नाव काढलं-3 अंतिम

ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या मशीनवर तिचं संशोधन अंतिम टप्प्यात आलेलं, त्याबद्दल ती खुश होती पण घरी त्याबाबतीत कुणी ऐकून घ्यायला उत्साही नसे, ती त्या रागात नवऱ्याला म्हणाली,

“तुमच्या माझ्या बाबतीत या अवास्तव अपेक्षा का असतात तेच मला कळत नाही, आई दिवसभर tv वरच्या सिरीयल बघत असतात, त्यातल्या सुना..अगदी घालून पाडून बोलणाऱ्या सासूला अगदी आपल्या दोन्ही किडन्या काढून द्यायला तयार असतात, जणू त्यांचा जन्म केवळ महान बनण्यासाठी झालेला असतो. नवरा अत्याचार करतो, सासू शिव्या देते तरी ती सून महान बनून “आ बैल मुझे मार” सारखं तोंड घेऊन जाते. आणि तिची किंमत केव्हा कळते? अगदी मरायला टेकल्यावर. हे वास्तविक जीवनात तुझी आई बघत असेल तर अवघड आहे. मी तुमच्यासाठी, घरासाठी जेवढं जमेल तेवढं करते. मी केवळ तुमच्या नजरेत महान बनण्यासाठी जन्म घेतलेला नाही. मला इतरही बरीच कामं आहेत. आयुष्यभर तुमची तोलतोल करून तुमचं मन जिंकणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नक्कीच नाही. सुनेने नाव काढावं म्हणून अवास्तव गोष्टी मला जमणार नाही, आणि नाव वगैरे काढणं सगळं भ्रामक आहे, चार पाच लोकं सोडली तर बाकी तुमची उणीदुणीच काढणार, अश्यांना त्यांची पतवंड सुद्धा लक्षात ठेवत नाहीत.. तुम्ही मला चांगली म्हणा अथवा वाईट, माझ्या मनाला माहितीये की मी माझ्या कर्तव्यात चुकत नाही. बाकी माझ्या बाबतीत काय विचार करायचा तो करा”

नवऱ्याने हे ऐकलं, त्याला कळत होतं.. पण वळायला वेळ लागणार होता.

दुसऱ्या दिवशी त्याची आई अशीच कुरबुर करत असताना तो म्हणाला, “अगं आई ती भरपूर करतेय की सर्वांसाठी”

हे ऐकून तिला बरं वाटलं, नवरा आपली बाजू मांडतोय..

पण आईचा मात्र संताप झाला,

“अरे मी आयुष्यभर सासरच्यांचं आणि नातेवाईकांचं केलं म्हणून माझं आज नाव निघालं, तसं नाव तुझ्या बायकोचं काढेल का कुणी?”

तेवढ्यात tv वर बातमी झळकली,

“ऑटोमॅटिक संयंत्रावरील अंतिम टप्प्याच्या संशोधनात मिस सोनाक्षी जोशी यांना यश मिळाले असून त्यांचे पेटंट घ्यायला परदेशी कंपन्या उत्सुक आहेत..”

नवऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं, सासूला आनंद व्यक्तही करता येईना..सुनबाई म्हणाली,

“नाव काढलं की हो सासुबाई..”

समाप्त

1 thought on “नाव काढलं-3 अंतिम”

Leave a Comment