फोटो-3

“आपण परदेशात कधी जाणार? परदेशात जाऊद्या पण किमान जिल्ह्याबाहेर कधी 2 दिवस फिरायलाही गेलो नाही आपण..चांगले कपडे नाहीत मला…चांगला फोटो टाकता येईल असे कपडे कधी घेणार मला??”

“अगं मी कधी नाही म्हटलो? फक्त एवढा महिना थांब, या महिन्यात आपल्या मिनूची शाळेची फी भरायची आहे..पुढच्या महिन्यात नक्की..”

“वा…म्हणजे हे बरं आहे..फी भरायची म्हणून दुसरं काहीच करायचं नाही..लोकं मुलांना महागड्या शाळेत टाकून दर वीकेंडला फिरायला जातात..”

“हे बघ तुला आपली परिस्थिती माहितीये…मी अगदीच लाख दोन लाख महिना कमवत नाही…जे आहे त्यात आपलं भागतं ना सगळं?”

“तेच तर..मी भागवतेय म्हणून ना..मी जर इतरांसारखे नखरे केले असते, हौसमौज केली असती तर कसं भागवलं असतं सांगा तुम्ही??”

बोलणं वादात बदललं,

तिचा सूर काही बदलत नव्हता आणि त्याला तिचं अचानक बदललेलं वागणं कळत नव्हतं,

हळूहळू दोघांमध्ये दरी वाढत होती,

सुखी समाधानी संसारात अढी वाढू लागली..

असंच स्वतःशी धुमसत असतांना तिच्या घरी तिची एक लांबची बहीण भेटायला आली,

बोलता बोलता तिने बहिणीला तिच्या मनातली घुसमट सांगितली,

बहिणीने तिला समजावलं,

“वेडी की काय तू? इतका चांगला नवरा आणि संसार असताना असे विचार तुझ्या डोक्यात येताच कसे? हे बघ, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं… आज तुझ्याकडे ज्या चार गोष्टी आहेत त्या दुसऱ्याकडे नाहीत..आणि दुसऱ्याच्या चार गोष्टी तुझ्याकडे नाहीत…पण म्हणून कुणीही रिकामी ओंजळ घेऊन फिरत नाही…”

बहिणीच्या या शब्दांनी ती जरा भानावर येत होती, तेवढ्यात बहिणीला एक फोन आला,

“काय????”

असं म्हणत बहीण जोरात किंचाळली, हीसुद्धा घाबरली,

“काय गं काय झालं?”

बहिणीने डोक्यावर हात मारत सांगितलं,

“आमच्या शेजारी एक जोडपं राहतं… कायम भांडत असतात दोघे, कधीतरी येतात फ्लॅटवर तरीही सतत भांडण, अगदी तिचा नवरा तिच्या अंगावर धावून जातो..एकदा तर मी आणि माझ्या नवऱ्याने तिला वाचवलं होतं… अमेरिकेत असतात दोघे, कामानिमित्त जातात आणि येतात…ती बाई अगदी साधी, सरळ..पण तिच्या नवऱ्याला तिला फक्त मिरवायची होती..तिच्यावर नको ते उपचार, सर्जऱ्या आणि काय काय केलं…माझी बायको शोभेची बाहुली म्हणून सर्वात सुंदर दिसायला हवी असा त्याचा कयास, नको त्या कपड्यात त्याने तिचे फोटो टाकले, का? तर आपली बायको एकदम हॉट दिसायला हवी म्हणून, मित्रांनी डोळे विस्फारले पाहिजे म्हणून..काय एकेक लोकं असतात ना…आता बघ, ते दोघे घरी आले आणि जोरजोरात भांडण सुरू आहे त्यांचं, तुझ्या जिजूंचा आत्ताच फोन आलेला..थांब तुला तिचा फोटो दाखवते..”

असं म्हणत बहिणीने त्या मुलीचा फोटो हिला दाखवला,

हिला धक्काच बसला,

ही तीच…तिच्या शाळेतली मैत्रीण… जिचे फोटो पाहून हिने स्वतःचं मानसिक स्वास्थ्य बिघडून घेतलेलं,

नवऱ्याशी अंतर ठेवलं,

समाधानी संसारात विघ्न आणली,

तुलना करून करून स्वतःला कोसत बसली,

नवऱ्याला नको ते ऐकवलं…

हीच ती…

तिला अचानक आठवलं,

नवऱ्याचे मित्र यायचे तेव्हा तो म्हणायचा,

“तू कशी दिसतेस यापेक्षा तुझ्या गुणांवर जास्त प्रेम करतो मी..मित्रांसमोर अशीच आलीस तरी मला लाज वाटणार नाही..”

तिला स्वतःचीच लाज वाटू लागली

नवरा घरी आल्यावर त्याची रीतसर माफी मागितली,

सुखी समाधानी संसाराची पुन्हा एकदा सुरवात झाली…

समाप्त

1 thought on “फोटो-3”

Leave a Comment