अधीर मन झाले भाग 12

“अगं ओवी बोल ना…काय हवंय तुला? आज तुला जे हवंय ते तू माग. आम्ही नक्कीच ते देण्याचा प्रयत्न करु.” समर म्हणाला.

“नक्की देणार वकील साहेब?””तू फक्त बोलून तर बघ.””मग खरं सांगू का वकिलसाहेब, तुम्हाला द्यायचंच असेल ना काही तर आयुष्यभर माझ्या दीची साथ द्या. तिला कधीही एकटं सोडू नका.”दोघांचाही हात हातात घेत ओवीने एकेमकांच्या हातात दिला.
“हे काय ओवी? अगं मी तर आहेच ना कार्तिकीसोबत आणि आयुष्यभर राहील. एनी डाऊट?”
“तुम्ही तर आहातच दीसोबत यात काही शंकाच नाही वकीलसाहेब, पण संसार करत असताना अनेकदा समज गैरसमज होतात. सगळी नाती एकहाती सांभाळताना, सर्वांची मने जपताना नवरा बायकोच्या नात्यात मात्र दुरावा निर्माण होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी एकमेकांवरील विश्वास ढळू देऊ नका. माझी दी खूप साधी भोळी आहे हो, तिला तुमच्यावर नवरा म्हणून हक्कदेखील गाजवता येईल यात थोडी शंकाच वाटते मला. कोणी काही बोलले तरी रडत बसेल ती, पण उलट उत्तर देणार नाही. म्हणून काळजी वाटते तिची बाकी काही नाही.””ओवी…अजिबात काळजी करू नकोस तुझ्या दीची. अशी वेळच मी येवू देणार नाही. मी कायम तिच्यासोबत असेल.””बस.. बाकी आणखी काहीच नको मला.” बोलता बोलता कार्तिकी आणि ओवी दोघींचेही डोळे पाणावले.”बस झालं आता..इतकं इमोशनल नका होऊ यार आणि ओवी तुझ्या डोळ्यात पाणी अजिबात शोभत नाही आ. कार्तिकीचं एक वेळ ठीक आहे..मी समजू शकतो, पण तू तर रडूबाई नाहीस ना.” समरच्या बोलण्याने ओवीला हसू आले.
“म्हणजे थोडक्यात मी रडूबाई आहे, असं म्हणायचंय तुम्हाला?” लटक्या रागातच कार्तिकीने विचारले.”मी कुठे असं काही बोललो.””बोलला नाहीत पण अर्थ तर तोच होतो ना!””ये दी..आता भांडू नका यार तुम्ही दोघं. ते उगीच गम्मत करत आहेत गं.””मग मी तरी कुठे सिरियस आहे.!””बापरे! पण हे तुमचं वागणं आवडलं बरं का मला. असेच नेहमी एकमेकांच्या सोबत राहा आणि कायम हसत राहत.” ओवी म्हणाली.”तर तर..आता सात जन्म तरी काही पिच्छा सोडणार नाही मी तुझ्या दीचा.””सात जन्म! जरा जास्तच नाही होत का वकीलसाहेब?”ओवीच्या या वाक्यावर समर आणि कार्तिकी दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात.”बरं चला… तुमचा आणखी वेळ नाही घेणार मी. फायनली आता निघते मी. तुमचं चालू द्या. यू बोथ एन्जॉय युवर क्वालिटी टाईम आणि आता पुढे काहीही बोलू नका मी निघाले.” एवढे बोलून ओवी जायला निघाली.”अगं ओवी ऐक ना, एक शेवटचं.” समरने ओवीला पुन्हा थांबवले.”आता काय वकीलसाहेब?””दुपारी मी फोन केल्यावर लगेच ये, दुपारचा लंच सोबत करुयात.”” आजचा दिवस फक्त तुमच्या दोघांचा आहे ना. मग कशासाठी हे सगळं.”
“असं अजिबात नाहीये आ, तू येणार आहेस..बाकी आम्हाला काही माहीत नाही, हो ना कार्तिकी?””अगदी बरोबर. येना पण ओवी. एवढा काय भाव खातेस गं.””बरं… बरं..येईल मी. आता तरी निघू?” ओवीने विचारले.”ओके बाय, सी यू.” समर म्हणाला.”बाय…एन्जॉय आणि हे हात आता सात जन्म काही सोडू नका, बरं का.” असे म्हणत हसतच ओवीने गाडी स्टार्ट केली.समर आणि कार्तिकीचा हात अजूनही एकमेकांच्या हातातच होता. जाता जाता ओवीने जणू खोचकपणे त्यांना हे निदर्शनास आणून दिले.कार्तिकीने लगेचच समरच्या हातातून तिचा हात सोडवून घेतला. पण समरने मात्र पुन्हा एकदा तिचा हात हातात घेतला आणि घट्ट पकडून ठेवला.”काय हे… लहान मुलासारखं. आजूबाजूला लोकं आहेत.””असू दे की मग..मी माझ्या होणाऱ्या बायकोचा तर हात पडकलाय आणि मला नाही वाटत त्यात काही गैर आहे.”समरचे हे वाक्य कानी पडताच कार्तिकी लाजून अगदी गोरिमोरी झाली.
