मागील भागात आपण पाहिले सुभानराव शिकारीला तर सुगंधा महादेवाच्या दर्शनासाठी निघाले. जंगलात अंधार झाल्याने दोन्ही लवाजमे मुक्कामी थांबले. आता पाहूया पुढे.
“केशर,मला जंगलाचे रात्रीचे रूप खूप आवडते. गूढ तरीही हवेसे वाटणारे.” सुगंधा राहुटीच्या बाहेर बघत बोलत होती.
“पण याच रात्रीच्या अंधारात अज्ञात शक्ती असतात हे विसरू नकोस.” केशरने इशारा दिला.
” केशर निर्माण आहे तसा संहार. सुष्ट आणि दुष्ट दोन्ही बाजू सगळीकडे असतातच.” सुगंधा हसत म्हणाली.
“पण सुगंधा काळ्या शक्ती अंधारात जास्त शक्तिशाली असतात. हे विसरू नकोस.” केशर चिंता व्यक्त करत होती.
“केशर, चल चांदणे पहायला जाऊ.” सुगंधा तिला उठवत बाहेर जाऊ लागली.
“सुगंधा,चांदणे इथल्या झरोक्यातून दिसते आहेच की.” केशरने थांबवायचा प्रयत्न केला.
तोपर्यंत सुगंधा बाहेर गेलीसुद्धा. केशर नाईलाजाने तिच्यामागे बाहेर आली. बाहेर दाट काळोखात पडलेले लख्ख चांदणे अतिशय सुंदर भासत होते.
तेवढ्यात रखमा म्हणाली,” तिकड मशाली दिसत्यात. कोण आसल मुक्कामी?”
“कोणी का असेना,सुगंधा आत चल आधी.” केशर रागावली.
“चांदणं पिरतीच सांडलं भवती,राजसा याव वेचायला.
खेळ इशकाचा रंगू दे जरा,चढवा रंग गुलाबी अंधाराला.
सुगंधा त्या चांदण्याला पाहून नकळत गाऊ लागली आणि त्याचबरोबर तिची पावलेही थिरकत होती.
तंग चंदनी चोळी माझे अंग जाळते सांगू कसे साजणा.
टिपूर चांदणं बघून आले अंगणी सांगून काही बहाणा.
गुपचुप यावं,मिठीत घ्यावं अन वेचाव चांदणं चुऱ्याला.
चांदणं पिरतीच सांडलं भवती,राजसा याव वेचायला.
सुगंधा गात असताना तिच्या मनात पहिल्यांदाच एक अनामिक हुरहुर दाटत होती आणि एक प्रणयिनी धुंद होऊन नाचत होती.
सोडा राजसा मिठी जराशी लोकलाज आडवी येते मजला.
करा तयारी, सजवा मंडप अन सजवा माडीवर मजला.
अंतरपाट सोडून राया,घेऊन जावे मजला नांदायला.
अन् चांदणं पिरतीच सांडलं भवती यावं वेचायला.
सुगंधा गात असतानाच अचानक एका स्त्रीची गगनभेदी किंचाळी जंगलाच्या शांततेला चिरून घुमली.
त्याबरोबर सुगंधाची गाण्याची लय तुटली आणि ती एकदम थांबली. समोरील छावणीत मशाली हलू लागल्या. काही मशाली पुढे येत असलेल्या दिसत होत्या. जवळपास दहा ते पंधरा मशाली आपल्याच दिशेने येत असलेल्या पाहून केशर आणि सुगंधा सावध झाल्या.
हत्यारबंद शिपाई आणि सोबत आलेल्या योगिनी चारही बाजूंनी उभ्या होत्या. एक बेसूर हसणे जवळ येत होते. अंगावर काटा आणणारे ते हसू नक्कीच मानवाचे नव्हते.
मशाली जवळ येत होत्या. चांदण्यांच्या प्रकाशात सुगंधा आणि केशरला ती दिसली. अस्ताव्यस्त मोकळे केस,साडीचे सुटलेले भान आणि वाऱ्याच्या वेगाने धावताना बेसूर आवाजात ती हसत होती.
तिच्यामागे पंधरा ते वीस मशाली घेऊन माणसे धावत होती. सुगंधाच्या राहुटीजवळ येताच ती थांबली. बाजूने आखलेले संरक्षण कवच तिला पुढे जाऊ देत नव्हते.
तिने रक्त उतरलेले डोळे रोखले आणि तो बेसूर पुरुषी आवाज घुमला,”मला का थांबिवल,जाऊ दे मला नायतर तुझ्या नरडीचा घोट घील.”
