कारण-3 अंतिम

“वेदांत खूप चांगला मुलगा आहे, सर्वांना मदत करतो, सर्वांची काळजी घेतो…यावर अजिबात शंका नाही..माणूस म्हणून तो शंभर नंबरी सोनं आहे…”

“मग अडचण काय आहे??” – आई

“तो फक्त माणूस म्हणून चांगला आहे, नवरा म्हणून नाही. आजवर त्याने कायम मला गृहीत धरलं आहे..आई वडिलांसमोर चांगलं दाखवण्याच्या प्रयत्नात मला कायम बाजूला सारलं…आई तुला आठवतं? माझी डिलिव्हरी झाली आणि तुम्ही त्याला लगेच कळवलं.. तो लगेच येऊ शकला असता, पण आला नाही..का माहितीये? त्याच्या एका मित्राच्या बायकोसाठी गोळ्या आणायच्या होत्या आणि मित्राची गाडी बंद पडली होती… वेदांत स्वतःची बायको सोडून तिथे पळाला… आम्ही जेव्हा फॅमिली प्लॅनिंग करत होतो तेव्हा हा रोज सोसायटीत गस्त घालायचा, बाकीची लोकं म्हणायची की आम्ही गस्त देतो पण याला ते मान्य नव्हतं… याच कारणाने आम्हाला संततीसाठी खूप वाट पहावी लागली…वेदांतचा चुलतभाऊ एकदा गावाकडून आपल्या बायकोला घेऊन आलेला शहर फिरवण्यासाठी…तेव्हा माझं ऑफिसमध्ये महत्वाचं काम चालू होतं आणि पावसाचे दिवस होते…वेदांतने आठ दिवस आमची कार त्याला दिली आणि मला रोज भर पावसात दोन चाकीवर सोडायला येई…एकदा सासू सासरे तीर्थयात्रेला गेलेले. घरी आम्ही दोघेच..कितीतरी दिवसांनी असा निवांत वेळ आम्हाला मिळालेला…तर याने त्याच्या मावस बहिणीला घरी बोलावून घेतलेले… तिला विरंगुळा म्हणून… आता मला सांग, जगासाठी हे सगळं करतांना मी कुठे होते? जो माणूस अख्ख्या जगाचा विचार करतो तो बायकोला इतकं गृहीत का धरतो? ज्याच्यासाठी सगळं जग महत्वाचं आहे पण बायको अजिबात नाही…
मलाही आवडतं लोकांना मदत करायला..पण त्याच्याइतका अतिरेक मी नाही करू शकत. या अतिरेकपायी तो मला कायम डावलत आलाय… त्याला सांगूनही काही उपयोग होत नाही..कारण त्याला लोकांत प्रशंसा मिळवायला जायचं असतं..”

हे ऐकून आईचे डोळे उघडले,

समोरचा माणूस जगासाठी चांगला असला तरी बायकोसाठी तो चांगला असेलच असं नाही…

तिने तिच्या मुलाला घेतलं आणि ट्रेनचे तिकीट काढले,

वेदांतने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिला भविष्य माहीत होतं…

ट्रेनला अजून वेळ होता,

तिच्या आईने पटकन वेदांतला फोन केला आणि तिला रोखायला सांगितले,

“लगेच आलो..” असं म्हणत वेदांत निघाला…

पण कितीतरी वेळ झाला तरी वेदांत आला नाही,

अखेर ती निघून गेली,

वेदांत तिथे आला, आईने उशिरा येण्याचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला,

“बाबांना दहा हजार कॅश हवी होती, ती काढून देण्यासाठी बरेच atm फिरलो पण नोटा मिळाल्या नाहीत..शेवटी लांबच्या एका atm मध्ये मिळाले..”

“हे अर्जंट होतं??”

“बाबांना आनंद होईल ना, की सांगितल्याक्षणी मुलाने काम ऐकलं म्हणून, बरं आमची ही कुठेय??”

“गेली ती…तुम्हाला उशीर झाला..आणि तिने घेतलेला निर्णय योग्य होता हे आज पटलं मला..”

असं म्हणत पाणावलेल्या डोळ्यांनी आई तिथून निघून गेली…

3 thoughts on “कारण-3 अंतिम”

  1. छान आहेंकथा. खरंय एक माणूस जगासमोर चांगले असेल पण तो नवरा म्हणून, वडील म्हणून चांगलाच असेल असे नाही. वेगवेगळ्या भूमिकेत तो वेगवेगळा असतो.

    Reply

Leave a Comment