“जरी काही गैर नसले तरी आजूबाजूच्या लोकांना थोडीच ना माहीत आहे आपलं लग्न ठरलं आहे. जो तो आपापल्या सोयीने काहीही अर्थ घेईल ना.””हे आजूबाजूचे लोक तुझे कोणी नातेवाईक आहेत का?””नाही…?””मग ह्या अनोळखी जगाचा तू इतका विचार का करत आहेस? लक्षच देऊ नकोस आजूबाजूला म्हणजे मग मनात कोणता प्रश्नच निर्माण होणार नाही.””ओवी पण असंच काहीतरी बोलली होती मला.””अगं हुशारच आहे माझी मेहुणी. ते पहिल्याच भेटीत समजले होते मला.””हो का… बरं असू द्या. माझं काही म्हणणं नाही. कारण ओवी हुशार आहे हे मलाही मान्यच आहे.””बरं चल..आपण बागेतील एखाद्या झाडाखाली बसुयात.””हो चला…””ते बघ तिथे छान सावली आहे. आजूबाजूला पण जास्त गर्दी नाही. निदान त्यामुळे तरी तू कंफर्टेबल फील करशील.”दोघेही मग झाडाच्या सावलीत जाऊन टेकले.कार्तिकीला काय आणि कसे रिॲक्ट करावे तेच समजेना. नजर चोरत जमिनीवर पडलेली एक काडी घेऊन ती मातीवर रेघोट्या मारु लागली.कार्तिकी थोडी अनकन्फरटेबल फील करत होती हे समरच्या लक्षात आले.”काय गं काय झालं? हे काय करत आहेस?””कुठे काय? काहीच तर नाही.””मला वाटलं इथे शेती वगैर करण्याचा प्लॅन आहे की काय.””काहीही!””मग बोल ना काहीतरी. आपण त्यासाठीच भेटलो ना.””हो…मग तुम्ही बोला ना.” लाजतच खाली मान घालून कार्तिकी बोलली.”हे बघ..आधी मला अहो जाहो घालणं बंद कर बरं. आल्यापासून पाहतोय, काय सुरू आहे तुझं हे? गेले काही दिवसांपासून तुझ्या तोंडून समर ऐकायची सवय लागली गं. त्यामुळे नात्यात जास्त जवळीकता वाटते. अहो जाहोची फॉर्मलिटी नको ना आपल्या नात्यात. प्लीज, आय रिक्वेस्ट यू.””पण असं समोर अरे तुरे करणं मला जमेल यात थोडी शंकाच वाटते. फोनवर बोलताना काही नाही वाटत पण समोर कसं बोलणार?””कसं बोलणार म्हणजे? नसेल जमत तर मग मीही मग  आजपासून तुला अहो कार्तिकी मॅडम म्हणतो, चालेल तुला?””अजिबात नाही…त्यापेक्षा मीच अरे तुरे करण्याचा प्रयत्न करते.””ये हुई ना बात. बरं तुला एक गोष्ट माहितीये का?””कोणती गोष्ट?””ह्या ड्रेसमध्ये तू खूप सुंदर दिसत आहेस.”समरने दिलेली कॉमप्लिमेंट ऐकून कार्तिकीचा चेहरा लाजेने गोरामोरा झाला.”थॅन्क्स अ लॉट.” लाजतच कार्तिकी बोलली आणि तिने लगेचच मान खाली घातली. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हासू होते.”काय हे, अगं किती लाजतेस! अगं आज बरोबर पंधरा दिवसांनी आपलं लग्न आहे गं राणी. थोडंसं लाजणं त्या दिवसासाठी पण शिल्लक ठेव.” हसतच समर बोलला.”बरं एक विचारू? पण मला मनापासून उत्तर हवंय आ.” लगेचच समरने पुढचा प्रश्न केला.”ह्ममम…उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. नाही जमलं तर समजून घ्या.””घ्या..””सॉरी…म्हणजे समजून घे, असं म्हणायचं होतं मला.””बरं मला एक सांग, लग्नानंतर आपण हनिमूनसाठी कुठे जायचं?””काहीही काय? मी काय सांगणार आता?”  समरच्या प्रश्नावर कार्तिकीचा चेहरा अगदीच पाहण्यासारखा झाला.”असं कसं आणि त्यात काहीही म्हणण्यासारखं वेगळं असं काय आहे? जनरली प्रत्येक नवऱ्याला त्याच्या बायकोची आवड निवड जाणून घेण्याचा अधिकार असतोच.””हो पण…मला नाही सांगता येणार असं काही. तू तुझंच ठरव. तुझ्यासोबत तू म्हणशील तिथे येण्याची माझी तयारी आहे.” नजर चोरतच कार्तिकी बोलली.”