आवाज-2

एका कॅफेमध्ये ओळख झाली होती,

ती तिच्या मैत्रिणीची वाट बघत होती,

आणि तो त्याच्या मित्राची,

एवढ्यात बाहेर धो धो पाऊस कोसळू लागला,

दोघांच्या मित्रांनी येणार नाही असं सांगितलं,

तिथे ते दोघे, एकटेच आपापल्या टेबलापाशी बसलेले,

त्यांच्या नजरा एकमेकांवर खिळल्या,

एका नजरेत प्रेम झालं,

ओळख झाली,

ती वाढली,

तो स्वच्छंद, मनमुराद आयुष्याचा आनंद घेणारा,

आणि ती जबाबदार, काहीशी लाजाळू,

दोघांचा स्वभाव टोकाचा,

पण त्याच्या स्वच्छंद स्वभावावरच ती भाळली,

त्यानेही प्रेमात आकंठ बुडून प्रेमाच्या आणाभाका दिल्या,

दोघेही फिरायचे, मनसोक्त गप्पा मारायचे,

तिने आयुष्याचा जोडीदार निवडला होता,

त्याच्याकडे नवरा म्हणूनच ती पहायची,

त्यानेही लग्नाचं वचन दिलं,

त्या दोघांच्या घरीही समजलं,

घरून काहीही अडचण नव्हती,

एक मोठा प्रश्न मिटला होता,

पण त्याची नव्याची नवलाई सम्पली होती,

त्याचा स्वच्छंद स्वभाव,

कोणत्याही मुलीसोबत पटकन मैत्री करे,

आणि दुसरीकडे ती,

याच्याशी बांधील असल्यापासून कुणाकडे नजर वर करून बघतही नसे,

त्याचा हाच स्वच्छंद स्वभाव आड आला..

पुढे काय झालं तिला आठवत नव्हतं,

खरं म्हणजे तिला आठवायचे नव्हते ते दिवस,

जेव्हा ते कायमचे विभक्त झाले,

ती कित्येक वर्षे वेड्यासारखी त्याचा फोन ची वाट बघत असायची,

कधी स्वतःहून केलाच, तर त्याच्या नव्या मैत्रिणीबद्दल कळायचं,

प्रेमात वाहून दिलेल्या तिला, नवरा समजून बसलेल्या तिला हा धक्का पचवणं अशक्य होतं,

तिचं शरीर, मन सगळं खंगत होतं,

ज्याला सर्वस्व अर्पण केलं,

त्याने असा घात करावा?

हळूहळू सावरत गेली,

मनाला समजावलं, की तो तुझा नाहीच…

घरच्यांनी एक सुसंस्कृत, देखणा मुलगा शोधला,

लग्न लावून दिलं,

लग्नाच्या काही महिने आधी तिने त्याला शेवटचा फोन केलेला,

“माझं लग्न होतयं, तुला सगळं आधीसारखं करायचं असेल तर लवकर ये, वेळ निघून जाण्याआधी..”

त्याने तिला “सुखी रहा..” असं म्हणत आपल्या वाटा आता कधीच एक होणार नाहीत असा निर्देश केला..
******


1 thought on “आवाज-2”

Leave a Comment