उद्वेग-2

त्यात तिचं मेनोपॉज, हार्मोनचे बदल आणि वाढत्या वयानुसार लागलेली दुखणी, यात तिला जराही भावनिक धक्का सहन व्हायचा नाही,

मुलगा नोकरीला लागला, आर्थिक सुबत्ता आली..आता सगळं ठीक होतं, पण ती मागचं आठवून त्रागा का करायची हेच वडिलांना कळत नव्हतं..

आत्या येऊन गेली, तिची भरपूर बोळवण झाली, आईने भरपूर लाड केले आत्याचे…आईचं आत्याशी वैर नव्हतं..छान दिवस गेले, आत्या परत गेली..

वडिलांना तिच्या वागण्याचा अंदाजच येईना,

काल साडीबद्दल त्रागा केला,

आज आत्याशी प्रेमाने वागली, उद्या दुसरंच काही काढेल…परत त्रागा करणार…

त्यांना जी भीती होती तेच पुन्हा झालं..

लेकासाठी मुलगी शोधायला सुरवात केली,

एक नात्यातलीच मुलगी त्यांना पसंत पडली,

मुलगी चांगली शिकलेली, संस्कारी होती. मुलाला हवी तशी..दिसायलाही सुंदर..

आता कुटुंब पूर्ण होणार, आपली जबाबदारी संपणार या गोष्टीने वडील सुखावले होते,

आता हे लग्न निर्विघ्नपणे पार पडावं एवढीच त्यांची इच्छा होती..

एकेक कार्यक्रम सुरू झाले,

साखरपुडा आणि लग्नाची तारीख पक्की झाली,

त्या मुलीचा वाढदिवस होता, आईने स्वतःहून सांगितलं की तिला छानसं काहीतरी गिफ्ट दे,

मुलाने ठरवलं, होणाऱ्या बायकोला एक मोबाईल गिफ्ट करायचा..

तो ऑनलाइन मोबाईल बघत असतानाच वडील आले, त्यांनी विचारलं काय बघतोय?

सीमासाठी मोबाईल बघतोय, तिचा वाढदिवस आहे ना..तो जरा लाजतच बोलला..

वडील हसले,

म्हणाले,

“अरे मोबाईलने काय होतंय, तिला एक छानसा ड्रेस आणि एखादा दागिना करून दे..”

बस्स, एवढं बोलायचा उशीर..आणि आईचा तोंडाचा पट्टा सुरू झाला..

“हो हो, तुझ्या वडिलांना विचार, त्यांनी काय काय घेऊन दिलेलं मला..लग्नानंतर पहिला वाढदिवस होता माझा. गिफ्ट तर दूरच, मलाच आठवण करून द्यावी लागलेली त्यांना..बरं आठवण करून दिली तर तेव्हा तरी किमान काहीतरी करावं ना..लगेच त्यांच्या मावसभावाचा फोन..ते सगळे जेवायला येणारेत..सगळं सोडून कामाला लागले, राब राब राबवून घेतलेलं मला त्या दिवशी..वाढदिवस गेला चुलीत”

वडिलांनी हे ऐकलं आणि त्यांना चीड आली, ” काय नेहमी जुन्या गोष्टी उकरून काढतेस गं? सगळं चांगलं चालू आहे बघवत नाही का तुला? प्रत्येक गोष्टीत खडा टाकायलाच हवा का..”

आईच्या डोळ्यात राग, संताप आणि अश्रू एकाच वेळी आले, ती तावातावाने तिथून निघून गेली..

वडील डोक्याला हात लावून बसले, मुलाने मोबाईल बाजूला ठेवला आणि म्हणाला,

“जाऊद्या बाबा..त्रास करून घेऊ नका”

“आपण आईला एखाद्या डॉक्टरकडे दाखवायचं का? कारण हे रोज वाढतच चाललंय, आपण करतो सहन पण येणारी सून..तिला पण हा त्रास होणार..”

मुलगा हसला, म्हणाला..

“बाबा एक विचारू? खरं खरं सांगा..”

“काय?”

“आई जेव्हा जेव्हा जुन्या गोष्टी उकरून काढते तेव्हा तुम्ही दुर्लक्ष करतात, तिथून निघून जातात…असं का?”

“मग दुसरं काय करणार? ते ऐकून स्वतःचं मानसिक स्वास्थ्य खराब का करून घेऊ?”

“बाबा, राग येऊ देऊ नका..पण खरं कारण सांगतो..आई जे जे बोलतेय ते 100% खरं आहे हे तुम्हाला माहीत असतं. आईला आपल्या कोणत्या वागण्याचा कसा त्रास झाला हेही तुम्हाला माहित असतं.. आपण चुकीचं वागलो, अन्याय केला हे तुम्हाला कुठेतरी खुपतं.. पण माणसाला आपल्या चुका आठवायच्या नसतात..आपण केलेला अन्याय ऐकायचा नसतो..आपण चुकीचे वागलो याची खंत असूनही ते कबूल करायचं नसतं.. म्हणून तुम्ही या सर्व गोष्टी दुर्लक्ष करत आहात..”
*****

34 thoughts on “उद्वेग-2”

  1. खूपच मोजक्या शब्दांत स्त्री भावना व्यक्त केल्या आहेत…मी स्वतः ची भूमिका समोर घडताना बघत होते…..घरोघरी मातीच्या चुली ….अगदी खरी म्हण आहे…

    Reply

Leave a Comment