हो का? बरं… मग विचार करून एखादं छानसं ठिकाण मी शोधून ठेवतो. दोन दिवसांत फायनल करून सांगतो तुला.””चालेल.” म्हणत कार्तिकीने मान डोलावली.”तुला असं वाटत नाही कार्तिकी, मी एकतर्फी बोलतोय..तू फक्त मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आहेस.””असं काही नाहीये, मी पण बोलते की.””हेच माझ्याकडे पाहून सांग.”कार्तिकीने हळूच एक कटाक्ष समर वर टाकला आणि पुन्हा ती माती सोबत चाळा करू लागली.न राहवून समरने तिचा हात पकडला.”काय हे… सोड ना.” म्हणत ओवी समरच्या हातातून तिचा हात सोडवून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु लागली. खरंतर तिलाही हे सगळं आवडत होतं पण आज होणारा नवरा समोर आहे म्हटल्यावर तिलाही काही सुचत नव्हतं.”तू ते थांबव बरं आधी मग. काय लहान मुलासारखं आल्यापासून माती खेळत आहेस. माझ्याकडे पाहून माझ्याशी बोल बरं. माझ्या न आवडणाऱ्या गोष्टीही तुला जर खटकत असतील तर लगेच सांग. म्हणजे मलाही माझ्यात तसे बदल करता येतील.””असं काही नाहीये… तू आहे तसाच खूप छान आहेस आणि मला तसाच खूप आवडतोस.” लाजतच कार्तिकी बोलली.”हो ना…मग तसं दिसू दे ना तुझ्या चेहऱ्यावर. बोल जरा माझ्याशी. तुझ्या मनात काही असेल तर मलाही काही प्रश्न विचार. आवडेल मला तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला. ओवीने काही तुझी तयारी करून घेतलेली दिसत नाही.””हो ना… तसंच आहे.”तेवढ्यात अंदाजे एक दहा बारा वर्षांची मुलगी लाल रंगाची गुलाबाची फुले घेऊन समर आणि कार्तिकीच्या जवळ आली.”दादा… फुलं देऊ?”” अरे वा! किती सुंदर फुलं आहेत गं. पण काय गं, तू रोज येते इकडे फुले विकायला?””हा..म्हणजे रोजच आसते मी हिकडं पण रोज फुलं नाय घिऊन येत. कधी खेळणी, कधी फुलं तर कधी फुगे नाहीतर मग लहान मुलांची छोटी छोटी खेळणी.जसा धंदा व्हईल त्यापरमानं दुसऱ्या दिशीच्या वस्तू ठरीवतो आमी. काल जास्त काय धंदा झाला नाय, मग आज परवडण्यासारखी फकस्त फुलंच व्हती. म्हणून आज ही लाल गुलाबाची फुलं आणली.””अरे वा.. छानच की गं. पण काय गं.. तू शाळेत नाही जात?””काय सांगू सायेब.. आमच्या सारख्या लोकांला कशाची आली शाळा आणि कशाचं काय. धंदा झाला तरच रात्री पोटभर जेवाया भेटतया नाहीतर जे आसल, जसं आसल त्यातच भागवायचं.””आणि तुझे आई वडील? ते कुठे असतात गं.” न राहवून कार्तिकीने विचारले.”ते बी असत्यात की मॅडम हितंच… ते बी आसंच फिरून फिरून भेळपुरी आणि चनं फुटानं इकत्यात. पण आमी तिगं भाऊ बहिण, सगळ्यांनाच काम करायला लागतंय तरच कसंबसं भागतंय.”त्या मुलीची कहाणी ऐकून कार्तिकीच्या डोळ्यांत पाणी आले. समरला देखील त्या मुलीचे खूप वाईट वाटले.”बरं किती फुलं आहेत तुझ्याकडे?” समरने विचारले.”सायेब आज पंचवीस फुलं हाय बगा. पण दोन तरी घ्याल ना तुमी?” त्या मुलीने निरागसपणे विचारले.”अगं दोनच काय? ती सगळी फुलं घेणार आहे मी आज, माझ्या होणाऱ्या बायकोसाठी.””खरंच सायेब?””अगदी खरं. आण ती फुलं इकडं.” समर म्हणाला.”तुमच्या दोघांचं लग्न कधी हाय सायेब?””अजून बरोबर पंधरा दिवसांनी.””मॅडम तुमी लय नशीबवान हायसा. ह्या सायबांसारखा नवरा तुमाला मिळाला. तुमची जोडी पण लय भारी हाय बगा. अगदी लक्षुमी नारायणाचा जोडा शोबतोय.””किती गोड बोलतेस गं तू.” कार्तिकीला त्या मुलीच्या बोलण्याचे खूपच कौतुक वाटले.”हे घे..हे फुलांचे पैसे.” पाकिटातून पाचशेची नोट काढत समर बोलला.””