेतली.‘म-नू’तिने सुंदर अक्षरात पाठीभर किती तरी वेळा ते नाव गिरवले होते.“तुला मनूची आठवण येते?” त्याने मृदू स्वरात विचारले.“हूं.” डबडबलेल्या डोळ्यांनी तिचा होकार.“असं नाव लिहून ती थोडीच परत येणार आहे?”“मग कशी येईल?”तिच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावे त्याला सुचेना.“अं..तुझं लग्न झाल्यावर तुला बाळ होईल ना तेव्हा तिचं नाव मनू ठेवशील. चालेल?” तोडगा काढल्याच्या आनंदाने त्याने म्हटले.“चालेल.” ती मान हलवून म्हणाली.“ए प्रकाश, तू माझ्याशी लगीन करशील?” तिने अचानक प्रश्न केला.“काय?”“हां, म्हणजे मी गरीब आहे तर माझ्याशी कोण लगीन करणार ना? म्हणून विचारलं. तुला चालेल ना?” ती टपोरे डोळे त्याच्यावर रोखत म्हणाली.“चालेल की.” थोडा विचार करून त्याने उत्तर दिले.“प्रॉमिस?”“हं?”“ते त्या दिवशी गौरी प्रॉमिस हाच शब्द म्हनली होती ना?” डोके खाजवत ती आठवायचा प्रयत्न करून म्हणाली.“हो, प्रॉमिस आणि म्हनली नाही तर म्हणाली म्हणायचं असतं.” तिच्या हातावर हात ठेवून तो म्हणाला तेव्हा तिचा चेहरा किती उजळला होता._______“किती निरागस होती रत्ना! गरिबीमुळे कोणी लग्न करणार नाही असं वाटून तिने मला लग्नासाठी विचारले. तेही केवळ तिच्या मनुसाठी.” स्वतःशी बोलत प्रकाश मंद हसला.“बाबा, एकटेच काय बोलताय? कंपनी द्यायला मी आहे की. मला सुद्धा सांगा ना.” तो वळला तसे त्याला हातात कॉफीचे मग घेऊन मनस्वी उभी दिसली.“मनू? तू झोपली नाहीस?”“अहं, झोपच येत नव्हती आणि मला ठाऊक होतं की तुम्हालाही काही झोप आलेली नाहीये. म्हणून मग मी दोघांसाठी कॉफी घेऊन आले.” त्याच्या हाती एक मग थोपवत ती म्हणाली.“मनू तू कसली मनकवडी आहेस गं. मला आता कॉफीची गरज होतीच. थॅंक्स.” एक घोट घेत तो म्हणाला.“मनकवडी आहे म्हणून तर तुमची मनू आहे ना? पण बाबा तुम्ही तुमच्या छोट्याशा रत्नाच्या मनुबद्दल काहीच सांगितलं नाहीत.” ती नाटकीपणे म्हणाली.“मनू..”“बाबा, प्लीज नाही म्हणू नका ना हो. तुम्हाला माहितीये की ते ऐकल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि मलाही माहितीये की ते सांगितल्याशिवाय तुम्हाला झोप येणार नाही. करेक्ट ना?” त्याचा मुड मघापेक्षा बराच मवाळ झाल्याचे जाणून मनस्वीने परत तगादा सुरु केला.“हम्म. तू हट्ट नाही सोडायचीस. ये इकडे.” तिच्यापुढे मान तुकवत प्रकाश तिला जवळ बोलवत म्हणाला.“ओऽ थँक यू बाबा.” ती तुरुतुरु चालत त्याच्याजवळ आली. खरं तर त्याला ती मिठीच मारणार होती; पण प्रकाशने तिला अडवले.“वेट, वेट.. मिठी नको. इथे उभी रहा आणि ऐक.” तिला खिडकीजवळ उभी करत तो म्हणाला.“काय ऐकायचंय?” तिने आश्चर्याने विचारले.“तुला काय ऐकू येतंय?” त्याने तिला प्रतिप्रश्न केला.“बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज?” तिने कपाळावर आठी आणत त्याच्याकडे पाहिले.“हम्म, पावसाचा आवाज. वर्ष सरलीत पण हा पाऊस मनातून कधी गेलाच नाही गं. पाऊस एकच पण त्याची किती विविध रूपं! प्रत्येक नक्षत्रातील वेगळे रूप. कधी शांत, सयंत तर कधी रौद्र!तुला सांगू रत्ना मला कशी वाटते?“कशी?”जेव्हा पावसाची पहिली सर कोसळून ही धरती तृप्त होते आणि त्या तृप्ततेतून जो मृदगंध दरवळतो तो सुवासिक गंध म्हणजे रत्ना!”“वॉव!”“तुला माहितीये, रत्नाने मला लग्नासाठी विचारले होते. विचार तरी कधी ते.”“कधी?”“ती सात वर्षांची असताना.”“व्हॉट? म्हणजे सिरीयसली? तेव्हापासून तुम्ही प्रेमात होतात?’“नाही गं.” तो हसला.“तिच्या मनुसाठी. तिला मी म्हणालो होतो की लग्न झाल्यावर तिला जे बाळ होईल त्याचं नाव मनू ठेव. त्यावर तिने मलाच लग्नासाठी विचारले होते..” त्याने मनू म्हणजे कोण? आणि रत्नाचा तिच्यावर किती जीव होता हे तिला सांगितले.“अच्छा! म्हणून मी माझं नाव सांगितल्याबरोबर त्यांनी तुमच्याबद्दल, तुमच्या लग्नाबद्दल विचारलं. माझ्यात त्यांना त्यांची मनू दिसली असेल का हो?” तिचा हळव्या स्वरातील हळवा प्रश्न!:क्रमश:पुढील भाग लवकरच.©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)*साहित्यचोरी गुन्हा आहे.******

Leave a Comment