तो आवाज ऐकताच मागून मशाली घेऊन धावत येणारे जागेवरच उभे राहिले. संरक्षण कवचाला स्पर्श होताच ती दूर फेकली गेली आणि पुन्हा उभी राहिली.
“कोण हुब हाय माझ्या वाटत? अघोरी हाय म्या.” ती जोरात नाचत ओरडू लागली.
त्याबरोबर आजूबाजूचे वातावरण बदलू लागले. अनेक हिंस्त्र जनावरे तिच्या आजूबाजूला येऊन उभी राहिली. सुगंधा आणि केशर शांत उभ्या होत्या.
“तू कोण आहेस? ह्या शरीरात कशाला शिरलास?” केशर जरबी आवाजात म्हणाली.
त्याबरोबर त्याने दात विचकले आणि ते पाहूनच अंतोजी बेशुद्ध झाला. कमळाच्या दातातून किडे फिरत होते आणि तिचे संपूर्ण अंग एका उग्र वासाच्या भस्माने भरले होते.
“म्या कोनबी आसल आन ही बया मला आवडली हाय. तिला भोगणार म्या.”
कमळाने जवळपास सहा फूट उंच उडी मारली आणि केशरकडे झेप घेतली. परंतु केशरने दिव्य जल अंगावर फेकताच ती जमिनीवर आदळली.
सुभानराव कमळाचा तो भयानक अवतार पाहून घाबरले होते. तेवढ्यात त्या अतृप्त आत्म्याने पुन्हा हल्ला केला. त्याबरोबर सुगंधाने बंधन मंत्र जपायला सुरुवात केली.
“ही!ही!ही! तू मला हित बांधू शकत न्हाई.” डोके कराकरा खाजवत तो ओरडला.
“हे पंच महाभुतानो मला तुमची दिव्य शक्ती बहाल करा. जलाची शांतता,अग्नीची दाहकता,वायूची चपळता,पृथ्वीची स्थिरता आणि आकाशाची व्यापकता माझ्यात सामावू दे आणि तुमच्या शक्तींनी मला समोरच्या अघोरी शक्तीने बांधायची शक्ती प्राप्त होऊ दे.”
सुगंधा ध्यान लावून मंत्र जपत होती आणि त्याबरोबर तिच्याभोवती असलेले तेज वाढत होते.
“म्हंजी तू योगिनी हाईस,तुला मारून रगत पिलो तर यातल्या एका बाप्याच शरीर मला कायमच मिळल.”
तो आणखीच बेसूर हसला आणि त्याने अघोरी मंत्र जपायला सुरुवात केली.
परंतु केशर आणि इतर योगिनी सावध होत्या. सप्तसिंधूचे पवित्र जल आणि दिव्य भस्म यांच्या मदतीने त्यांनी कमळाच्या शरीरात असलेल्या आत्म्याला बंधन टाकले.
“मालक आता हिला शिरकाईच्या देवळात घिऊन चला.” खंडोजी घाई करत होता.
सुभानरावांनी सुगांधाकडे पाहिले. तिने होकारार्थी मान डोलावली. त्याबरोबर सुगंधाच्या सहकारी योगिनी वेगाने शिरकाई मंदिराकडे निघाल्या. कमळाच्या शरीरात कैद अघोरी सुटायला धडपडत होता. अखेर त्याला शिरकाई देवीच्या मंदिरात आणण्यात ते यशस्वी झाले.
मंदिरातील पवित्र लहरी अघोरीच्या आत्म्याला हालचाल करू देत नव्हत्या.
“कोण आहेस तू? हिचे शरीर सोडून दे.” सुगंधा शांत आवाजात म्हणाली.
“म्या अघोरी साधू हाय. मला शरीर पायजे एका मर्द गड्याच.” त्याची नजर सुभानरावांवर स्थिरावली.
“तुझे शरीर नष्ट झाले आहे. आता मृत्युलोक सोडून जा.” सुगंधाने त्याला आज्ञा दिली.
“तुला म्हणल ना मला एक मर्दाच शरीर पायजे. बाईला भोगायची माझी इच्छा अपुरी हाय.”
त्याने उत्तर दिले. त्याबरोबर सुगंधा चिडली आणि तिने मुक्तीमंत्र जपायला सुरुवात केली. सोबत दिव्यजल सतत शिंपडले जात होते. त्याबरोबर आघोरीचा आत्मा ते शरीर सोडून बाहेर पडला आणि तो सुभानरावांच्या दिशेने जायच्या आधीच केशरने त्याला एका दिव्य रिंगणात कैद केले आणि मग मुक्तीमंत्र जप सुरू झाला.
थोड्याच वेळात अघोरीचा आत्मा जळून नष्ट झाला. कमळा बेशुद्ध होती. सुगंधा आणि केशर काहीच न बोलता तिथून त्यांच्या मुक्कामी निघून गेल्या.