सायेब आवो माझ्याकडं सुट्ट पैसं नाईत. मी पाचच मिनटात पैसं सुट्ट करुन आणू?””अगं त्याची काहीच गरज नाही. हे सगळे पैसे तुझे आहेत. सांभाळून ठेव.””पण सायेब दहा रुपय फुलापरमानं तुमचे फकस्त अडीचशेच रुपय झाले. हे तर डबल पैसं हाईत.””मग असू दे ना..मी माझ्या इच्छेने तुला देतोय.””पण सायेब आवो कशाला..””अगं मी तुझी सगळी फुलं घेतली ना मग हे सगळे पैसे ठेवकी, माझ्याकडून तुला हे बक्षीस समज हवं तर.””सायेब तुमी लई मोठया मनाचे हायेत. देव तुमाला कशाचीच कमी पडू देणार नाय बगा. येते म्या.”जाता जाता ती मुलगी समरच्या पायाशी वाकली. तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि डोळ्यांतील पाणी दोन्हीही लपले नाहीत. थांक्यू सायेब म्हणत ती मुलगी तिथून निघून गेली.”कार्तिकी किती सुंदर फुलं आहेत बघ.” फुलांकडे एकटक पाहत समर बोलला.”आणि त्या फुलांसारखेच तुझेही मनही तितकेच सुंदर आहे.” हळू आवाजातच कार्तिकी बोलली.”काय म्हणालीस?””काही नाही.””हे घे आजच्या आपल्या भेटीची ही गोड आठवण.आय लव्ह यू कार्तिकी.” लालचुटुक गुलाबाच्या फुलांचा गुच्छ कार्तिकी समोर धरत समर बोलला.”समरच्या तोंडून हे शब्द निघताच कार्तिकीचा चेहरा एकदम उजळला. तिच्या चेहऱ्यावर प्रेमाचे स्मित फुलले.””लव्ह यू टू समर.” लाजत आणि नजर चोरतच कार्तिकी बोलली.” जमतंय की तुला.” आनंदी स्वरात समर उद्गारला.” गप रे…आता हसू नको ना.””अगं मी कुठे हसलो!”” मग मी हसले का?””तसं नाही पण छान वाटलं खूप. हळूहळू होतीयेस तू फ्री. हे पाहून समाधानाचे हसू आले गं.””बरं…ठीक आहे.””वेडी..” हलकेच कार्तिकीचे नाक ओढत समर बोलला.”आ…माझे नाक!””आहे आहे.. जागेवरच आहे. मी काहीही केले नाही.””तू पण ना…प्रेमाने समरला हलकेच एक चापटी मारत कार्तिकी बोलली.दोघेही एकमेकांच्या सहवासात अगदी रमून गेले होते. आहे ती वेळ इथेच थांबावी असे क्षणभर दोघांनाही वाटले.”बरं कार्तिकी ओवीला फोन कर, ये म्हणावं आता. मस्त जेवण करुयात. चालेल ना? की थांबायचं अजून थोडा वेळ?””नाही.. जाऊयात खूप उशीर होईल मग घरी जायला. थांब मी करते फोन ओवीला.”कार्तिकीने लगेचच ओवीला फोन केला.”हॅलो ओवी..येतेस ना तू?””ऐक ना दी… मला नाही येता येणार तिकडे. एक प्रॉब्लेम झालाय. तू एक काम कर तू बसने घरी जा. नाहीतर वकील साहेबांना तुला सोडायला सांग.””अगं पण झालं काय?””दी…मी करते तुला नंतर फोन. थोडं अर्जंट आहे. प्लीज समजून घे. बाय बाय बाय.” म्हणत ओवीने फोन कट केला.”अशी कशी ही मुलगी!””काय झालं कार्तिकी?””माहीत नाही. पण काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणाली. तू बसने घरी जा, असंही म्हणाली.””अरे देवा…थांब मी फोन करतो तिला.”क्रमशःकाय झालं असेल ओवीसोबत? जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचायला विसरू नका आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तेही नक्की सांगा.©®कविता वायकर.

1 thought on “अधीर मन झाले भाग 12”

  1. Wow, fantastic blog layout! How long have you been running a blog for?
    you make running a blog look easy. The entire glance of your website is magnificent, as neatly as the
    content material! You can see similar here e-commerce

    Reply

Leave a Comment