उपकाराचं ओझं-3 अंतिम

रात्री जेवण झालं आणि दुसऱ्या क्षणाला तो झोपी गेला..

आज त्याला झोप खूप महत्त्वाची होती,

अचानक रात्री 1 वाजता त्याच्या मित्राचा फोन,

“अरे माझे नातेवाईक लांबून आले आहेत स्टेशनवर, मी नेमका बाहेरगावी आहे..तू त्यांना घेऊन घरी सोड ना..”

मित्र डोळे चोळत उठला आणि तयार झाला,

उपकार केलेत त्यांनी, मग एवढं तर करायलाच हवं..

नाही म्हणूच शकत नव्हता,

मित्राचं आणि त्याच्या बायकोचं हे वागणं वाढतच चाललं होतं,

अगदी किरकोळ कामांसाठी ते या दोघांना कामाला लावत,

आपण पैसे दिलेत, उपकार केलेत म्हणून हवं तसं वागवून घेत होते,

एकदा त्याची बायको तापाने फणफणली होती, त्याला त्या दिवशी सुट्टी होती… तो बायकोजवळ बसून होता..

तेवढ्यात मित्राचा फोन..

“अरे आम्ही मुवि ला जातोय, थोडावेळ मिनूला सोडू का तिकडे? आणि संध्याकाळी आमच्याकडे पाहुणे येतात खूप..वहिनी येतील का मदतीला?”

मित्राला राग आला, पण संतापून कसं चालेल? उपकार केलेत त्यांनी…पण तरीही त्याने नम्रपणे सांगितलं..

“अरे हिला खूप ताप आलाय, बरं नाहीये अजिबात..”

“हो का? बरं संध्याकाळ पर्यंत बरं वाटेल का? खूप पाहुणे आहेत रे…हिला नाही शक्य एवढ्या सर्वांचा स्वयंपाक..”

“सांगतो…” राग आवरत त्याने एवढं बोलून फोन ठेऊन दिला..

कधी कधी संकटांपेक्षा झालेले उपकार जास्त डोईजड होतात,

दुसऱ्या दिवशी गावाकडून फोन आला तसा तो उचलायला त्याचे हात थरथरू लागले,

“दादा, आपल्या जमिनीचे काही पैसे आलेत..मी तुझ्या खात्यावर टाकून देतो…हॉस्पिटलसाठी बराच खर्च केलास तू…”

हे ऐकून त्याच्या जीवात जीव आला, मन शांत झालं, मोठा दिलासा मिळाला..संकटात परीक्षा बघणारा तोच आणि त्यातून बाहेर काढणारा तोच, देवावरची त्याची श्रद्धा दृढ झाली…

खात्यावर बरेच पैसे आले होते, खर्च झालेला त्याहून जास्त पैसे होते..

तो आधी बँकेत गेला, मित्राने जेवढी रक्कम दिलेली तेवढी काढून आणली, मित्राच्या हातात त्याने रक्कम टेकवली तसं त्याच्या मनावरचं ओझं कमी झालं…

“अरे इतकी काय घाई होती? दिले असतेस की आरामात..”

तो फक्त हसला आणि तिथून निघून गेला..

घरी जाताना किराणा, भाजीपाला, मुलाला शाळेचं साहित्य, आजचं वर्तमानपत्र, गहाण ठेवलेले दागिने, बायकोला गजरा आणि मुलाला खाऊ घेऊन गेला..

आज तो उपकारातून मुक्त झाला होता,

घरी गेल्यावर बायकोला सगळं सांगितलं, बायकोच्या डोळ्यात आनंदाश्रू होते,

काही वेळातच मित्राच्या बायकोचा फोन आला,

“वहिनी बरं वाटतंय का? आज संध्याकाळी यायला जमेल का?”

त्याने बायकोच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाला,

“सॉरी वहिनी, आज नाही जमणार..सध्या आमचीही धावपळ चालू असते त्यामुळे आम्हाला यापुढे जमेल असं वाटत नाही..”

मित्राची बायको भडकली, तिला अजून माहीत नव्हतं की तिच्या नवऱ्याने केलेले उपकार आजच यांनी फेडलेत…

“नाही म्हणायला काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? अहो तुम्ही कंगाल झालेलात तेव्हा माझ्या नवऱ्याने तारलं तुम्हाला..काय बाई ! आजकाल लोकं उपकार सुद्धा विसरतात..”

“वहिनी तुमचे उपकार आजच फेडलेत, ठेवतो फोन..”

एका मोठ्या जंजाळातून दोघांची सुटका झाली होती,

यापुढे कुणाची मदत घेताना दहा वेळा विचार करायचा असं दोघांनी ठरवलं…

यातून 3 तात्पर्य,

कुणावर उपकार करत असाल तर वाटेल तशी परतफेड करून घेऊ नये,

कुणाचे उपकार घ्यावे लागतील अशी वेळच येऊ न देणे,

संकटं आली तरी देव मार्ग दाखवतोच यावर विश्वास असू देणे…

3 thoughts on “उपकाराचं ओझं-3 अंतिम”

Leave a Comment