सुगंधाचे हे शक्तिशाली रूप पाहून सुभानराव तिच्या अधिकच प्रेमात पडले. अघोरीचा आत्मा मुक्त झाला. सुगंधा आणि केशर मुक्कामी पोहोचल्या आणि मग इकडे सगळे भानावर आले. कमळा मुक्त कशी झाली हे कोणालाही समजले नव्हते.
सुभानरावांनी ओळखले की योगिनीनी संमोहन वापरून इतरांना आपल्याबद्दल कळू दिले नव्हते. तेवढ्यात त्यांचे लक्ष केशरने त्याला जाताना दिलेल्या एका कमंडलूकडे गेले त्यांनी त्यातील पाणी प्यायले आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला.
“सुगंधा, सुभानरावांना देखील आता काहीही आठवणार नाही.” केशर मंद हसत म्हणाली.
त्यानंतर सगळेजण शांत झोपी गेले. सकाळी सर्वप्रथम कमळा जागी झाली. आपण आई शिरकाईच्या मंदिरात आणि तेही अशा अवस्थेत कसे पोहोचलो तिला काहीही आठवत नव्हते. तेवढ्यात अंतोजी जागा झाला.
त्याला कमळा बाधित होईर्यंतच्या घटना आठवत होत्या. त्याने तिला जवळ जाऊन हात लावला.
“आव अस काय करताय? काय झालं हाय का?”कमळा काळजीने विचारू लागली.
तोपर्यंत सगळे जागे झाले. कमळा बाधित झाल्याचे अंतोजीने सगळ्यांना सांगितले.
“पण अंतोजी मग आपल्या सगळ्यांना कोणी वाचवले असेल?” सुभानराव विचारात पडले.
“मालक,इचार करायला येळ नाय. ह्या जंगलातून लवकर निघायला पायजे.” खंडोजीने त्यांना समजावले.
त्यानंतर सुभानराव आणि त्यांचा लवाजमा मार्गस्थ झाला. सुगंधा कधीच पुढे निघून गेली होती. तिला राहून राहून सुभानरावांच्या शरीराकडे पाहणारा अघोरी आठवत होता. त्याबरोबर सुभानरावांचे देखणेपण तिलाही अधिकाधिक जाणवत होते.
जंगल आता अगदी वेगळे भासत होते. सुंदर हिरवी झाडे आणि वेली,प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज,खळखळ वाहणारे झरे अशी निसर्गाची किमया सगळीकडे दिसत होती.
तेवढ्यात एका ठिकाणी एक वेगळा दगड दिसला आणि केशर थांबली. तिने घोड्यावरून उतरून त्या दगडाभोवती वाढलेली पाने वेगळी केली.
एका योगिनी स्त्रीचे लढताना असलेले शिल्प होते. त्याखाली असलेला मजकूर वाचला आणि केशरने सुगंधाला जवळ बोलावले.
“सुगंधा वाच,ह्यात काय लिहिले आहे. शंभू महादेवाच्या गळ्यात सजतो विषारी सर्प पण त्याच्याच डोळ्यात आहे अमरत्वचा अर्क. खाली एक नकाशासुद्धा दिला आहे.”
सुगंधाने ते वाचले आणि ते शिल्प पेटाऱ्यात सोबत घ्यायचा हुकूम दिला.
सुभानराव आणि त्यांचे साथीदार वेगाने पुढे चालले होते.
खंडोजी म्हणाला,”मालक आता चार पाच मैल रहायल दिवुळ. हित समद्यासनी थांबायला मोप आन चांगली जागा हाय. समदी मंडामांड व्हवू द्या.”
“खंडोजी,तुम्ही व्यवस्था करा. आज रात्री शिकारीला सुरुवात करू. जवळ कुठे पाणवठा आहे का ते पाहून येतो आम्ही.”
सुभानराव असे म्हणून सोबत कोणालाही न घेता जंगलात गेले. तसे खंडोजीने त्याच्या विश्वासू माणसांना मागाहून जायचा इशारा केला.
“सुगंधा,आता शिवालय जवळ आले आहे. तिथे पाणवठा दिसतो. आपण हा उंचवटा निवडू राहुट्या करायला.”
केशरने सगळ्यांना सूचना द्यायला सुरुवात केली.
सुभानरावांकडे धावणारे मन सुगंधा आवरू शकेल का?.
त्यांना सापडलेले शिल्प काही संकट घेऊन येईल का?
रात्री शिकारीला काय घडेल?
कमळा आता पुढे काही संधी साधेल का?
वाचत रहा.
शापित अप्सरा.
©®प्रशांत कुंजीर.