कुलिंग पिरेड-5 अंतिम

सर्वजण जेवायला बसले, अक्षताने सर्वांना बटाट्याची भाजी वाढली. आधीपेक्षा बरी झालेली पण थोडी कच्ची राहिलेली. अक्षताच्या हे लक्षात आलं तेव्हा तिला घाम फुटला, तेवढ्यात सासरे म्हणाले,

“छान झाली हो भाजी..”

तिच्या देराण्या आणि सासू हसायला लागले,

अक्षता म्हणाली,

“पण थोडी कच्ची…”

“असुदेत, कुलिंग पिरेड आहे..”

च्यायला परत तेच….

शेवटी तिने नवऱ्याला विचारायचं ठरवलं, रात्री खोलीत नवरा आला तसं तिने त्याला विचारलं,

“विवेक, हे कुलिंग पिरेड म्हणजे काय भानगड आहे??”

“तुला माहीत नाही? इतकी शिकली सवरलेली तू.”

“हा म्हणजे, मी गुगल केलं होतं…काहितरी 14 दिवसात ऍग्रिमेंट तोडता येतं वगैरे, पण त्याचा इथे काय संबंध?”

“बरोबर आहे की मग, आता हे बघ…14 दिवस मी तुला बघणार, तुझं वागणं आवडलं तर ठीक नाहीतर तुला तुझ्या माहेरी सोडून येणार..”

“काय??”

“आता आज तू बटाट्याची भाजी केलीस..ते बघून असं वाटतंय..” विवेक चेहरा पाडत म्हणाला..
******
अक्षताचा पुतळा झाला…ते बघून विवेक मोठमोठ्याने हसायला लागला…

अक्षताला समजलं की हा जोक होता, ती त्याच्या पाठीवर धपाटे टाकायला लागली..

अरे देवा, कुणीतरी सांगेल का हा कुलिंग पिरेड काय प्रकार आहे??

विवेकने तिला शांत केलं, तिचा हात हातात घेतला आणि समजावलं..

“बरं ऐक आता, या घरात एखादी स्त्री नवीन नवीन लग्न करून आली की तिला सुरवातीचे काही दिवस मुभा असते, म्हणजेच कुलिंग पिरेड. आजकाल शिक्षण आणि नोकरी यामुळे मुलींना माहेरी घरकाम जास्त शिकता येत नाही, त्याचं प्रात्यक्षिक त्यांना सासरी करावं लागतं. नवीन गोष्टी शिकायला वेळ लागतो, या काळात ती मुलगी नवनवीन प्रयोग करते, trial and error बेसिस वर काम करते, प्रत्येकवेळी तिचा पदार्थ, तिचं काम यशस्वी होईलच असं नाही. त्यामुळे हा काळ तिला शिकण्यासाठी, वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी दिला जातो. घरात नियम आहे की या काळात मुलीला काहीही बोलायचं नाही..तिने बनवलेला पदार्थ आवडीने खायचा आणि जेवणाचे हाल नको म्हणून पर्यायी पदार्थ घरातील अनुभवी स्त्री ने तयार ठेवायचा… तुझा कुलिंग पिरेड सुरू आहे, म्हणजे तू नवनवीन गोष्टी बिनधास्तपणे, आणि चुकेल की काय याची काळजी न करता बनवू शकतेस.. शेवटी प्रयत्नातूनच माणूस शिकतो ना..”

“कसली भन्नाट कल्पना आहे ही…जबरदस्त, आवडलं आपल्याला..”

एका क्षणात तिचा ताण उतरला, आपण ज्या घरात आहोत त्यांचे हे असे उच्च विचार बघून तिला अभिमान वाटला…

“पण ही कल्पना कधीपासून आली आणि कुणी अमलात आणलं हे?”

“माझ्या आईने..”

“आईंना कसं सुचलं हे??”

“माझी आत्या, म्हणजेच आईची नणंद..अत्याने खूप वाईट दिवस पाहिलेत अक्षता..”

“असं काय झालेलं नक्की?”

“माझी आत्या खूप हुशार होती, स्कॉलरशिप मिळालेली तिला..तिचा खूप वेळ शिक्षण आणि नोकरीत गेला. घरकाम फारसं जमत नव्हतं, त्यात आई तिला सपोर्ट म्हणून घरकाम करू द्यायची नाही. आई तिला आपल्या बहिणीप्रमाणेच वागवायची. आत्याचं लग्न झालं. तिच्या सासरच्यांना तिची हुशारी आणि तिने केलेली नोकरी पसंत नव्हती. त्यात आत्याला घरकाम फारसं जमत नसे. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी आत्याकडून भाजीत मीठ जास्त पडलं तर आत्याला तिच्या सासूने खूप बोल लावले. आत्या घाबरतच काम करायची, त्यामुळे अजून चुकायची..आत्याला घरातलं नीट जमत नाही हे कारण पुढे करून तिच्या सासरच्या लोकांनी तिला इकडे आणून सोडले. “

“बापरे…पण आत्या नवीन होत्या, त्यांना शिकायला पुरेसा वेळ द्यायला हवा ना..”

“तेच तर चुकतं ना, नवीन आलेल्या मुलीला तिचा वेळ द्यावा, तिला शिकू द्यावं आणि शिकत असतांना तिच्याकडून झालेल्या चुकांना पोटात घालून तिला धीर द्यायचा हे त्यांच्या गावीच नव्हतं..आत्याला येतच नाही हा शिक्का मारून महिनाभरात आत्याला माहेरी सोडलं त्यांनी….आत्या आता बेंगलोरला असते, तिची तिची नोकरी करते, एकटी राहून स्वतःचं पोट भरते..”

“वाईट आहे हे..”

“तू खूप उदाहरण बघ आजूबाजूला… नवीन नवरी घरात आली की सगळेजण लगेच जज बनतात..तिच्या बारीकसारीक गोष्टींवर नजर ठेवतात आणि ती फक्त काही चुकायचा उशीर, तिच्यावर तोफ सोडायला सगळे तयारच..नवीन नवरीला सुरवातीचा काळ खूप नाजूक असतो, या काळात तिला दिलेली वागणूक तिच्या आयुष्यभर लक्षात राहते…या काळातच कितीतरी कलह होतात, गोष्टी घटस्फोट पर्यंत पोहोचतात… त्यापेक्षा हा काळ नाजूकपणे हाताळला तर कितीतरी आयुष्य सुखी होतील..आत्याच्या या प्रसंगावरून आईने ही कुलिंग पिरेड ची संकल्पना अंमलात आणली..”

अक्षताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहायला लागले,

“काय झालं??”

“मला वाटलेलं एकत्र कुटुंबात माझं काय व्हायचं, पण अशी लोकं आणि असं सासर असतांना माझी काळजीच मिटली..”

महिनाभरात अक्षता स्वयंपाकात expert झाली,

तिचे आई वडील जेवायला आले तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना..

अक्षताने आईला कुलिंग पिरेडची संकल्पना सांगितली तसा आईचा ऊर भरून आला..

आपली मुलगी योग्य माणसात दिली हे समजताच आईला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं..

समाप्त

269 thoughts on “कुलिंग पिरेड-5 अंतिम”

Leave a Comment