पाहुणा-2

सासूबाई आणि कावेरीबाईंचं बोलणं साधनाच्या कानावर पडलं. त्या दोघी बेडरूममध्ये गप्पा मारत होत्या. साधना किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत होती. तेवढ्यात तिची मोठी जाऊ तिथे आली आणि तिनेही कामाला सुरुवात केली.

साधनाला राहवलं नाही, तिने हळू आवाजात भाजी चिरता चिरता मोठ्या जाउबाईंना विचारलं,

“काय ओ ताई, या मावशी अश्याच आहेत का??”

मोठ्या जावेला हसू आलं,

“म्हणजे तुलाही अनुभव आला वाटतं..”

“म्हणजे तुम्हालाही असंच??”

मोठ्या जावेने इकडेतिकडे पाहिलं आणि म्हणाली,

“माझं लग्न झालं तेव्हा त्या अश्याच अचानक घरी आल्या होत्या, मी नेहमीप्रमाणे आपल्या ड्रेसवर. आपल्या सासूबाईंनीच सांगितलेलं, साडीच घालायची असा नियम नाही. मग त्यांनी मला ड्रेसवर पाहिलं आणि वर खालून न्याहळत म्हणाल्या,

“काय बाई आजकालच्या पोरी…”

“मग तुम्ही काय म्हणाल्या??”

“मला धाक किती होता तेव्हा, मी आपले गप बसले..पण आईंच्या मनात त्यांनी इतकं काही भरवलं की चार दिवस त्यांचं वागणं अगदी बदलून गेलेलं माझ्याशी..”

“असं काय काय सांगितलं होतं त्यांनी?”

“कावेरी मावशींनी पाहिलं..मी ड्रेसमध्ये, त्यात मला मॉब घेऊन फरशी पुसताना पाहिलं..आणि म्हणाल्या की आजकालच्या मुलींना वाकायला नको, आळशी झाल्यात नुसत्या..”

“मग?”

“पुढे चार दिवस सासूबाईंनी मला हाताने फरशी पुसायला लावली..”

“बापरे..”

“अश्याच आहेत अगं त्या, आल्या की आईंच्या मनात काहीतरी भरवतात, काड्या लावतात…आईचं वागणं बदलतं पण हळूहळू मूळ स्वभावात येतात त्या तेवढं बरं..”

गप्पा मारता मारता सासूबाईनी तिकडून आवाज दिला,

“पोरींनो झालं का काम?? इकडे या बरं..”

दोघीजणी हातातील काम सोडून तिकडे गेल्या.

“पोरींनो माझ्या बहिणीला एक छानशी साडी घ्यायचिये, कोणत्या दुकानात चांगली मिळते सांगा बरं..”

दोघीजणी वेगवेगळे दुकानं सुचवू लागल्या. या सगळ्यात कावेरीबाई दोघींकडे निरखून पाहू लागल्या..मग म्हणाल्या,

“साडीचं नंतर बघू, पण पोरीच्या जातीने छान तेल लावून वेणी फणी करून मिरवावं, ह्या केसांच्या काय तपकिरी पट्ट्या करून ठेवल्यात..”

“Highlights म्हणतात त्याला..”

साधना म्हणाली…

मोठ्या जावेने तिला मागे हळूच चिमटा काढून गप केलं..

साधना धाकली सून होती पण स्वाभिमान जपणारी होती. हे असलं काहीबाही ऐकून घेणाऱ्यातली नव्हती. पुढचे चार दिवस कावेरीबाईंचं बरंच बोलणं तिने ऐकून घेतलं आणि नंतर मात्र तिचा संयम सुटला..
*****

Leave a Comment